चर्चगेट केंद्राचा दणदणीत जल्लोष
आरूष कोल्हेच्या तुफानी १६३ धावांनी विजेतेपदावर
मोहोर!
३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती
क्रिकेट स्पर्धेत चर्चगेट केंद्राचा दबदबा
जय म्हात्रे, शार्दुल फागरे, निखिल गुरव यांचीही चमकदार कामगिरी
मुंबई : न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या मैदानावर रंगलेल्या
३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चर्चगेट
केंद्राने अक्षरशः एकहाती वर्चस्व गाजवत विजेतेपदावर आपले नाव
सुवर्णाक्षरांनी कोरले. पहिल्या डावात ठाणे केंद्राला अवघ्या १३८ धावांत रोखल्यानंतर
चर्चगेट केंद्राने तब्बल ३७० धावांचा डोंगर उभा करत पहिल्या डावातील भक्कम
आघाडीच्या जोरावर किताब पटकावला. या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो
म्हणजे आरूष कोल्हे! त्याने खेळलेली झंझावाती १६३ धावांची अप्रतिम खेळी ही अंतिम
सामन्याची सर्वात मोठी आकर्षण ठरली.
आरूष कोल्हेची तुफानी खेळी; चर्चगेटचा डाव भक्कम
पहिल्या दिवसअखेर ३ बाद १२४ धावांवर असलेल्या चर्चगेट
केंद्राने दुसऱ्या दिवशी आक्रमक फलंदाजीचा धडाका लावत सामना पूर्णपणे आपल्या
ताब्यात घेतला. आरूष कोल्हेने संयम, तंत्र आणि आक्रमण यांचा सुरेख संगम साधत १६३
धावांची भव्य खेळी उभारली. त्याला निखिल गुरव (७७) आणि शार्दुल फागरे (६८) यांनी उत्तम साथ दिली. या त्रिकुटाच्या
फलंदाजीमुळे चर्चगेट केंद्राने १२४ षटकांत ७ बाद ३७० धावांचा प्रचंड डोंगर उभारला
आणि ठाणे केंद्राचे आव्हान पूर्णपणे संपवले. अंतिम फेरीतील या अविस्मरणीय
खेळीबद्दल आरूष कोल्हे याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
जय म्हात्रे आणि निखिल गुरवचा भेदक मारा
अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी चर्चगेटच्या गोलंदाजांनी
ठाणे केंद्राच्या फलंदाजीची अक्षरशः वाताहत केली. जय म्हात्रे आणि निखिल गुरव यांनी प्रत्येकी ३ बळी टिपत ठाणे केंद्राला मोठी
धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पार्थ राणे (४६) आणि अथर्व गावडे (३०) यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चर्चगेटच्या अचूक आणि शिस्तबद्ध
गोलंदाजीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. ठाणे केंद्राचा डाव केवळ ३५.१ षटकांत १३८
धावांत संपुष्टात आला.
वासिम जाफरच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
भारताचे माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांच्या हस्ते विजेत्या चर्चगेट केंद्राला चषक
प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, १९९१ साली याच प्रतिष्ठित स्पर्धेत वासिम जाफर
स्वतः खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे हा क्षण खेळाडूंसाठी अधिक
प्रेरणादायी ठरला. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव उन्मेष खानविलकर तसेच एलआयसीचे प्रादेशिक व्यवस्थापक आय. प्रभाकरन उपस्थित होते.
चर्चगेट केंद्राच्या खेळाडूंचा वैयक्तिक
पुरस्कारांवरही कब्जा
या स्पर्धेत चर्चगेट केंद्राच्या खेळाडूंनी केवळ सांघिक
नव्हे तर वैयक्तिक पुरस्कारांवरही आपला दबदबा सिद्ध केला. आरूष कोल्हे याने अंतिम सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम
खेळाडू हे दुहेरी मान पटकावले. शार्दुल फागरे याने सर्वोत्तम फलंदाज आणि उदयोन्मुख फलंदाज
पुरस्कार जिंकला, तर चर्चगेटचा फिरकीपटू जय म्हात्रे याने उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारावर नाव कोरले.
युवा क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ
मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपणाऱ्या या स्पर्धेतून अनेक
युवा क्रिकेटपटूंनी आपली चमक दाखवली. भविष्यात मुंबई तसेच भारतीय क्रिकेटला नवे
तारे देण्याची क्षमता या स्पर्धेने पुन्हा एकदा सिद्ध केली. चर्चगेट केंद्राच्या
दमदार विजयाने स्पर्धेचा समारोप झाला असला तरी आरूष कोल्हे, जय म्हात्रे, शार्दुल फागरे, निखिल गुरव यांसारख्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने
क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
अंतिम सामन्याचा धावफलक
ठाणे केंद्र : ३५.१ षटकांत सर्वबाद १३८ (पार्थ राणे ४६, अथर्व गावडे ३०; जय म्हात्रे ३/१६, निखिल गुरव ३/२७) वि. चर्चगेट केंद्र : १२४ षटकांत ७
बाद ३७०
(शार्दुल फागरे ६८, आरूष कोल्हे १६३, निखिल गुरव ७७)
स्पर्धेतील मानकरी
अंतिम सामनावीर : आरूष कोल्हे (चर्चगेट केंद्र); सर्वोत्तम फलंदाज : शार्दुल फागरे (चर्चगेट
केंद्र); सर्वोत्तम गोलंदाज : राजवीर लाड (एमसीए अकादमी केंद्र); सर्वोत्तम
यष्टिरक्षक : तन्मय मालुसरे (ठाणे केंद्र); उदयोन्मुख वेगवान गोलंदाज : आरव सेठी
(वाशी केंद्र); उदयोन्मुख खेळाडू : जय म्हात्रे (चर्चगेट केंद्र); उदयोन्मुख
फलंदाज : शार्दुल फागरे (चर्चगेट केंद्र); हॅट्ट्रिक हिरो : श्लोक यादव
(घाटकोपर केंद्र); स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आरूष कोल्हे (चर्चगेट
केंद्र);
व्ही. व्ही. करमरकर पुरस्कार : शरद कद्रेकर
(ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)

Post a Comment
0 Comments