Type Here to Get Search Results !

कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत युवा खेळाडूंचा धडाका! अर्हान जैनचे दमदार ९३, प्रेरित राऊतची ६ बळींची जादू आणि आदित्य सिंगची वादळी ९५ धावांची खेळी चर्चेत तिसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी फलंदाज आणि गोलंदाजांचा थरार विविध केंद्रांची दमदार कामगिरी

 



कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत युवा खेळाडूंचा धडाका!

अर्हान जैनचे दमदार ९३, प्रेरित राऊतची ६ बळींची जादू आणि आदित्य सिंगची वादळी ९५ धावांची खेळी चर्चेत

तिसऱ्या फेरीच्या पहिल्या दिवशी फलंदाज आणि गोलंदाजांचा थरार 

विविध केंद्रांची दमदार कामगिरी

 

मुंबई : न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा २०२६ च्या तिसऱ्या फेरीत युवा क्रिकेटपटूंनी पहिल्याच दिवशी जबरदस्त कामगिरी करत मैदान गाजवले. एका बाजूला बोरिवली केंद्राचा कर्णधार अर्हान जैन याने दबावाखाली खेळत शानदार नाबाद ९३ धावा फटकावून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली, तर दुसरीकडे प्रेरित राऊत याने भेदक गोलंदाजी करत अवघ्या १५ धावांत ६ बळी घेत बोईसर केंद्राचा डाव उद्ध्वस्त केला. त्यानंतर आदित्य सिंग याने ५६ चेंडूत १४ चौकारांसह ९५ धावांची तुफानी खेळी करत विरार केंद्राला भक्कम आघाडी मिळवून दिली.

 

अर्हान जैनची झुंजार खेळी; निखिल गुरव-शौर्य राणेची गोलंदाजी प्रभावी

सचिन तेंडुलकर जिमखान्यावर झालेल्या सामन्यात बोरिवली केंद्राने प्रथम फलंदाजी करत ५३.१ षटकांत सर्वबाद १९६ धावा केल्या. संघ संकटात असताना कर्णधार अर्हान जैन याने शानदार ९३ धावांची खेळी करत डाव सावरला, तर मनवीर दलवी याने ३१ धावांची साथ दिली. चर्चगेट केंद्राकडून डावखुरे फिरकीपटू निखिल गुरव याने ४/४१ आणि शौर्य राणे याने ३/२५ अशी प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात चर्चगेट केंद्राने दिवसअखेर २२ षटकांत ३ बाद ६४ धावा केल्या असून शार्दूल फगरे ३१ धावांवर खेळत आहे.

 

कालिना केंद्राचा धावांचा डोंगर

एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब मैदानावर कालिना केंद्राने दमदार फलंदाजी करत ८० षटकांत ५ बाद ३३२ धावांचा भक्कम डोंगर उभारला. सत्यम यादव ९६ धावांवर दुर्दैवीरीत्या शतकापासून दूर राहिला, तर श्रेयस खिलारे याने ९५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. जियान काळे याने ६१ धावा आणि निर्वाण शाह याने नाबाद ४९ धावा करत संघाची धावसंख्या मजबूत केली.

 

राजवीर लाड आणि देवाशीष घोडकेची एमसीए अकॅडमीसाठी कमाल

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन मैदानावर एमसीए अकॅडमी केंद्राने वाशी केंद्रावर वर्चस्व राखले. प्रथम फलंदाजी करताना वाशी केंद्राचा डाव ३१ षटकांत १३१ धावांत संपुष्टात आला. वैभव थोरावे याने नाबाद ५० धावा केल्या; मात्र राजवीर लाड याच्या ५/२५ या भेदक गोलंदाजीपुढे इतर फलंदाज अपयशी ठरले. प्रत्युत्तरात एमसीए अकॅडमीने ३७ षटकांत ७ बाद १९७ धावा केल्या. देवाशीष घोडके याने ७६ धावांची दमदार खेळी केली, तर आयुष वरंकर याने ३/२६ अशी गोलंदाजी केली.

 

अद्वित तिवारी आणि आदित्य पांडेचा दुहेरी प्रभाव

आरसीएफ स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात माटुंगा केंद्राचा डाव ३२.५ षटकांत १३२ धावांत आटोपला. शुभम जायसवाल याने ५० धावा केल्या; मात्र अद्वित तिवारी ४/२१ आणि शौर्य नवले ४/१६ यांच्या अचूक माऱ्यामुळे माटुंग्याचा डाव कोसळला. प्रत्युत्तरात घाटकोपर केंद्राने ४५ षटकांत ८ बाद १३७ धावा करत आघाडी घेतली. अद्वित तिवारी नाबाद ३२ आणि शौर्य स्वामी ३० यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या; मात्र आदित्य पांडे याने ६/५१ अशी अप्रतिम गोलंदाजी करत सामना रंगतदार बनवला.

 

अर्णव संत आणि स्वरूप आंब्रेचा डोंबिवलीसाठी मारा

माटुंगा जिमखान्यावर झालेल्या सामन्यात बदलापूर केंद्राचा डाव १८९ धावांत आटोपला. अर्णव निकळजे याने ६५ आणि आयुष कचवे याने ३२ धावा केल्या. डोंबिवलीकडून अर्णव संत याने ४/२८ आणि स्वरूप आंब्रे याने ३/४६ अशी प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात डोंबिवली केंद्राने १० षटकांत ३ बाद ६२ धावा केल्या असून स्मित पोमेंडकर ३२ धावांवर खेळत आहे.

 

ठाणे केंद्राचा अचूक मारा

डीपीझेड सीसी मैदानावर कल्याण केंद्राने ६७.१ षटकांत २१७ धावा केल्या. सार्थ पाटील याने ५३, सृजन बोर्से ३७ आणि अंश नथवानी ३४ धावा केल्या. ठाणे केंद्राकडून अथर्व गावडे ३/३० आणि ईशान काळे ३/३७ यांनी भेदक गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात ठाणे केंद्राने ५ षटकांत बिनबाद २२ धावा केल्या.

 

विरार केंद्राचा एकतर्फी दबदबा

साईनाथ स्पोर्ट्स क्लबवर बोईसर केंद्राचा डाव अवघ्या ११४ धावांत गुंडाळण्यात प्रेरित राऊत याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या १५ धावांत ६ बळी घेत प्रतिस्पर्ध्याचे कंबरडे मोडले. हार्दिक गजमल याने ३/३० अशी उत्तम साथ दिली. बोईसरकडून निहाल खान ५० आणि हर्ष पाटील ४० यांनी काहीसा प्रतिकार केला. प्रत्युत्तरात विरार केंद्राने ३९ षटकांत ३ बाद २०३ धावांची मजल मारली. आदित्य सिंग याने ५६ चेंडूत १४ चौकारांसह ९५ धावांची झंझावाती खेळी करत सामना एकतर्फी केला, तर वासिफ शेख ३३ आणि ओंकार नाईक ३१ यांनी चांगली साथ दिली.


Post a Comment

0 Comments