डॉ. हेगडे चषक शालेय कॅरम स्पर्धेत आर्यन, निधी, तनया, पुष्करची दमदार विजयी सलामी!
६२ शालेय कॅरमपटूंमध्ये रंगली अचूक फटक्यांची
चुरस; आदित्य
देसाई व रुद्र पोसरेकरचीही प्रभावी आगेकूच
कॅरमच्या पटावर युवा प्रतिभांचा झंझावात!
मुंबई : परेल येथील आरएमएमएस सभागृहात सुरू झालेल्या
माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक १६ वर्षांखालील शालेय विनाशुल्क
कॅरम स्पर्धेत युवा कॅरमपटूंनी पहिल्याच दिवशी अचूक फटक्यांची आतषबाजी करत
आपला दबदबा निर्माण केला. न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पाटकर विद्यालय-डोंबिवलीची निधी सावंत,
महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी आणि पोद्दार
हायस्कूल-मालाडचा पुष्कर गोळे यांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
आर्यनचा अचूक खेळ; सहज विजयाची नोंद
राष्ट्रीय स्तरावरील आश्वासक कॅरमपटू आर्यन राऊत याने
आपल्या अनुभवाचा प्रत्यय देत कार्डिनल ग्रेसियस हायस्कूलच्या विराज खरात याच्याविरुद्ध
सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. अचूक फटके आणि उत्कृष्ट नियंत्रणाच्या जोरावर
आर्यनने सहज विजय मिळवत पुढील फेरीतील स्थान निश्चित केले.
निधीची निर्णायक क्षणी बाजी
पाटकर विद्यालय-डोंबिवलीची निधी सावंत हिने चुरशीच्या सामन्यात अप्रतिम संयम दाखवला.
सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या सुळे गुरुजी शाळेच्या ग्रीष्मा धामणकर हिला
निधीने निर्णायक क्षणी मोठा बोर्ड घेत धक्का दिला आणि सामना आपल्या बाजूने फिरवत
संस्मरणीय विजय मिळविला.
तनयाची सातत्यपूर्ण कामगिरी
महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी हिने आपल्या अचूक आणि सातत्यपूर्ण खेळाच्या
जोरावर अभा टलेले हिचे आव्हान परतवून लावले. प्रारंभी अभाने चांगली झुंज
दिली, मात्र सरळ जाणाऱ्या सोंगट्यांवर
उत्कृष्ट नियंत्रण राखणाऱ्या तनयाने अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुष्कर, आदित्य आणि रुद्रचीही प्रभावी आगेकूच
स्पर्धेतील अन्य सामन्यांमध्ये पुष्कर गोळे याने रोहांशू
सोळंकी याचा पराभव करत पुढील फेरी गाठली. रत्नागिरीचा आदित्य देसाई याने
आर्यन राठोड याच्यावर मात केली, तर रुद्र पोसरेकर याने सार्थक लाड याला नमवत
आपली विजयी मोहीम सुरू ठेवली.
६२ खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धेला रंगत
विविध जिल्ह्यांतील तब्बल ६२ शालेय मुलामुलींच्या
सहभागाने सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्याच फेरीपासून रोमांचक सामने पाहायला
मिळत आहेत. शालेय कॅरमपटूंना दर्जेदार स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या
उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेकडे कॅरमप्रेमींचे विशेष लक्ष लागले
आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आयडियलचे सल्लागार विलास डांगे,
क्रीडाप्रेमी विजय रायमाने, दिलीप
वरेकर, नितीन कोलगे आणि शिवछत्रपती
पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण
वातावरणात पार पडले.

Post a Comment
0 Comments