युनियन बँकेची बाद फेरीत दणदणीत एंट्री
तामील थलाईवास साखळीतच गारद!
सुशील खांबरे, हर्ष, आर्यन लोचन यांचा दमदार खेळ
श्रमिक जिमखान्यावर कबड्डीचा थरार शिगेला
बाद फेरीच्या दिशेने संघांची जोरदार झेप!
मुंबई : मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू
असलेल्या बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक
कबड्डी स्पर्धेत आजचा दिवस थरार, उलटफेर आणि निर्णायक विजयांनी गाजला! युनियन बँक ने सलग दुसरा
विजय मिळवत सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली, तर बलाढ्य मानल्या जाणाऱ्या तामील थलाईवास संघाला साखळीतच
गारद व्हावे लागले.
युनियन बँकेचा झंझावात – सुशील खांबरेची २०
गुणांची करामत
ड गटातील सामन्यात युनियन बँक ने रेड आर्मी वर ५१-४२ असा प्रभावी विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश
निश्चित केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पूर्वार्धात तब्बल ३ लोण देत ३२-१५ अशी भक्कम आघाडी
घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले. सुशील खांबरे याने चढाईत तब्बल २० गुण घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर रोहन तुपारे यांनी ४ पकडी करत मोलाची साथ दिली. रेड आर्मी कडून पंकजकुमार याने १८ गुण, तर अनुराग यांनी ३ पकडी घेत लढत रंगवली.
भारतीय नौदलचा पलटवार – तामील थलाईवासचा ५०-३८
ने पराभव
क गटात भारतीय नौदल संघाने पहिल्या डावातील १९-२१ पिछाडीतून जोरदार पुनरागमन करत तामील थलाईवास वर ५०-३८ असा विजय
मिळवला. या पराभवामुळे थलाईवासचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. नौदलाकडून भरत याने चढाईत ११ गुण, तर सुरजीत यांनी ४ पकडी घेत विजयात मोठा वाटा उचलला. थलाईवासकडून गौरव आणि राहुल खत्री यांनी पहिल्या
डावात चांगली झुंज दिली, मात्र उत्तरार्धात ते ढेपाळले.
मिडलाईनची थरारक बाजी – हर्षची २२ गुणांची कमाल
अ गटातील चुरशीच्या सामन्यात मिडलाईन अकॅडमी ने ओ. एन. जी. सी. (गुजरात) ला ४४-४३ अशा निसटत्या
फरकाने पराभूत करत बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. मध्यंतराला २४-२२ अशी आघाडी
मिडलाईनकडे होती. हर्ष याने चढाईत तब्बल २२ गुण घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर अमन याने ४ पकडी करत त्याला भक्कम साथ दिली. ओ. एन. जी. सी. कडून अंकित दहिया (९ गुण) आणि संजय (६ पकडी) यांनी निकराची लढत दिली.
दक्षिण मध्य रेल्वेचा दबदबा – बोनस गुणांसह विजय
ब गटात दक्षिण मध्य रेल्वे ने मुंबई पोस्टल वर प्रभावी विजय मिळवला. पूर्वार्धात एक लोण देत २६-१७ अशी आघाडी
घेतलेल्या रेल्वेने उत्तरार्धातही आपला वेग कायम ठेवत आणखी एक लोण देत विजय
निश्चित केला. आर्यन लोचन याने चढाईत १७ गुण, तर नितेश कुमार यांनी ४ पकडी घेत विजयात योगदान दिले. रेल्वेने सामन्यात
तब्बल १२ बोनस गुण वसूल केले. पोस्टलकडून अर्जुन धंदास (१६ गुण) आणि कृष्णा जगताप (७ पकडी) यांनी चांगली झुंज दिली, मात्र विजय हुकला आणि पोस्टल साखळीतच गारद झाले.
डी. पी. यु.चा संघर्ष – बरोबरी आणि पराभव
ई गटात डी. पी. यु. पुणे संघाला पहिल्या सामन्यात तामीळ क्लब विरुद्ध ४०-४० अशी बरोबरी साधता आली. मात्र दुसऱ्या सामन्यात यु. पी. योद्धा संघाने त्यांना ५०-२० असे पराभूत करत
वरचष्मा सिद्ध केला.
स्पर्धेचा थरार शिगेला; बाद फेरीची रंगत वाढली!
आजच्या सामन्यांनंतर स्पर्धेची रंगत अधिकच वाढली असून युनियन बँक ने बाद फेरीत
धडक मारत आघाडी घेतली आहे, तर तामील थलाईवास आणि मुंबई पोस्टल यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले. पुढील
सामन्यांमध्ये आणखी चुरशीच्या लढतींची अपेक्षा असून, कबड्डीप्रेमींसाठी हा महासंग्राम खऱ्या अर्थाने
पर्वणी ठरत आहे!

.jpeg)
Post a Comment
0 Comments