महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित
किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा
अजिंक्यपद खो खो स्पर्धा
किशोरी खो-खो स्पर्धेत रंगला थरार! आर्यसेना, श्री समर्थ (अ) व ॐ साईश्वरची विजयी घोडदौड
मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत चुरशीचे सामने
शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम!
मैदानावर वेग, जिद्द आणि
थराराचा स्फोट!
मुंबई : मुंबईत ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर सुरू असलेल्या किशोर-किशोरी
(सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२६-२७ मध्ये आज किशोरी गटात
जबरदस्त लढती रंगल्या. महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व मुंबई
खो-खो संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत ॐ साईश्वर सेवा मंडळ, श्री समर्थ व्या. मंदिर (अ) आणि आर्यसेना यांनी दमदार विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम
ठेवली. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी चपळता, अचूकता आणि आत्मविश्वास यांचा अप्रतिम संगम दाखवत
प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रोमहर्षक संघर्ष: आर्यसेनाचा जादा डावात थरारक
विजय
आर्यसेना विरुद्ध सरस्वती मंदिर हायस्कूल या सामन्यात नाणेफेक
आर्यसेनाने जिंकून संरक्षण स्वीकारले आणि सामना ८-६ (२-२, २-२, ४-२) असा
बरोबरीत सुटल्याने जादा डावात ५० सेकंद राखून २ गुणांनी विजय मिळवला.
आर्यसेनाच्या सौम्या मोरे (४, २,
२.४० मि. संरक्षण व १ गुण), दक्षता घोलप (सर्व
डावात नाबाद ३, ४, ३.५० मि. संरक्षण व
३ गुण), गौरी मोरे (२ गुण) यांनी
सलग दमदार कामगिरी केली. सरस्वतीकडून आरोही खरंगटे (३.१०, १.४०, २.४० मि. संरक्षण), प्रतीक्षा
मोरे (२.३०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), गौरी कांबळे (नाबाद १.२०, नाबाद ३, २.४० मि. संरक्षण व १ गुण), स्वरा लाड (३ गुण) यांनी झुंजार खेळ करत सामना रंगतदार केला.
श्री समर्थ (अ)ची सरशी: संयमी खेळातून ४ गुणांनी
विजय
श्री समर्थ व्या. मंदिर (अ) विरुद्ध ॐ समर्थ भारत व्यायाम
मंदिर या सामन्यात नाणेफेक श्री समर्थ (अ) ने जिंकून आक्रमण निवडले आणि ८-४
असा ४ गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून खुशी यादव (दोन्ही डावात नाबाद ३.१०, ३.५० मि. संरक्षण व ३ गुण), ग्रंथा वारघडे (३.१०,
१ मि. संरक्षण व १ गुण), मारवा सावंत (२.१०
मि. संरक्षण), आस्था महाडिक (४ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. ॐ समर्थ भारतकडून जिज्ञासा गायकवाड (२.५०,
१.२० मि. संरक्षण व १ गुण), श्रेया तामणकर
(१.३०, १.५० मि. संरक्षण), स्वरा
वांगडे (नाबाद २.३० मि. संरक्षण व १ गुण), साची राऊत (नाबाद
१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी प्रयत्न केले, मात्र विजय हुकला.
ॐ साईश्वरचा अचूक वार: एक गुणाने विजय
ॐ साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध श्री समर्थ (ब) या सामन्यात नाणेफेक
ॐ साईश्वरने जिंकून संरक्षण स्वीकारले आणि ४-३ (मध्यंतर ४-२) असा एक डाव १
गुणाने विजय मिळवला. विजयी संघाकडून श्री कारेकर (२.३०, नाबाद
६ मि. संरक्षण), प्रांजल फाटक (नाबाद ३.४० मि. संरक्षण व १
गुण), मुद्रा जाधव (१ मि. संरक्षण व १ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. पराभूत संघाकडून आरती यादव (३.१० मि.
संरक्षण व १ गुण), समृद्धी ठाणेकर (२.५० मि. संरक्षण),
निधी कदम (२ गुण) यांनी चांगली झुंज दिली,
मात्र विजय निसटला.
खेळाडूंची जिद्द आणि स्पर्धेची रंगत शिगेला
आजच्या सर्व सामन्यांमध्ये किशोरी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, वेग आणि अचूकता ही खऱ्या अर्थाने
भविष्यातील खो-खोचे चित्र रंगवणारी ठरली. प्रत्येक सामन्यातील सलग कामगिरी,
शेवटच्या क्षणापर्यंतचा संघर्ष आणि विजयासाठीची धडपड यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली आहे.

Post a Comment
0 Comments