‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दिग्गज
संघांची विजयी सलामी!
परळच्या लाल मैदानावर रंगला वेग, चुरस आणि रणनीतीचा थरार
बँक ऑफ इंडिया, महावितरण, नेवल डॉक
आणि मुंबई पोलिसांचा दमदार विजय
परळच्या लाल मैदानावर व्यावसायिक खो-खोचा जल्लोष
मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह
बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्पोर्ट्स क्लब आयोजित ‘पहिली
व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’ परळ येथील ऐतिहासिक विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या लाल
मैदानावरील कै. विवेकानंद पैगावकर क्रीडानगरीत शानदार वातावरणात सुरू झाली.
उद्घाटनाच्या दिवशीच मैदानावर चुरशीचे सामने, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येक गुणासाठी झुंज पाहायला मिळाली.
आज झालेल्या सामन्यांत बँक ऑफ इंडिया, महावितरण
कंपनी, नेवल डॉक आणि मुंबई
पोलीस यांनी दमदार विजय नोंदवत विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी
राहुल सिन्हा (महाव्यवस्थापक, एचआरएमडी,
सेंट्रल ऑफिस), भारताचे माजी कुस्तीपटू आणि अर्जुन
पुरस्कार विजेते पप्पू यादव तसेच आरबीआय स्पोर्ट्स क्लबचे जनरल सेक्रेटरी
सचिन नरसप्पा उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियाचा अनुभव कामी; महानगरपालिकेवर थरारक विजय
व्यावसायिक गटाच्या पहिल्या सामन्यात बँक ऑफ इंडियाने
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा १९-१७ (मध्यंतर १०-१०) असा चुरशीच्या लढतीत २
गुणांनी पराभव केला. मध्यंतराला सामना बरोबरीत सुटल्याने प्रेक्षकांची उत्कंठा
शिगेला पोहोचली होती. मात्र अनुभवी प्रशिक्षक विवेक आंब्रे यांच्या
रणनीतीमुळे बँकेने सामन्यावर पकड मजबूत केली. विजयी संघाकडून जनार्दन सावंत
(१.३०, १.२० मि.
संरक्षण व ५ गुण), मयुरेश मोरे (१.४०, १.२० मि. संरक्षण व १ गुण),
अर्पित तिवारी (१, १.४० मि. संरक्षण व २
गुण) आणि मनोज चौधरी (१.२० मि. संरक्षण व ५ गुण) यांनी
अप्रतिम खेळ करत विजय निश्चित केला. तर पराभूत महानगरपालिकेकडून निखिल वाघे
(१.२० मि. संरक्षण व २ गुण), आदित्य पाटील (१,
१.१० मि. संरक्षण व १ गुण), अजय मित्रा आणि निमेश चौगुले (प्रत्येकी ३ गुण) यांनी जोरदार लढत दिली,
मात्र ती अपुरी ठरली.
महावितरणचा विजेच्या वेगाने विजय; गंदेकर इलेक्ट्रिकल्सची झुंज व्यर्थ
दुसऱ्या सामन्यात महावितरण कंपनीने गंदेकर
इलेक्ट्रिकल्स प्रा. लि. वर १५-१४ (मध्यंतर १३-६) असा ७.१० मि. राखून
रोमांचक विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या महावितरणने मध्यंतरात
मोठी आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून सम्यक जाधव (१.२० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत चेंदवणकर (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) आणि प्रतीक वाईकर
(२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. तर पराभूत गंदेकर
इलेक्ट्रिकल्सकडून गौरव कुडव (४ गुण), कुशल मुकने
(१.१०, १.२० मि. संरक्षण व १ गुण) आणि
कुशांग वैश्य (३ गुण) यांनी विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले.
नेवल डॉकचा संयमी खेळ; ठाणे स्पेशल पोलीस सेलवर मात
तिसऱ्या सामन्यात नेवल डॉकने ठाणे स्पेशल पोलीस
सेलचा १०-९ (मध्यंतर ८-५) असा ७.१० मि. राखून पराभव करत शानदार विजय
नोंदवला. या सामन्यात नेवल डॉकच्या खेळाडूंनी अचूक रणनीती आणि मजबूत संरक्षणाच्या
जोरावर वर्चस्व राखले. विजयी संघाकडून सार्थक जूनघरे (१.५०, २.३० मि. संरक्षण व ३ गुण), अनंत साटळे (२, १.४०
मि. संरक्षण व ३ गुण) आणि हितेन भोईर (दोन्ही डावात
प्रत्येकी १.५० मि. संरक्षण) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर पराभूत ठाणे
स्पेशल पोलीस सेलकडून चेतन बावने (२.१० मि. संरक्षण), श्रीधर देसाई (१.२०, १.१० मि. संरक्षण व ६ गुण) आणि दीपक मोरे (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी झुंजार खेळ केला.
मुंबई पोलिसांचा ‘पोलिसी खाक्या’; यजमान आरबीआयवर थरारक विजय
दिवसातील चौथ्या आणि सर्वाधिक रंगतदार सामन्यात मुंबई
पोलिसांनी यजमान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघावर १७-१५ (मध्यंतर ९-९)
असा २ गुणांनी थरारक विजय मिळवला. मध्यंतराला सामना बरोबरीत असल्याने प्रत्येक
क्षण रोमांच वाढवत होता. अखेरीस पोलिसांच्या अचूक डावपेचांमुळे त्यांनी विजय खेचून
आणला. मुंबई पोलिसांकडून अक्षय खापरे (१.४० मि. संरक्षण व २ गुण), निखिल घाडगे (१.१०, नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण), सोहेल शेख
(१.४०, १.३० मि. संरक्षण व ५ गुण) आणि
सोहेल कलावंत (२ मि. संरक्षण व १ गुण) यांनी दमदार खेळ करत विजय निश्चित
केला. तर पराभूत आरबीआय संघाकडून अथर्व खोचाडे (१.१० मि. संरक्षण व १ गुण),
सिद्धेश चोरगे (१ मि. संरक्षण व ५ गुण), सुजल देव्हारे (१.३०, १.२० मि. संरक्षण),
हर्षल मेहर (१.३०, १ मि. संरक्षण व ३ गुण) आणि सुफीयान शेख (२.२० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी कडवी झुंज दिली,
मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.

Post a Comment
0 Comments