Type Here to Get Search Results !

वडाळ्यात जागतिक ऑलिम्पिक दिनाचा जल्लोष २५० खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींची प्रेरणादायी उपस्थिती 'खेळ, शिस्त आणि ध्येयवाद'चा संदेश पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते ऑलिम्पिक ध्वजारोहण, आंतरराष्ट्रीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव

 


वडाळ्यात जागतिक ऑलिम्पिक दिनाचा जल्लोष

२५० खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींची प्रेरणादायी उपस्थिती

'खेळ, शिस्त आणि ध्येयवाद'चा संदेश

पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते ऑलिम्पिक ध्वजारोहण, आंतरराष्ट्रीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव

 

मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून २०२६ रोजी भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा संस्कृती, ऑलिम्पिक मूल्ये आणि युवा पिढीला प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे २५० खेळाडू, प्रशिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. ऑलिम्पिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सकाळी नेमक्या ८.३० वाजता पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते ऑलिम्पिक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जय कोळी, श्रीमती नीलिमा अडसूळ (जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई), शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित हॉकीपटू युवराज वालमिकी, अरुण केदार, विश्वास मोरे, प्रकाश ताणवडे, सोनाली सावंत, वर्षा उपाध्याय, बाळ तोरसकर, हनुमंत माळी, चेतन दयानंद, सुभाष घेरडे, मनोहर माने, विश्वंभर जाधव, निलेश लोहार, विशाल मढवी आणि भास्कर करकेरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 


ऑलिम्पिकच्या आठवणींना उजाळा; मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आश्वासन

प्रास्ताविकात जय कोळी यांनी ऑलिम्पिक खेळांचा इतिहास, महत्त्व आणि विविध संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. श्रीमती नीलिमा अडसूळ (जिल्हा कीडा अधिकारी, मुंबई) यांनी पुढील वर्षी हा कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करून ऑलिम्पिक खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू यांच्या उपस्थितीत साजरा करण्याची ग्वाही दिली.

 

आत्मविश्वास हेच यशाचे गमक : पद्मश्री उदय देशपांडे

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री उदय देशपांडे यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत शारीरिक शिक्षण प्रशिक्षणार्थींना आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. स्वतःवर विश्वास असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

 

परिश्रम आणि सातत्यावर भर

दिपक शेटे, प्रमुख कार्यवाह यांनी नियमित सराव, सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त यामुळेच उत्कृष्ट खेळाडू घडतात, असे स्पष्ट केले. दयानंद कुमार यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सर्वांना ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

युवराज वालमिकी यांची खंत; विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्याचा सल्ला

शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित हॉकीपटू युवराज वालमिकी यांनी स्वतःला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता न आल्याची खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यानुसार अथक परिश्रम करावेत, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

 

ऑलिम्पिक पदकांसाठी सुनियोजित आराखडा व कॅरमच्या ऑलिम्पिक सहभागासाठी जोरदार मागणी

बाळ तोरसकर, संयुक्त कार्यवाह, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी भारताला भरघोस ऑलिम्पिक पदके मिळवून देण्यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच अरुण केदार यांनी कॅरम या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा, अशी भूमिका मांडत या खेळाच्या जागतिक प्रसाराची माहिती दिली.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गौरव

कार्यक्रमात व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा दिपक शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तायक्वांडो खेळातील अक्षरा शानबाग (युथ एशियन गेम्स), धृव तामबिका (एशियन चॅम्पियनशिप), योगातील विधिश राऊत आणि दिव्या बाल्गी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

 

शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

आंध्रा एज्युकेशन सोसायटी, वडाळा येथील ३० विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक डॉ. सचिन तांबारे, डॉ. एन्टोनियो डीसिल्वा, दादर येथील शाळेचे २० विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक डॉ. ओमप्रकाश जोशी, तसेच मुंबई विद्यापीठाच्या बीपीएड अभ्यासक्रमातील ५० विद्यार्थी आणि ४ प्राध्यापक उपस्थित होते. विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

 

बीपीसीएचे यशस्वी व्यवस्थापन:   

प्रा. डॉ. घनश्याम काशीनाथ ढोकरट, प्रा. डॉ. जयसिंग होटकर, डॉ. नितू जोशी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी  उत्साहीपणे प्रयत्न केले व ते यशस्वी सुध्दा झाले.  

 

आभार प्रदर्शन :

वर्षा उपाध्याय, पदाधिकारी, मुंबई जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या या प्रेरणादायी आणि संस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment

0 Comments