मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६
सरस्वती कन्या, श्री सह्याद्री, विद्यार्थी, शिर्सेकर महात्मा,
श्री समर्थ, सरस्वती स्पो. अ. भि. गोरेगावकर, महात्मा गांधी, ओम युवा उपांत्य
फेरीत
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी
उद्यान, दादर (प.), मुंबई येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये पुरुष, महिला आणि व्यावसायिक गटातील सामने अक्षरशः
थरारक ठरले. शिवाजी पार्क परिसरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत
खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतींमध्ये सरस्वती कन्या, श्री सह्याद्री, विद्यार्थी क्रीडा केंद्र, शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी, श्री समर्थ व्यायाम मंदिर, सरस्वती स्पोर्ट्स क्लब, अ. भि. गोरेगावकर, महात्मा गांधी आणि ओम युवा स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार
विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली.
जानवी लोंढेच्या दमदार खेळाने सरस्वती कन्या
उपांत्य फेरीत
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात सरस्वती कन्या संघाने ओम युवा स्पोर्ट्स क्लबचा १२-२ (मध्यंतर १२-१०)
असा १ डाव व २ गुणांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या विजयात जानवी लोंढे हिने ६ मिनिटे व
१.३० मि. संरक्षणासह तब्बल ८ गुणांची कमाई करत सामन्यावर अधिराज्य गाजवले.
तिच्यासोबत सेजल यादव (१.१० नाबाद, २.१० मि. संरक्षण), खुशबू सुतार (१.५० मि. संरक्षण व २ गुण), तसेच वैधवी बटावले आणि काजल दिवेकर (प्रत्येकी १.४० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट साथ
दिली. पराभूत ओम युवा संघाकडून अंजू इंगळे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), शिवानी घाग, चेतना बिक (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण व १ गुण) आणि आर्या तळेकर (३ गुण) यांनी झुंजार लढत दिली.
श्री सह्याद्रीची चुरशीच्या लढतीत बाजी
महिलांच्या आणखी एका उपांत्यपूर्व सामन्यात श्री सह्याद्री
संघाने ॐ साईश्वर सेवा मंडळावर ८-६ (मध्यंतर ८-४) असा १ डाव व २
गुणांनी विजय मिळवला. आर्या भटकर हिने नाबाद ४ मिनिटे व १.३० मि. संरक्षण करत
संघाचा बचाव भक्कम केला. तन्वी थेराडे (२.४०, ३.१० व ४ गुण), ग्रीष्मा माईन (२.१०, १.५० व २ गुण) आणि वैदेही कुंभार (२.२० मि. संरक्षण) यांनी संघाच्या विजयात मोलाची
भूमिका बजावली. ॐ साईश्वरकडून वैष्णवी परब (४ मि. संरक्षण व २ गुण), दिक्षिता कानेरकर (१.३० मि. संरक्षण), रिया कदम आणि प्रांजल पाठक (प्रत्येकी १ मि. संरक्षण) यांनी प्रयत्नांची
पराकाष्ठा केली, मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही.
विद्यार्थी क्रीडा केंद्राची प्रबोधनवर मात
पुरुष गटातील उपांत्यपूर्व सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने प्रबोधन क्रीडा
भवनचा १७-१२ (मध्यंतर ९-६) असा ५ गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या
सामन्यात जनार्दन सावंत (२.३०, २.५० मि. संरक्षण व ३ गुण), प्रतीक घाणेकर (१.५०, १.५० मि. संरक्षण), शुभम शिंदे (१.४०, १.४० मि. संरक्षण व १ गुण) आणि सम्यक जाधव (१.३० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी निर्णायक
कामगिरी केली. पराभूत प्रबोधनकडून हर्ष मोरे (१.४०, १ मि. संरक्षण व १ गुण), शांताराम परब (१.१०, २ मि. संरक्षण व १ गुण) आणि हर्षल मेहेर (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार झुंज
दिली.
शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीची
दमदार आगेकूच
पुरुष गटाच्या आणखी एका सामन्यात शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने ॐ समर्थ भारत
व्यायाम मंदिरचा १३-११ (मध्यंतर १३-६) असा १ डाव व २ गुणांनी पराभव करत उपांत्य
फेरीत प्रवेश केला. धीरज भावे (२.३०, १.३० मि. संरक्षण), अनिकेत पोटे (२ मि. संरक्षण व २ गुण), सुजल जयगडे (१.१०, ३ मि. संरक्षण), तसेच प्रतीक देव्हारे आणि गणेश झोरे (प्रत्येकी २ गुण) यांनी विजयात महत्त्वाची
भूमिका बजावली. पराभूत ॐ समर्थकडून स्वयंम साळवी (१.१० मि. संरक्षण व १ गुण), प्रथम चौगुले (२.५० मि. संरक्षण व २ गुण), श्रेयस सौंदाळकर (१ मि. संरक्षण) आणि सनी तांबे (३ गुण) यांनी चांगली झुंज दिली.
श्री समर्थ आणि सरस्वती स्पोर्ट्स क्लबची आगेकूच
पुरुष गटातील संक्षिप्त निकालांमध्ये श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स
क्लबचा ९-७ (मध्यंतर ९-३) असा १ डाव व २ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या थरारक
सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने श्री सह्याद्री संघाचा १५-१४ (मध्यंतर ८-६) असा
अवघ्या १ गुणाने पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
महिला गटात अ. भि. गोरेगावकर, महात्मा गांधी आणि ओम युवा चमकले
महिला गटातील संक्षिप्त निकालांमध्ये अ. भि. गोरेगावकर संघाने शिवनेरी सेवा
मंडळाचा १०-७ (मध्यंतर १०-३) असा १ डाव व ३ गुणांनी पराभव केला. शिर्सेकर
महात्मा गांधी संघाने अमर हिंद मंडळाचा १५-६ (मध्यंतर १५-२) असा १ डाव
व ९ गुणांनी धुव्वा उडवला. तर दिवसातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात ओम युवा
स्पोर्ट्स क्लबने श्री समर्थ व्यायाम मंदिरावर १२-११ (मध्यंतर १०-४) असा १
गुण व ६ मिनिटे राखून रोमांचक विजय नोंदवला.





Post a Comment
0 Comments