महापौर केसरीत रंगली मल्लांची रणधुमाळी
प्रतिक, बालाजी, इम्रान आणि मुंतजीर उपांत्य फेरीत धडक!
आंतरराष्ट्रीय मल्लांचा दमदार खेळ
भारतीय क्रीडा मंदिरात कुस्तीप्रेमींचा जल्लोष
मुंबई : वडाळ्यातील भारतीय क्रीडा मंदिराच्या लाल मातीत
गुरुवारी अक्षरशः कुस्तीचा थरार उसळला आणि दमदार डावपेच, चितपट लढती व चुरशीच्या संघर्षांनी प्रेक्षकांना
खिळवून ठेवले. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ आयोजित ३२ वी अखिल
भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली असून, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिक देशमुख, बालाजी मेटकरी, इम्रान मुजावर आणि मुंतजीर सरनोबत यांनी आपल्या
प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता उपांत्य
फेरीत प्रतिक देशमुख विरुद्ध इम्रान मुजावर तर बालाजी मेटकरी विरुद्ध मुंतजीर सरनोबत अशी जबरदस्त लढत
रंगणार असल्याने कुस्तीप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रतिक देशमुखची तांत्रिक चितपट; इम्रान-मुंतजीरचीही दमदार आगेकूच
कझाकिस्तान येथे झालेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेतील
रौप्यपदक विजेता प्रतिक देशमुख याने ठाण्याच्या विपुल परब याला तब्बल १०-० अशा फरकाने तांत्रिक चितपट देत आपला दबदबा सिद्ध
केला. सांगलीच्या इम्रान मुजावर याने सोलापूरच्या वैभव माने याला चितपट करत पुढील फेरी गाठली. तर मुंतजीर सरनोबत याने
सोलापूरच्या सचिन काळे याचे आव्हान संपुष्टात आणले. दुसरीकडे बालाजी मेटकरी याने विनायक बजबळ याच्यावर ५-३ अशा गुणांनी मात
करत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.
आंतरराष्ट्रीय मल्लांना प्राथमिक फेरीत धक्के
या स्पर्धेत चार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी सहभाग घेतला
होता. मात्र, प्रतिक देशमुख याचा अपवाद वगळता ओमकार काटकर, सनी फुलमाळी आणि दिनेश काकडे या नामांकित
आंतरराष्ट्रीय मल्लांना प्राथमिक फेरीतच पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे स्पर्धेतील
चुरस आणखी वाढली आहे.
कुमार केसरी गटात युवा मल्लांचा झंझावात
कुमार केसरी गटातील लढतीदेखील तितक्याच रंगतदार ठरल्या. विवेक पाटील याने हर्षवर्धन जाधव याच्यावर ५-४ असा एका गुणाने
थरारक विजय मिळवला. ज्योतिधराज मुगदुम याने समर्थ बाऊलकर याच्यावर सरस गुणांच्या जोरावर विजय नोंदवला. विराज कदम याने त्रुतीराजा
मुगदुम याला ८-१ अशा फरकाने पराभूत केले. तर उत्कंठावर्धक लढतीत
ठाण्याच्या जय भोईर याने मेघराज माने याच्यावर ७-४ अशी मात केली.
विविध वजन गटांतील रंगतदार निकाल
५७ ते ६२ किलो वजनी गटात जय पाटील विजयी विरुद्ध धनंजय भंडारी, लकी खरात विजयी विरुद्ध विवेक भंडारी, जयदीप बडरे विजयी विरुद्ध अक्षय भोईर, विघ्नेश्वर मेटकर विजयी विरुद्ध प्रमोद पाटील अशी निकालांची नोंद झाली.
७२ किलो वजनी गटात गौरव यादव विजयी विरुद्ध कुणाल पाटील, सचिन शिंदे विजयी विरुद्ध यश ढाकणे, ओम काळे विजयी विरुद्ध भावेश चौधरी, तर संग्राम डवरी विजयी विरुद्ध प्रताप माने अशी दमदार कामगिरी पाहायला मिळाली.
कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
स्पर्धेचा शुभारंभ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी मुंबई
शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव प्रकाश तानवडे, नगरसेवक अमेय घोले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. भारतीय क्रीडा
मंदिरातील कुस्तीचा हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थिती
लावली होती.

Post a Comment
0 Comments