Type Here to Get Search Results !

भारतीय नौदलाचा दणदणीत विजय! “बंड्या मारूती अमृत महोत्सवी” चषकावर नाव कोरले भरत हुडा ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू यु. पी. योद्धावर ४६-२७ अशी एकतर्फी मात


 

भारतीय नौदलाचा दणदणीत विजय!

“बंड्या मारूती अमृत महोत्सवी” चषकावर नाव कोरले

भरत हुडा ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

यु. पी. योद्धावर ४६-२७ अशी एकतर्फी मात

 

मुंबई :- कबड्डीच्या रंगभूमीवर थरार, ताकद आणि रणनीतीचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला आणि अखेर भारतीय नौदलाने दमदार खेळ करत “बंड्या मारूती अमृत महोत्सवी” अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला! अंतिम फेरीत यु. पी. योद्धा संघावर ४६-२७ अशी एकतर्फी मात करत नौदलाने रोख ५०००००/- व चषक आपल्या नावावर केला, तर उपविजेत्या यु. पी. संघाला ३०००००/- वर समाधान मानावे लागले. या स्पर्धेला एलआयसी ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया ने प्रायोजकत्व दिले होते.

 

नौदलाचा सुरुवातीपासून दबदबा; सलग लोण देत विजय पक्का

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ सावध होते, पण काही मिनिटांतच भारतीय नौदलाने गती वाढवत पहिला लोण देत १६-१० अशी आघाडी घेतली. गगन गौडा याने एकाच चढाईत ३ गडी टिपत सामना रंगवला, मात्र नौदलाने पूर्वार्धात आणखी एक लोण देत २७-१८ अशी भक्कम आघाडी मिळवली. उत्तरार्धात शिलकी गड्याची पकड करत दुसरा लोण (३०-१८) आणि त्यानंतर तिसरा लोण देत ४१-२३ अशी आघाडी वाढवली. येथेच यु. पी. संघाची लढत कोलमडली.

 

भरत हुडाचा करिष्मा; रोहित तोमरची साथ

नौदलाच्या विजयात भरत हुडा याने चढाईत १५ गुण मिळवत निर्णायक भूमिका बजावली, तर रोहित तोमर याने ११ गुण घेत आक्रमण अधिक धारदार केले. बचावात नितेश (४ पकडी) आणि रिंकू (३ पकडी) यांनी मजबूत साथ दिली. यु. पी. योद्धाकडून मनू (१० गुण) आणि गगन गौडा (८ गुण) यांनी प्रयत्न केले, पण बचाव कमकुवत ठरल्याने विजय दूर राहिला.

 

भरत हुडा सर्वोत्तम खेळाडू; आकर्षक बक्षिसांची लयलूट

स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भरत हुडा याला “सर्वोत्तम खेळाडू” म्हणून गौरविण्यात आले आणि त्याला रोख १०००००/- प्रदान करण्यात आले. तसेच यु. पी. योद्धा संघातील गगन गौडा (उत्कृष्ट चढाई) आणि सचिन (उत्कृष्ट पकडी) यांना प्रत्येकी ५००००/- देऊन सन्मानित करण्यात आले. उपांत्य उपविजेत्या संघांना प्रत्येकी १०००००/- व चषक प्रदान करण्यात आले.

 

उपांत्य फेरीतून अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

उपांत्य सामन्यात भारतीय नौदलाने युवा पलटन (इंशोअरकोट प्रा. लि.) चा पराभव केला, तर यु. पी. योद्धाने युनियन बँकेवर मात करत अंतिम फेरी गाठली होती. महाराष्ट्रातील युनियन बँक आणि युवा पलटन यांनी देखील स्पर्धेत तोडीसतोड खेळ करत आपला ठसा उमटवला.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा

स्पर्धेचा भव्य समारोप महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तिकर, आमदार ॲड. अनिल परब, आमदार सचिन अहिर आणि बंड्या मारूतीचे आधारस्तंभ सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. अमृत महोत्सवी वर्षात झालेली ही स्पर्धा केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून कबड्डीच्या जिद्दीचा, ताकदीचा आणि परंपरेचा भव्य उत्सव ठरली. भारतीय नौदलाचा विजय हा त्यांच्या शिस्तबद्ध खेळाचा आणि उत्कृष्ट संघभावनेचा परिपाक ठरला!


Post a Comment

0 Comments