Type Here to Get Search Results !

कबड्डीतील निर्भीड लेखणीचा सन्मान! दै. ‘सामना’चे मंगेश वरवडेकर व दै. ‘सकाळ’चे अलताफ कडकाले राज्य कबड्डी संघटनेच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराचे मानकरी २६ व्या कबड्डी दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा दिनकर पाटील आणि शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते आणि गुणवंत कबड्डीपटूंवर पुरस्कारांचा वर्षाव

 


कबड्डीतील निर्भीड लेखणीचा सन्मान! दै. ‘सामना’चे मंगेश वरवडेकर दै. ‘सकाळ’चे अलताफ कडकाले राज्य कबड्डी संघटनेच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराचे मानकरी

२६ व्या कबड्डी दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा

दिनकर पाटील आणि शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव, खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते आणि गुणवंत कबड्डीपटूंवर पुरस्कारांचा वर्षाव

 

मुंबई, दि. ८ : मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय झाला की शब्दांना तलवारीची धार देणारी, व्यवस्थेतील चुकीच्या निर्णयांवर रोखठोक प्रश्न उपस्थित करणारी आणि खेळाडूंच्या हक्कासाठी निर्भीडपणे उभी राहणारी पत्रकारिता अखेर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सन्मानित केली आहे. दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर व दै. ‘सकाळ’चे अलताफ कडकाले यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर करून संघटनेने लढाऊ आणि तडफदार क्रीडा पत्रकारितेचा गौरव केला आहे. कबड्डी दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, पत्रकार आणि उदयोन्मुख कबड्डीपटूंवर अक्षरशः पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे.

 

रत्नागिरीत रंगणार कबड्डी दिनाचा भव्य पुरस्कार सोहळा

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या २६ व्या कबड्डी दिनानिमित्त येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भव्य पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील कबड्डी क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

जीवनभराच्या योगदानाला जीवन गौरवाचा मान


कबड्डीच्या विकासासाठी आयुष्य वाहिलेल्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यांच्या प्रदीर्घ योगदानाचा हा राज्यस्तरीय गौरव मानला जात आहे.

 

निर्भीड पत्रकारितेचा गौरव

यंदाच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने मंगेश वरवडेकर (दै. सामना) आणि अलताफ कडकाले (दै. सकाळ) यांना गौरविण्यात येणार आहे. कबड्डीच्या प्रश्नांवर सातत्याने परखड भूमिका मांडणाऱ्या पत्रकारितेचा हा सन्मान विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

 

कार्यकर्ते, पंच आणि खेळाडूंच्या कार्याचा सन्मान

ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार आत्माराम घेगडे, बंडू कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल आणि विलास सावंत यांना जाहीर झाला आहे.

 

ज्येष्ठ पंच पुरस्कारासाठी प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल, मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस आणि रामदास गोळे यांची निवड करण्यात आली आहे.

 

ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर, तुळसीदास रोकडे, ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस आणि मदन गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

 

श्रमयोगी, कृतज्ञता आणि प्रशिक्षक पुरस्कारांची घोषणाही

रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार दीपक कांदळगांवकर (मुंबई उपनगर), डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली) आणि अरुणा गावडे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे.

 

कृतज्ञता पुरस्कारासाठी निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी आणि अभिजित राणे यांची निवड झाली आहे.

 

फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार नारायण गायकवाड (ठाणे) आणि सुहास कदम (मुंबई उपनगर) यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

उदयोन्मुख कबड्डीपटूंना शिष्यवृत्तीचा हात

किशोर गटात सुरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर) आणि ध्रुव डोंगरे (पालघर) यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

 

किशोरी गटात आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक) आणि ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर) यांची निवड झाली आहे.

 

कुमार गटात शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे) आणि अतुल जाधव (परभणी), तर कुमारी गटात संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे) आणि सानिका पाटील (सांगली) यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

 

किशोर-किशोरी विशेष शिष्यवृत्ती दिपराज कांबळे (परभणी) आणि मैत्री इंगळे (सातारा) यांना मिळाली आहे.

 

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवंतांचा गौरव

सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार सौरभ राऊत (अहिल्यानगर) आणि यामिका पुजारी (मुंबई उपनगर) यांना जाहीर झाला आहे.

 

उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार शिवम पठारे (अहिल्यानगर) आणि निकिता पडवळ (पुणे) यांना मिळाला आहे.

 

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसाद दिलीप (कुमार गट, पुणे) आणि सेरेना म्हस्कर (कुमारी गट, मुंबई उपनगर) यांच्या उल्लेखनीय कामगिरीचाही राज्य संघटनेने विशेष गौरव केला आहे.

 

जिल्हा संघटनांनाही मानाचा मुजरा

यंदाचा प्रथम जिल्हा संघ पुरस्कार अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेला जाहीर झाला असून उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा कबड्डी संघटना आणि सह्याद्री युवा मंच, सिन्नर (नाशिक) यांचा गौरव करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments