वरळीत कबड्डीचा थरार शिगेला!
विजेतेपदाच्या दिशेने चौघांची झेप!
मुंबई : मुंबईतील वरळी येथे रंगत असलेल्या ओम् ज्ञानदीप
क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६ मध्ये थरार
शिगेला पोहोचला असून, युवा पलटन, ठाणे महानगर पालिका, भारत पेट्रोलियम आणि मुंबई पोस्टल यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता युवा पलटन वि.
ठाणे महानगर पालिका आणि भारत पेट्रोलियम वि. मुंबई पोस्टल अशा लढती रंगणार
असून त्यानंतर अंतिम सामन्याचा थरार उलगडणार आहे.
युवा पलटनचा एकतर्फी विजय – ४४-२३ ने मीरा
भाईंदरवर मात
पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात युवा पलटन ने मीरा भाईंदर महानगर पालिका वर ४४-२३ असा दणदणीत विजय
मिळवला. पूर्वार्धात २ लोण देत २७-१० अशी भक्कम आघाडी घेतलेल्या युवा पलटनने
उत्तरार्धात सावध खेळ करत आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले. असलम इनामदार आणि अलंकार पाटील यांच्या तुफानी
चढायांना अथर्व धुमाळ व अजय कुमार यांच्या भक्कम बचावाची साथ लाभली. मीरा
भाईंदरकडून सचिन तिवारी, अनुराग तिवारी आणि प्रदीप तांडेल यांनी उत्तरार्धात प्रयत्न केले, मात्र ते अपुरे ठरले.
ठाणे महापालिकेची दमदार आगेकूच – ३२-२२ ने मुंबई
बंदरचा पराभव
ठाणे महानगर पालिका संघाने मुंबई बंदर वर ३२-२२ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मध्यंतराला १५-१२ अशी नाममात्र आघाडी असलेल्या ठाणेकरांनी
उत्तरार्धात खेळ उंचावत प्रतिस्पर्ध्यांवर लोण देत विजय निश्चित केला. त्यागराज कुंभार, जावेद पठाण आणि परेश म्हात्रे यांच्या संयमी खेळाने संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई बंदरकडून रुपेश साळुंखे, संकेत सावंत आणि बालाजी जाधव यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.
भारत पेट्रोलियमचा ठसा – ३९-२५ ने डी. पी. यु.
पुणे पराभूत
भारत पेट्रोलियम ने डी. पी. यु. पुणे वर ३९-२५ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला २३-१८ अशी आघाडी
घेतलेल्या पेट्रोलियम संघाने उत्तरार्धातही आक्रमक खेळ कायम ठेवला. अनिल जस्ता, आदित्य चौघुले, हर्ष लाड आणि प्रदीप दिघोळ यांनी शानदार खेळ केला. डी. पी. यु. कडून विकास जाधव, राहुल वाघमारे आणि हर्षद माने यांनी चांगली लढत दिली.
मुंबई पोस्टलचा थरार – ५१-४६ ने मिडलाईन
अकॅडमीवर मात
शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई पोस्टल ने मिडलाईन अकॅडमी वर ५१-४६ असा चुरशीचा विजय मिळवला. अभिराज पवार आणि अभिषेक भोजने यांच्या तुफानी चढायांना ओमकार मोरे यांच्या भक्कम पकडीची साथ मिळाली. पहिल्या डावात २ लोण देत २८-१८ अशी आघाडी
घेतलेल्या पोस्टलने उत्तरार्धात आणखी एक लोण देत विजय निश्चित केला. मिडलाईनकडून सुशील काबरेकर आणि साईप्रसाद यांनी उत्कृष्ट
खेळ करत सामना रंगतदार ठेवला.
उपउपांत्यपूर्व फेरी – दिग्गजांचा संघर्ष
उपउपांत्यपूर्व फेरीत मीरा भाईंदर महानगर पालिका ने सेंट्रल बँक वर ३७-३१, ठाणे महानगर पालिका ने सी. जी. एस. टी. वर ४६-४०, डी. पी. यु. पुणे ने युनियन बँक वर ४३-३३, तर मुंबई पोस्टल ने एच. ए. एल. नाशिक वर ३३-२५ असे विजय मिळवत पुढील फेरी गाठली.
मान्यवरांची उपस्थिती – स्पर्धेला प्रतिष्ठेची
झळाळी
या स्पर्धेला माजी मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मंत्री संजय शिरसाट, आमदार महेश सावंत आणि आमदार सचिन अहिर यांनी सदिच्छा भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन
दिले.
आता रंगणार उपांत्य फेरीचा महासंग्राम!
स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, उपांत्य फेरीतील लढतीतून विजेतेपदासाठीचे खरे
दावेदार ठरणार आहेत. प्रत्येक संघ विजेतेपदासाठी झुंज देणार असल्याने पुढील सामने
अधिकच थरारक ठरणार आहेत!

.jpeg)
Post a Comment
0 Comments