Type Here to Get Search Results !

दक्षिण मुंबईतील कॅरमपटूंसाठी सुवर्णसंधी! हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त भव्य रोख पारितोषिकांची कॅरम स्पर्धा दक्षिण मुंबईतील खेळाडूंना विनामूल्य सहभाग दक्षिण मुंबईत कॅरमचा रंगणार उत्सव

 


 

दक्षिण मुंबईतील कॅरमपटूंसाठी सुवर्णसंधी!

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त भव्य रोख पारितोषिकांची कॅरम स्पर्धा

दक्षिण मुंबईतील खेळाडूंना विनामूल्य सहभाग

दक्षिण मुंबईत कॅरमचा रंगणार उत्सव

 

मुंबई : दक्षिण मुंबईतील कॅरमपटूंना आपल्या कौशल्याचा ठसा उमटविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खासदार अरविंद सावंत आणि जाणीव ट्रस्ट यांच्या पुढाकाराने तसेच मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या सहकार्याने भव्य रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १२ जुलै २०२६ रोजी समाज मंदिर वातानुकूलित सभागृह, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई येथे ही स्पर्धा रंगणार असून दक्षिण मुंबईतील कॅरमप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पुरुष आणि महिला एकेरीत रंगणार चुरशीच्या लढती

या स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईतील गुणवंत आणि उदयोन्मुख कॅरमपटूंना एकाच व्यासपीठावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार असून प्रत्येक डावात विजेतेपदासाठी चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

 

पहिल्या आठ खेळाडूंना रोख पारितोषिके आणि 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब चषक'

स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम ८ क्रमांकाच्या खेळाडूंना रोख पारितोषिकांसह प्रतिष्ठेचा 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब चषक' प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ विजेतेपदापुरती मर्यादित न राहता अधिकाधिक खेळाडूंना गौरविणारी ठरणार आहे. याबाबतची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

 

सहभाग पूर्णपणे विनामूल्य; ३ जुलैपर्यंत नोंदणी

ही स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य असून दक्षिण मुंबईतील इच्छुक कॅरमपटूंनी आधार कार्डाच्या प्रतीसह दक्षिण विभागातील उबाठाच्या शिवसेना शाखेत ३ जुलै २०२६ पर्यंत आपली नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ९९८७०४५४२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

 

कॅरमला चालना देणारा उपक्रम

दक्षिण मुंबईतील स्थानिक खेळाडूंना दर्जेदार स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरणार आहे. नवोदित आणि अनुभवी कॅरमपटूंना एकाच छताखाली खेळण्याची संधी मिळणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, जुलै महिन्यात दक्षिण मुंबईत कॅरमचा रोमांचक जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

 


Post a Comment

0 Comments