Type Here to Get Search Results !

२७ जूनला अंधेरीत टीपीएल-३ इनडोअर क्रिकेट लीग कर जनजागृती आणि कॉर्पोरेट जगताचा भव्य संगम २ लाखांहून अधिक रोख पारितोषिके आणि ‘मोहसिन खान’च्या स्वाक्षरीची खास बॅट ठरणार आकर्षण मुंबईत रंगणार क्रिकेटचा महाउत्सव

 


२७ जूनला अंधेरीत टीपीएल-३ इनडोअर क्रिकेट लीग

कर जनजागृती आणि कॉर्पोरेट जगताचा भव्य संगम

२ लाखांहून अधिक रोख पारितोषिके आणि ‘मोहसिन खान’च्या स्वाक्षरीची खास बॅट ठरणार आकर्षण

मुंबईत रंगणार क्रिकेटचा महाउत्सव

 

मुंबई : एमजीए फाउंडेशनने महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने २७ जून रोजी ‘टॅक्स सही है प्रीमियर लीग (टीपीएल) – सिझन ३’ या भव्य स्पर्धेचे आयोजन चित्रकूट टर्फ, अंधेरी (प.) येथे करण्यात आले आहे. तब्बल २२ संघ आणि २५० हून अधिक खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा मुंबईच्या क्रीडा दिनदर्शिकेतील एक मोठा सोहळा ठरणार आहे. विशेष म्हणजे, एकाच वेळी ४ टर्फवर सामने रंगणार असल्याने दिवसभर क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

 

क्रीडा आणि कर जनजागृतीचा राष्ट्रीय संगम

ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता कर जनजागृतीच्या राष्ट्रीय अभियानाचे व्यासपीठ ठरणार आहे. जम्मू, दिल्ली, आसाम, झारखंड, जयपूर, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद येथून कर क्षेत्रातील व्यावसायिक, सल्लागार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे क्रीडा, सामाजिक जबाबदारी आणि कर साक्षरता यांचा अनोखा मिलाफ मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.

 

मान्यवरांची उपस्थिती

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर या स्पर्धेला मुंबईच्या महापौर रुतू तावडेआमदार प्रसाद लाड, आमदार सुनील प्रभू, आमदार हारून खान, अॅड. अवनीश सिंह, दिव्या सिंह, सायली कुलकर्णी, रुपेश सावरकर, राजू पेडणेकर, मनीष धुरी, देवेंद्र आंबेकर, व शैलेश फणसे आदी मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देणार आहेत. 

 

इनडोअर क्रिकेटसोबत अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची रंगणार मेजवानी

स्पर्धेत इनडोअर क्रिकेटबरोबरच पुरुष आणि महिला गटातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेमुळे क्रिकेटच्या विविध स्वरूपांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होत आहे.

 

आघाडीचे संघ मैदानात; कॉर्पोरेट क्षेत्राचाही दमदार सहभाग

इनडोअर क्रिकेट स्पर्धेत वियोम फाउंडेशन, एमजीए फाउंडेशन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इन्फिनिया लक्झरी होम्स हे आघाडीचे संघ सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, जागतिक दर्जाची कंपनी असा अब्लॉय (ASSA ABLOY) आपल्या कॉर्पोरेट संघासह मैदानात उतरणार आहे. स्मार्ट लॉक्स आणि अॅक्सेस सोल्युशन्स क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या या कंपनीच्या सहभागामुळे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाची झलक लाभणार आहे.

 

२ लाखांहून अधिक रोख पारितोषिके; ‘मोहसिन खान’च्या स्वाक्षरीची बॅट ठरणार आकर्षण

 

स्पर्धेतील विजेत्यांसाठी २ लाखांहून अधिक रोख पारितोषिके, आकर्षक चषक आणि वैयक्तिक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. विशेष आकर्षण म्हणून टीपीएल सिझन-३ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूला आयपीएलचा वेगवान गोलंदाज ‘मोहसिन खान’ याने स्वाक्षरी केलेली विशेष बॅट प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये या पुरस्काराबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

मुंबईच्या क्रीडा संस्कृतीला नवी ऊर्जा देणारा उपक्रम

टीपीएल सिझन-३ ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रीडा, कॉर्पोरेट सहभाग, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कर जनजागृतीचा बहुआयामी उत्सव ठरणार आहे. २७ जून रोजी अंधेरीतील चित्रकूट टर्फवर क्रिकेटचा उत्साह, स्पर्धात्मकता आणि जल्लोष शिगेला पोहोचणार असून, मुंबईकरांना एका वेगळ्या आणि आधुनिक क्रीडा पर्वाचा अनुभव मिळणार आहे असे सीए मनीष आग्रवाल यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments