महाराष्ट्राच्या संघात श्री गणेश आखाड्याचा
दबदबा
विशाल जाधवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी दिमाखदार
निवड!
२३ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती
स्पर्धेसाठी ९२ किलो गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
वारजे निवड चाचणीत प्रतिस्पर्ध्यांना १०-० ने
धूळ चारत गाजवला दबदबा
ठाणे : मीरा-भाईंदरच्या श्री गणेश आखाड्यातून आणखी एका दमदार मल्लाने राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली
आहे. युवा पैलवान विशाल जाधव याने पुण्यातील वारजे येथे झालेल्या २३ वर्षांखालील
वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या महाराष्ट्र संघ निवड चाचणीत ९२ किलो वजनी
गटात सर्व प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला आणि
महाराष्ट्र संघात मानाचे स्थान मिळवले. आता १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान रोहतक (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तो
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. श्री गणेश आखाड्यासाठी आणि ठाणे
जिल्ह्यासाठी ही अभिमानाची कामगिरी ठरली आहे.
एकामागून एक विजय; अंतिम लढतीत १०-० ने दणदणीत बाजी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित या निवड
चाचणीत विशाल जाधवने
सुरुवातीपासूनच आपली ताकद दाखवून दिली. पहिल्या फेरीत त्याने कोल्हापूरच्या अवधूत अवघडे याचा १०-० अशा एकतर्फी
गुणफरकाने पराभव केला. दुसऱ्या फेरीत सोलापूरच्या उदयसिंग सोडकर याला सहज नमवत
उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात पुणे जिल्ह्याच्या निरंजन माझिरे याच्यावर अत्यंत
चुरशीच्या लढतीत मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात सांगलीच्या
प्रतीक गौंड याच्यासमोर सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत त्याला कोणतीही
संधी न देता १०-० अशा दणदणीत विजयासह महाराष्ट्र संघातील स्थान
पक्के केले.
राष्ट्रीय स्पर्धेकडे महाराष्ट्राच्या आशा
२३ वर्षांखालील वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद
कुस्ती स्पर्धा १० ते १२ जुलै २०२६ दरम्यान रोहतक (हरियाणा) येथे होणार असून, या स्पर्धेत विशाल जाधव महाराष्ट्राच्या आशा उंचावणार आहे. राज्य निवड
चाचणीतील त्याच्या भेदक कामगिरीमुळे राष्ट्रीय स्पर्धेतही त्याच्याकडून दमदार
प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सराव, शिक्षण आणि यशाचा सुवर्णमेळ
विशाल जाधव सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र येथे नियमित
सराव करत असून अभिनव कॉलेज, भाईंदर येथे कला शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.
त्याच्या यशामागे वस्ताद वसंतराव पाटील आणि कुस्ती प्रशिक्षक पै. वैभव माने यांचे
सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि कठोर प्रशिक्षण लाभले आहे. मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर विशालने
राज्यस्तरावर आपली छाप उमटवली असून आता राष्ट्रीय रंगमंचावर महाराष्ट्राचा झेंडा
उंचावण्यास तो सज्ज झाला आहे.
श्री गणेश आखाड्याच्या यशस्वी परंपरेत आणखी एक
मानाचा तुरा
अलिकडच्या काळात श्री गणेश आखाड्यातील अनेक मल्लांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश
मिळवत आखाड्याची मान उंचावली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत विशाल जाधव याने महाराष्ट्र संघात स्थान मिळवत आखाड्याच्या
यशस्वी वाटचालीत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला आहे. आता रोहतक येथे होणाऱ्या
राष्ट्रीय स्पर्धेत त्याच्याकडून पदकासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याची
अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments