Type Here to Get Search Results !

मुंबईत रंगणार कुस्तीचा महासंग्राम ३२ वी अखिल भारतीय महापौर केसरी स्पर्धेची रणधुमाळी होणार वडाळ्यात देशभरातील नामांकित मल्लांची उपस्थिती लाखोंच्या बक्षिसांसाठी भारतीय क्रीडा मंदिरात होणार थरारक लढती

 

मुंबईत रंगणार कुस्तीचा महासंग्राम

३२ वी अखिल भारतीय महापौर केसरी स्पर्धेची रणधुमाळी होणार वडाळ्यात

देशभरातील नामांकित मल्लांची उपस्थिती

लाखोंच्या बक्षिसांसाठी भारतीय क्रीडा मंदिरात होणार थरारक लढती

 

मुंबई : मुंबईतील कुस्तीप्रेमींसाठी मे महिना यंदा अक्षरशः पर्वणी ठरणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६ रोजी भारतीय क्रीडा मंदिर, नारायण क्रॉस रोड, वडाळा, मुंबई येथे रंगणार आहे. देशभरातील नामांकित आणि अव्वल दर्जाचे मल्ल या स्पर्धेत आपले दमदार डाव आजमावणार असल्याने मुंबईत कुस्तीचा थरार शिगेला पोहोचणार आहे.

 

महापौर केसरी किताबासाठी लाखोंची बक्षिसे

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत विविध वजन गटांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत. विशेष आकर्षण असलेल्या महापौर केसरी गटात ८२ किलोपेक्षा अधिक वजन गटासाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल १ लाखांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार, तृतीय क्रमांकासाठी ३२ हजार आणि चतुर्थ क्रमांकासाठी २२ हजारांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

 

कुमार गटातील युवा मल्लांनाही सुवर्णसंधी

स्पर्धेत १७ वर्षांखालील ५० ते ६० किलो वयोगटातील कुमार मल्लांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आला असून, या गटातील विजेत्याला २५ हजारांचे आकर्षक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. युवा कुस्तीपटूंना मोठ्या व्यासपीठावर चमक दाखवण्याची ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

 

कोकण विभागातील मल्लांसाठी विशेष गट

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पालघर आणि रायगड या कोकण विभागातील कुस्तीगीरांसाठी विशेष राखीव गट ठेवण्यात आले आहेत. ५५ ते ६२ किलो, ६२ ते ७२ किलो आणि ७२ ते ८२ किलो अशा विविध वजन गटांमध्ये सामने होणार असून, विजेत्या मल्लांना रोख पारितोषिकांसह चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

उद्घाटन आणि अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष

स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार असून त्यानंतर रंगणार आहेत दमदार कुस्ती सामने. १५ मे रोजी सकाळपासून अंतिम फेरीच्या लढती आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. विशेष म्हणजे बक्षीस वितरण सोहळ्यास मुंबई महापौर सौ. रितू राजेश तावडे आणि उपमहापौर मा. संजय घाडी उपस्थित राहणार आहेत.

 

स्पर्धकांसाठी नियम आणि विशेष सुविधा

स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे नियम लागू राहणार असून, सर्व स्पर्धकांनी आधारकार्डाची मूळ प्रत आणि चार फोटो सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १७ वर्षांखालील गटासाठी वयोमर्यादा ३१ मे २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सहभागी मल्लांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

यूट्यूबवर थेट प्रक्षेपण; अनुभवी निवेदकांची साथ

ही संपूर्ण स्पर्धा कुस्ती हेच जीवन” या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. स्पर्धेचे निवेदन पै. सुरेश जाधव, चिंचोली करणार असून, पारंपरिक वातावरण अधिक रंगतदार करण्यासाठी हलगीवादन रणजित साठे, वाटेगाव सादर करणार आहेत.

 

संपर्कासाठी आयोजकांचे आवाहन

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मा. श्री. प्रकाश तानवडे (सरचिटणीस, मुंबई शहर तालीम संघ) (संपर्क क्रमांक : ९८२१७१७८३५ / ८७८९८५७४५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments