Type Here to Get Search Results !

खो-खोत धाराशिव-ठाणे अंतिम फेरीत कबड्डीत मुंबई उपनगर, गंगाखेड, बारामती, सांगलीची उपांत्य फेरीत धडक राज्य निमंत्रित महिला खो-खो स्पर्धेत रंगतदार सामने; कबड्डीत दमदार विजयांची मालिकाच

 


खो-खोत धाराशिव-ठाणे अंतिम फेरीत

कबड्डीत मुंबई उपनगर, गंगाखेड, बारामती, सांगलीची उपांत्य फेरीत धडक

राज्य निमंत्रित महिला खो-खो स्पर्धेत रंगतदार सामने; कबड्डीत दमदार विजयांची मालिकाच

सोलापूर : हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने, सोलापूर जिल्हा कबड्डी व खो-खो असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थकोट प्रशाला मैदानावर सुरू असलेल्या राज्य निमंत्रित महिला खो-खो व कबड्डी स्पर्धेत शुक्रवारी थरारक सामने रंगले. खो-खो स्पर्धेत ठाण्याचे ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन आणि धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ यांनी शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. तर कबड्डीत स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), आनंदवन महिला संघ (गंगाखेड-परभणी), बारामती स्पोर्ट्स अकॅडमी आणि प्रोग्रेस अकॅडमी (सांगली) यांनी उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले.

 

दिव्या-धनश्रीच्या अष्टपैलू खेळीने ज्ञानविकासची अंतिम फेरीत झेप

खो-खोच्या पहिल्या उपांत्य सामन्यात ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन, ठाणे संघाने आपल्या जिल्ह्यातीलच प्रतिस्पर्धी शिवभक्त क्रीडा मंडळ यांचा १५-१३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला मिळवलेली ७-४ ची आघाडी निर्णायक ठरली. ज्ञानविकासकडून दिव्या गायकवाड (४.००, २.४० मिनिटे संरक्षण व ३ गुण) आणि धनश्री कंक (१.५० मिनिटे संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत शिवभक्तकडून रेश्मा राठोड (२.००, २.१० मिनिटे संरक्षण व २ गुण) हिने झुंजार खेळ केला, मात्र तो अपुरा ठरला.

 

अश्विनी-सुहानीच्या खेळीने धाराशिवचा दणदणीत विजय

दुसऱ्या उपांत्य सामन्यात छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, धाराशिव संघाने आर्यन स्पोर्ट्स क्लब, रत्नागिरी यांचा ११-६ असा एक डाव राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली. धाराशिवच्या विजयात अश्विनी शिंदे (३.५० मिनिटे संरक्षण व ३ गुण) आणि सुहानी धोत्री (४ गुण व १.२० मिनिटे नाबाद संरक्षण) यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रत्नागिरीकडून पायल पवार (१.०० मिनिटे संरक्षण व २ गुण) हिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र संघाचा पराभव टाळू शकली नाही.

 

बारामतीचा वैष्णवी क्लबवर एकतर्फी विजय

कबड्डीच्या साखळी फेरीतील सामन्यात बारामती स्पोर्ट्स अकॅडमीने वैष्णवी क्लब, परभणी संघावर ५३-२२ असा दणदणीत विजय मिळवला. बारामतीकडून निकिता लंगोटे आणि वैष्णवी चव्हाण यांच्या चढाया विशेष प्रभावी ठरल्या. त्यांच्या आक्रमक खेळामुळे प्रतिस्पर्धी संघावर सतत दबाव राहिला.

 

आनंदवन महिला संघाची विजयी घोडदौड कायम

आनंदवन महिला संघ, गंगाखेड (परभणी) यांनी विश्वशांती क्रीडा मंडळ यांचा ३७-१२ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. विजयी संघाकडून कीर्ती ढीगोळे, लावण्या वाडेकर, आसफिया शेख आणि यशस्वी इंगोले यांच्या चढाया तर शितल मगळेकावेरी आडे यांच्या पकडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या.

 

निकिता-कोमलच्या चढायांनी बारामतीचा आणखी एक विजय

दुसऱ्या सामन्यात निकिता कवडे आणि कोमल महाजन यांच्या प्रभावी चढायांच्या जोरावर बारामती अकॅडमीने नाशिक महिला संघाला ५३-२८ असे नमविले. बारामतीच्या संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

स्वराज्य स्पोर्ट्स क्लबचा दुहेरी विजय

स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर यांनी प्रथम सोलापूर महिला संघाचा ५१-२५ असा पराभव केला. या सामन्यात याशिका पुजारी, प्रज्ञा माने आणि संस्कृती माने यांच्या चढाया तर सायली सपकाळ, सई ताम्हणकर आणि श्रद्धा अचलेरी यांच्या पकडी उल्लेखनीय ठरल्या.

 

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात साकिब रंगरेज यांच्या चढाया आणि अक्षदा पादव यांच्या भक्कम पकडींच्या जोरावर स्वराज्यने प्रोग्रेसिव्ह स्पोर्ट्स क्लबला ४०-२१ असे नमवत उपांत्य फेरीतील स्थान अधिक भक्कम केले.

इतर सामन्यांचे निकाल

क्रांतीज्योत क्रीडा मंडळ यांनी सोलापूर महिला संघाचा ६१-२३ असा पराभव केला. तर आनंदवन महिला संघ, परभणी यांनी नाशिक महिला संघावर ४५-३६ अशी मात करत आपली विजयी वाटचाल कायम राखली.


Post a Comment

0 Comments