मल्लखांब क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल
आशिष-संचिता देवल दाम्पत्याचा राज्यस्तरीय गौरव
‘सर्वद स्टार २०२६’ पुरस्काराने सन्मान
२५ वर्षांच्या अखंड कार्याला मिळाली मोठी दाद
मुंबई : मल्लखांबच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्य वाहून
घेतलेल्या आशिष देवल आणि संचिता देवल या दाम्पत्याच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव
करण्यात आला असून, त्यांच्या अथक परिश्रमांना मानाचा मुजरा मिळाला आहे!
बोरीवली येथील सर्वद फाउंडेशनतर्फे नुकत्याच आयोजित भव्य सोहळ्यात या राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि प्रशिक्षक
दाम्पत्याला प्रतिष्ठेचा ‘सर्वद स्टार २०२६’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
३८० अर्जांतून ३० मान्यवरांची निवड
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतून
प्राप्त झालेल्या तब्बल ३८० अर्जांची छाननी करून अंतिम ३० मान्यवरांची निवड करण्यात आली होती. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय
योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये आशिष देवल आणि संचिता देवल यांच्या नावाची निवड विशेष ठरली.
मान्यवरांच्या हस्ते सन्मान
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे, विद्यावाचस्पती डॉ. मिलिंद भोसुरे, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन सालेकर, कर्ममूर्ती महादेव रानडे सर तसेच सर्वद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता
पाटील यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
२५ वर्षांहून अधिक काळ मल्लखांब सेवेत
गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ मल्लखांब
खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी देवल दाम्पत्याने सातत्याने कार्य केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील
खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही अनेक
गुणवंत मल्लखांबपटू घडवले आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन योगदानामुळे महाराष्ट्रात
मल्लखांब चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे.
‘मल्लखांब लव’ यूट्यूब चॅनलची जगभर दखल
मल्लखांब खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आशिष आणि संचिता देवल यांनी जगातील
पहिले मल्लखांब यूट्यूब चॅनल ‘मल्लखांब लव’ सुरू केले. डिजिटल माध्यमातून मल्लखांबचा प्रचार
करणाऱ्या त्यांच्या या उपक्रमामुळे देश-विदेशातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना
मल्लखांबची माहिती आणि प्रशिक्षण सहज उपलब्ध झाले आहे.
पुरस्कार म्हणजे कार्याची मोठी पावती
राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि मल्लखांब प्रचारक म्हणून कार्यरत
असलेल्या देवल दाम्पत्यासाठी हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या समर्पित कार्याची
मोठी पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या सन्मानामुळे मल्लखांब क्षेत्रात कार्य
करणाऱ्या अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार आहे.


Post a Comment
0 Comments