Type Here to Get Search Results !

रौनक, ऋषिकेश, योगेश, अजिनाथ, प्रशांत , सतीश ठरले ‘स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’! राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ताकद, जिद्द आणि विक्रमांची मेजवानी; गायत्री, शिफा, प्रेरणा, डॉ. शर्वरी , रुबी ‘स्ट्राँग वुमन’ किताबाच्या मानकरी

 


रौनक, ऋषिकेश, योगेश, अजिनाथ, प्रशांत , सतीश ठरले ‘स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’!

राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ताकद, जिद्द आणि विक्रमांची मेजवानी;

गायत्री, शिफा, प्रेरणा, डॉ. शर्वरी , रुबी ‘स्ट्राँग वुमन’ किताबाच्या मानकरी

 

मुंबई : वडाळ्यातील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात ताकद, जिद्द आणि इच्छाशक्तीचा थरार अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित इक्विप गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातील बलाढ्य खेळाडूंनी वजन उचलण्याच्या कलेचा दमदार आविष्कार घडवला. विविध गटांतील स्पर्धकांनी विक्रमी कामगिरी करत प्रेक्षकांची दाद मिळवली, तर पुरुष विभागात रौनक जितेकर, ऋषिकेश तेली, योगेश गुंड, अजिनाथ शेखाडे, प्रशांत जगताप, सतीश पाताडे यांनी आपल्या गटात ‘स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’ किताब पटकावत स्पर्धेवर अधिराज्य गाजवले.

 

स्ट्राँग मॅन’ किताबासाठी दमदार लढती

सब ज्युनिअर गटात रायगडच्या रौनक जितेकर याने ताकदीचा झंझावात निर्माण करत ‘स्ट्राँग मॅन’ किताब जिंकला. ज्युनिअर गटात सिंधुदुर्गच्या ऋषिकेश तेली याने प्रतिस्पर्ध्यांना नमवत  अव्वल स्थान पटकावले. सीनियर गटात मुंबई शहरच्या योगेश गुंड याने दणदणीत कामगिरी करत किताबावर मोहोर उमटवली. मास्टर-१ गटात संभाजीनगरच्या अजिनाथ शेखाडे, मास्टर-२ गटात पुण्याच्या प्रशांत जगताप आणि मास्टर-३ गटात ठाण्याच्या सतीश पाताडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखत ‘स्ट्राँग मॅन’ किताब आपल्या नावावर केला.

 

महिलांमध्ये ‘स्ट्राँग वुमन’ किताबासाठी चुरस

महिला विभागातही स्पर्धा तितकीच रंगतदार ठरली. सब ज्युनिअर गटात रायगडच्या गायत्री बडेकर, ज्युनिअर गटात मुंबई उपनगरच्या शिफा शेख, सीनियर गटात ठाण्याच्या प्रेरणा साळवी, मास्टर-१ गटात पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार आणि मास्टर-२ गटात मुंबईच्या रुबी दास यांनी आपल्या गटात शानदार कामगिरी करत ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र’ किताबावर कब्जा केला.

 

सतीश पाताडे यांची जिद्द ठरली प्रेरणादायी


मास्टर-३ गटातील ‘स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र’ किताब विजेते सतीश सुनंदा मुरलीधर पाताडे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. दुखापतीचा सामना करत त्यांनी सुवर्णपदकासह किताब जिंकत जिद्दीचे अनोखे उदाहरण घालून दिले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  आणि मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या पाताडे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ९ स्पर्धांमध्ये भारताला १९ पदके मिळवून दिली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत तब्बल २० वेळा ‘स्ट्राँग मॅन’ किताब पटकावला आहे. त्यांच्या यशात  युनायटेड क्लब
, ठाण्याचे  प्रशिक्षक अनंत चाळके यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला दिमाख

स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री व क्रीडाप्रेमी आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते झाले. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट देत भविष्यात कोकणात भव्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांनी आमदार जठार यांचा प्रतीकात्मक ‘गदा’ देऊन गौरव केला.

 

जीवनगौरव पुरस्कारांनी मानाचा मुजरा


वृत्तमानसचे वृत्तसंपादक नवनाथ दांडेकर व जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी  

स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सन्मान म्हणून दिले जाणारे ‘जीवनगौरव पुरस्कार’. यंदा ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तमानसचे वृत्तसंपादक नवनाथ दांडेकर, शिवछत्रपती पुरस्कार  प्राप्त माजी खेळाडू सौ. आशा नागेश पुजारी आणि राष्ट्रीय पंच, आंतरराष्ट्रीय पदक विजेते देवदत्त मनीबाई मार्तंड भोईर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

नवनाथ दांडेकर यांचा विशेष गौरव

गेल्या ४ दशकांपासून क्रीडा पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार नवनाथ दांडेकर यांना पॉवरलिफ्टिंग खेळाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या भरीव कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोस्ट खात्यातील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी स्वतःला पूर्णवेळ पत्रकारितेसाठी वाहून घेतले. दैनिक सामनासह विविध माध्यमांतून त्यांनी खेळाडूंना न्याय देणारे आणि विविध खेळांना प्रोत्साहन देणारे लेखन केले आहे.

 

उत्कृष्ट पंचांचाही सन्मान

स्पर्धेतील पंचांच्या कामगिरीचाही गौरव करण्यात आला. जितेंद्र यादव यांनी प्रथम, सुनील अडसूळ यांनी द्वितीय, तर ऋत्विका सरदेसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावत उत्कृष्ट पंचांचा  मान मिळवला.


Post a Comment

0 Comments