बदलापूरने पाहिला महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉलचा
‘सुवर्णकाळ’
छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेने राज्य
व्हॉलीबॉलला दिली नवी दिशा
मुंबई, कोल्हापूर, पुणे, लातूरला
विजेतेपद
रात्री अडीच वाजेपर्यंत रंगला व्हॉलीबॉलचा थरार, बदलापूरकरांचा उदंड प्रतिसाद
ठाणे : बदलापूरमध्ये पार पडलेली छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय
व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संस्कृतीचा नवा
अध्याय ठरली. राज्यातील ८ विभागांतील तब्बल ३८४ खेळाडूंनी पाच दिवस मैदान गाजवत
व्हॉलीबॉलची ताकद, वेग, कौशल्य आणि लोकप्रियता पुन्हा अधोरेखित केली. विशेष म्हणजे
ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता बदलापूरच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक
ठरली.
बदलापूरकरांनी घडवला ‘हाऊसफुल’ इतिहास
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रेक्षक मिळत नाहीत, हा समज बदलापूरकरांनी अक्षरशः मोडून काढला.
रात्री अडीच वाजेपर्यंत गॅलरी हाऊसफुल राहणे ही महाराष्ट्रातील शासकीय
स्पर्धांसाठी अभूतपूर्व घटना मानावी लागेल. लातूर विरुद्ध मुंबई अंतिम सामना
पाहण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी हेच या स्पर्धेच्या यशाचे सर्वात मोठे
प्रमाण ठरले. व्हॉलीबॉल हा फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित खेळ नाही, तर योग्य नियोजन, आकर्षक आयोजन आणि दर्जेदार सामने मिळाले तर शहरी
भागातही तो प्रचंड लोकप्रिय ठरू शकतो, हे बदलापूरने सिद्ध केले.
मुंबई आणि लातूरची ताकद; कोल्हापूर-पुण्याची शिस्त
स्पर्धेतील विजेते संघ पाहिले तर प्रत्येक संघाने आपल्या
वेगळ्या शैलीत मैदान गाजवले.
लातूर संघाने २१ वर्षांखालील मुलांच्या गटात आक्रमक
आणि वेगवान खेळाचे दर्शन घडवत पुन्हा एकदा राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. निर्भय देशमुख, शेहराज खान आणि आफताब कुरेशी यांच्या खेळात आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय
दर्जाची झलक दिसली.
मुंबईच्या मुलींनी पिछाडीवरून पुनरागमन करत अंतिम विजय मिळवला. शिवप्रिया पनीकर, दिव्या मेहता आणि वेदिका सामगिर यांनी दबावाखाली खेळण्याची क्षमता दाखवली.
कोल्हापूर संघाने १८ वर्षांखालील मुलांच्या गटात जिद्द, चिकाटी आणि संयम यांचा सुरेख मेळ घालत विजेतेपद
पटकावले. वैभव ढगे, उत्कर्ष पाटील, संजोग पाटील आणि जुनेद शेख यांनी निर्णायक क्षणी जबाबदारी उचलली.
पुण्याच्या मुलींनी अनुभवाच्या जोरावर एकतर्फी अंतिम सामना जिंकत
आपली तांत्रिक गुणवत्ता दाखवून दिली. साक्षी साळुंखे, वैष्णवी अडलिंगे आणि श्रेया चव्हाण यांनी उत्कृष्ट समन्वय साधला.
स्पर्धेचा खरा ‘गेम चेंजर’ — उत्कृष्ट आयोजन
या स्पर्धेचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू म्हणजे नियोजन.
प्रकाशझोतातील सामने, खेळाडूंसाठी दर्जेदार व्यवस्था, वेळेचे काटेकोर नियोजन आणि प्रेक्षकाभिमुख
वातावरण यामुळे ही स्पर्धा राज्यातील इतर स्पर्धांसाठी आदर्श ठरली.
विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, क्रीडा विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र
येऊन स्पर्धेला मोठे स्वरूप दिले. नगरसेवक किरण भोईर यांनी थेट प्रेक्षक गॅलरीत जाऊन समालोचन करणे
हीदेखील स्पर्धेतील वेगळी आणि लक्षवेधी बाब ठरली. त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक
यांच्यातील भावनिक नाळ अधिक घट्ट झाली.
₹२३ लाखांची बक्षिसे; राज्य स्पर्धांना नवे ‘स्टेटस’
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तब्बल ₹२३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे देण्यात येणे ही
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घटना मानावी लागेल. यामुळे खेळाडूंना
आर्थिक प्रोत्साहन मिळालेच, पण व्हॉलीबॉलकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची
मानसिकताही तयार होईल.
आजवर क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षित राहिलेल्या
व्हॉलीबॉलसाठी अशा स्पर्धा नवसंजीवनी देणाऱ्या ठरत आहेत.
महाराष्ट्र व्हॉलीबॉलला मिळाली नवी ऊर्जा
या स्पर्धेने एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे हाराष्ट्रात
व्हॉलीबॉलची गुणवत्ता अजूनही मजबूत आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंची जिद्द, शहरी संघांचे तांत्रिक कौशल्य आणि प्रशिक्षकांचे
नियोजन यामुळे राज्याचा व्हॉलीबॉल पुन्हा राष्ट्रीय पातळीवर चमकू शकतो.
बदलापूरमध्ये रंगलेला हा थरार फक्त पाच दिवसांचा नव्हता; तो महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉलच्या भविष्यासाठी
आशेचा किरण ठरला.




Post a Comment
0 Comments