Type Here to Get Search Results !

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मुंबई उपनगरचे अंतिम फेरीत दमदार आगमन कुमार गटाच्या विजेतेपदासाठी धाराशिव-मुंबई उपनगर आमनेसामने मुलींच्या गटात गतविजेत्या सांगलीसमोर ठाण्याचे आव्हान

 


५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

धाराशिव हॅट्रिकच्या उंबरठ्यावर

मुंबई उपनगरचे अंतिम फेरीत दमदार आगमन

कुमार गटाच्या विजेतेपदासाठी धाराशिव-मुंबई उपनगर आमनेसामने

मुलींच्या गटात गतविजेत्या सांगलीसमोर ठाण्याचे आव्हान


सोलापूर, दि. ५ जून (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून) : ५२ व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून कुमार गटात सलग दोन वर्षांचे विजेते धाराशिव आणि मुंबई उपनगर यांच्यात विजेतेपदासाठी थरारक लढत रंगणार आहे. सलग तिसरे विजेतेपद पटकावून हॅट्रिक साधण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या धाराशिवकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुलींच्या गटात गतविजेत्या सांगली आणि ठाणे यांनी पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठत गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती घडवून आणली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

 


मुंबई उपनगरने यजमान सोलापूरची झुंज मोडीत काढली

कुमार गटातील पहिल्या उपांत्य फेरीत यजमान आणि गत उपविजेता सोलापूर संघाने मध्यंतरापर्यंत मुंबई उपनगरला १८-१८ अशा बरोबरीत रोखून धरले होते. मात्र उत्तरार्धात मुंबई उपनगरने अचूक डावपेच राबवत ४२-४० असा निसटता पण मोलाचा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. सोलापूरकडून रोहन माने (१.१० मि. संरक्षण व १४ गुण), ओम लांडगे (२, १.१० मि. संरक्षण व ४ गुण) आणि अकबर शेख (२.१०, १.०० मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंजार खेळ केला; मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. विजयी मुंबई उपनगरकडून समर्थ सावंत (२ मि. संरक्षण व ८ गुण), साहिल वासनिक (६ गुण), प्रशांत सर्जेराव (६ गुण) आणि आर्यन चव्हाण (१, १.५० मि. संरक्षण) यांनी संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.

 


धाराशिवने पुण्याचे आव्हान परतवून हॅट्रिककडे टाकले पाऊल

दुसऱ्या उपांत्य सामन्यात सलग दोन वर्षांचे विजेते धाराशिव यांनी पुण्याचा ३३-२८ असा २.५० मि. राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. धाराशिवच्या विजयात हरद्या वसावे (१.५०, १.३० मि. संरक्षण)  याने संरक्षणात भक्कम कामगिरी केली, तर महेश पाडवी (१.१०, नाबाद १.१० मि. संरक्षण व ६ गुण) आणि जितेंद्र वसावे (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत संघाचा विजय निश्चित केला. पुण्याकडून यशराज बनसोडे (८ गुण), समर्थ चव्हाण (१.४० मि. संरक्षण व ४ गुण) आणि अद्वैत बेत (१.१०, १.३५ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी कडवी झुंज दिली; मात्र धाराशिवच्या अनुभवापुढे त्यांची सरशी झाली नाही.

 


ठाण्याचा धाराशिववर ११ गुणांनी दणदणीत विजय

मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य फेरीत ठाणे संघाने मध्यंतरातच २२-१३ अशी भक्कम आघाडी घेत धाराशिवचा ३८-२७ असा ११ गुणांनी दणदणीत पराभव केला. ठाण्याकडून धनश्री कंक (३.२७, २.०६ मि. संरक्षण व ४ गुण) आणि निधी जाधव (२.१० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ साकारला, तर वैष्णवी जाधव हिने आक्रमणात तब्बल १० गुण मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला. धाराशिवकडून मैथिली पवार (१.३७, २.१६ मि. संरक्षण व २ गुण) हिने अष्टपैलू प्रयत्न केले, तर स्वरांजली थोरात आणि सृष्टी सुतार यांनी प्रत्येकी ६ गुण मिळवले; मात्र संघाला पराभव टाळता आला नाही.

 


सांगलीने सोलापूरला नमवत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले

दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या सांगलीने यजमान सोलापूरचा २५-१९ असा ५.३० मि. राखून ६ गुणांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सांगलीकडून वेदिका तामखेडे (४ मि. संरक्षण व २ गुण), अनुष्का तामखेडे (२ मि. संरक्षण व ६ गुण) आणि भवरम्मा होटगी (१.१० मि. नाबाद, २.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी शानदार कामगिरी बजावत विजयाचा पाया रचला. सोलापूरकडून अश्विनी मांडवे (१.२५ मि. संरक्षण व ४ गुण), प्राजक्ता बनसोडे (१ मि. संरक्षण व ४ गुण) आणि कल्याणी लामकाने (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघर्ष केला; मात्र सांगलीच्या भक्कम खेळापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

 

अंतिम फेरीकडे राज्याचे लक्ष

कुमार गटात धाराशिव विरुद्ध मुंबई उपनगर हा सामना विशेष आकर्षणाचा ठरणार असून धाराशिवला सलग तिसऱ्या विजेतेपदाची सुवर्णसंधी आहे. तर मुलींच्या गटात सांगली विरुद्ध ठाणे ही लढत गतवर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती ठरणार असल्याने चुरस शिगेला पोहोचणार आहे. दोन्ही गटांतील विजेतेपदाच्या लढतींनी स्पर्धेचा उत्कर्षबिंदू गाठला असून खो-खोप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाची मेजवानी मिळणार आहे.


Post a Comment

0 Comments