Type Here to Get Search Results !

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात रत्नागिरीच्या मुलींचाही विजयी झेंडा

 



५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

रत्नागिरीच्या मुलींचाही विजयी झेंडा

सोलापूर : नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर उभारण्यात आलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सोलापूर ॲम्युचर्स खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिव यांनी कुमार व मुली दोन्ही गटांत विजयाची नोंद केली, तर रत्नागिरीच्या मुली संघाने रायगडवर मात करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली.

 


सोलापूरच्या सिद्धार्थ-समर्थच्या अष्टपैलू खेळीने परभणीचा धुव्वा

कुमार गटातील सामन्यात सोलापूरने परभणीचा ४३-१८ असा एक डाव राखून धुव्वा उडवला. सोलापूरच्या सिद्धार्थ माने-देशमुख (१.२० मि. संरक्षण व ८ गुण) आणि समर्थ जाधव (२.०० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवले. परभणीकडून शिवराज चिंचवड, कृष्णा पुरोहित, वैभव भालेराव आणि वैजनाथ पोळे यांनी प्रत्येकी चार गडी बाद करत झुंज दिली; मात्र सोलापूरच्या आक्रमणापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

 


मुंबईची जळगाववर मात; विघ्नेश-अंश चमकले

दुसऱ्या सामन्यात मुंबईने जळगावचा ३३-२४ असा ६.२० मि. राखून मोठा पराभव केला. मुंबईच्या विघ्नेश कोरे (२.००, १.३० मि. संरक्षण व ६ गुण) आणि अंश कदम (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला. जळगावच्या आयर्न पवार (नाबाद १, १.३० मि. संरक्षण व ६ गुण) याने एकहाती लढा दिला; मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

 


प्राजक्ता-स्नेहाच्या जोरावर सोलापूरचा बीडवर डावाने विजय

मुली गटात सोलापूरने बीडचा ४१-१२ असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला. प्राजक्ता बनसोडे (२.३९, १.४० मि. संरक्षण व ८ गुण) आणि स्नेहा लामकाने (३.०५ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अप्रतिम अष्टपैलू खेळ करत बीडच्या बचावफळीची पुरती मोडतोड केली. बीडकडून दुर्गा नाईकनवरे आणि श्रद्धा खारे (१.१० मि. संरक्षण) यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले; मात्र त्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.

 


तन्वी-साक्षीच्या खेळीने रत्नागिरीची विजयी सलामी

मुलींच्या दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने रायगडवर ३०-२६ असा एक डाव राखून विजय मिळवला. रत्नागिरीच्या तन्वी खानविलकरने १.२० मि. संरक्षण करत ८ गुण मिळवले, तर साक्षी लिंगायतने १.१० मि. संरक्षण करत ६ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रायगडकडून प्रज्ञा गाडेने १.५० मि. संरक्षण करत १२ गुण अशी दमदार कामगिरी केली; मात्र तिची झुंज अपुरी ठरली.

 


कुमार गटात सांगली, पुणे, ठाणे, धाराशिवचा एकतर्फी जलवा

कुमार गटातील अन्य सामन्यांत सांगलीने लातूरचा ४५-६ असा एक डाव राखून धुव्वा उडवला, धाराशिवने नंदुरबारचा ३९-१२ असा दणदणीत पराभव केला, पुण्याने नांदेडचा ४८-२० असा एक डाव राखून समाचार घेतला, मुंबई उपनगरने रायगडला ४४-३४ असे ५.२० मि. राखून हरविले, तर ठाण्याने सिंधुदुर्गचा ४९-१२ असा एक डाव राखून अक्षरशः धुव्वा उडवला.

 


मुली गटातही विजयांची बरसात; सातारा-ठाणे-धाराशिवचा धडाका

मुली गटात सांगलीने जळगावचा ३३-१६ असा एक डाव राखून पराभव केला, साताऱ्याने हिंगोलीचा ३८-४ असा एक डाव राखून धुव्वा उडवला, पुण्याने नांदेडला ४२-१२ असे नमविले, नाशिकने सिंधुदुर्गचा ५४-१० असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला, ठाण्याने लातूरचा ५२-१२ असा एक डाव राखून चुराडा केला, तर धाराशिवने छत्रपती संभाजीनगरचा ४८-१० असा एक डाव राखून धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी आपला दबदबा सिद्ध केला.


Post a Comment

0 Comments