श्रीलंकेत मल्लखांबाचा डंका! कोलंबोत १०
कार्यशाळांद्वारे भारतीय क्रीडा संस्कृतीचा जागतिक प्रसार
पद्मश्री उदय देशपांडे यांच्या उपस्थितीत भव्य प्रारंभ;
२०२७ विश्वचषकासाठी श्रीलंका संघ निवडीचीही तयारी
मुंबई : भारतीय संस्कृती, योग आणि पारंपरिक क्रीडा वारशाचा गौरवशाली संगम
असलेल्या मल्लखांबाने आता श्रीलंकेतही आपली भक्कम छाप उमटवण्यास
सुरुवात केली आहे! आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोलंबो येथे
सुरू झालेल्या मल्लखांब कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो
शिबिरार्थी भारतीय क्रीडा परंपरेचा अनोखा अनुभव घेत आहेत. या उपक्रमामुळे
मल्लखांबाच्या जागतिकीकरणाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
कोलंबोत १० कार्यशाळांचा भव्य प्रारंभ
भारतीय उच्च आयोग, कोलंबो, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि अष्टांग योग
मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ६ जून २०२६ या कालावधीत मल्लखांबाच्या १० कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी स्वामी
विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, कोलंबो येथे झालेल्या उद्घाटन समारंभात विश्व मल्लखांब
महासंघाचे संस्थापक संचालक आणि मल्लखांबाचे विश्वगुरू पद्मश्री उदय वि. देशपांडे, अष्टांग योग मंदिराचे संचालक व इन्स्टिट्यूट ऑफ
ह्यूमन एक्सलन्सचे प्रमुख योग मार्गदर्शक व्यासा कल्याणसुंदरम आणि या
उपक्रमाच्या प्रवर्तक सौ. मीनल रेनावीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात
आले.
प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांची नेत्रदीपक
प्रात्यक्षिके
उद्घाटनानंतर श्री समर्थ व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक प्रितेश
निळे आणि प्रचिती देसाई यांनी पुरलेल्या आणि दोरीच्या मल्लखांबावरील
आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या संतुलित, लयबद्ध आणि कौशल्यपूर्ण सादरीकरणाने श्रीलंकन
प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
८ ते ७५ वयोगटातील शिबिरार्थ्यांचा उत्स्फूर्त
सहभाग
चार दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ८ ते ७५ वर्षे वयोगटातील
सुमारे ६० ते ७० शिबिरार्थींनी सहभाग घेतला. सहभागींसमोर मल्लखांबातील शक्ती, लवचिकता, संतुलन, एकाग्रता आणि योगिक तत्त्वांचा संगम उलगडून
दाखवण्यात आला.
पुरलेल्या मल्लखांबावर बोंडावर बसणे, प्रौढासन, नौकासन, पादहस्तासन, द्रोणासन, तर दोरी मल्लखांबावर लटकते पद्मासन, पश्चिमोत्तानासन, क्रॉस, पादहस्तासन आणि शवासन यांसारख्या विविध कसरतींचे प्रशिक्षण देण्यात
आले.
भारतीय परंपरेच्या जागतिक प्रसाराचा
महत्त्वपूर्ण उपक्रम
या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश मल्लखांब या प्राचीन भारतीय
खेळाबाबत जागरूकता निर्माण करणे, त्याबद्दल आदर आणि आकर्षण वाढवणे तसेच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व
विकासाला चालना देणे हा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त श्रीलंकेत आयोजित
विविध उपक्रमांच्या मालिकेतील हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम ठरत आहे.
विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण आणि
प्रात्यक्षिके
या उपक्रमांतर्गत रत्नमालना हिंदू कॉलेज, रामरतन हिंदू लेडीज कॉलेज, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, हिंदू लेडीज कॉलेज आणि विवेकानंद कॉलेज येथे
मल्लखांबाची विशेष प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय क्रीडा संस्कृतीची जवळून ओळख होण्याची संधी मिळत
आहे.
‘वन गॉल फेस’ येथे भव्य समारोप
शनिवार, ६ जून २०२६ रोजी कोलंबोतील प्रसिद्ध ‘वन गॉल फेस’ येथे या कार्यशाळांचा भव्य समारोप सोहळा पार
पडणार आहे. या समारंभात सहभागी शिबिरार्थी आणि प्रशिक्षकांकडून विशेष सादरीकरणे
होणार असून, श्रीलंकेत मल्लखांबाच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात होणार आहे.
२०२७ विश्वचषकासाठी श्रीलंका संघाची निवड
या कार्यशाळेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे २०२७ मध्ये
होणाऱ्या तिसऱ्या विश्वचषक मल्लखांब स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संभाव्य संघाची निवड याच
उपक्रमादरम्यान केली जाणार आहे. त्यामुळे ही कार्यशाळा केवळ प्रशिक्षणापुरती
मर्यादित न राहता श्रीलंकेत मल्लखांबाच्या स्पर्धात्मक विकासासाठीही ऐतिहासिक
ठरणार आहे.
मल्लखांबाच्या जागतिक विस्ताराकडे आणखी एक भक्कम
पाऊल
कोलंबोतील या उपक्रमामुळे भारतीय मल्लखांब कलेचा जागतिक
विस्तार अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पद्मश्री उदय वि. देशपांडे, व्यासा कल्याणसुंदरम, मीनल रेनाळकर, प्रितेश निळे आणि प्रचिती देसाई यांच्या प्रयत्नांमुळे मल्लखांबाला
आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळत असून, भारतीय क्रीडा वारशाचे हे तेज आता जगभर झळकू
लागले आहे.

Post a Comment
0 Comments