Type Here to Get Search Results !

संभाजीनगरात रंगणार राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंगची स्पर्धा १८ ते २३ जुलैदरम्यान देशभरातील सुमारे ८०० बलाढ्य खेळाडूंची उपस्थिती क्लासिक आणि इक्विप्ड गटात रंगणार शक्तीचा थरार

 


संभाजीनगरात रंगणार राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंगची स्पर्धा

१८ ते २३ जुलैदरम्यान देशभरातील सुमारे ८०० बलाढ्य खेळाडूंची उपस्थिती

क्लासिक आणि इक्विप्ड गटात रंगणार शक्तीचा थरार

मुंबई : देशातील अनुभवी पॉवरलिफ्टर्सच्या ताकद, जिद्द आणि कौशल्याची खरी कसोटी ठरणारी राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धा येत्या १८ ते २३ जुलै २०२६ दरम्यान गारखेडा स्टेडियम, छत्रपती संभाजीनगर येथे दिमाखात रंगणार आहे. संभाजीनगर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील नामांकित मास्टर्स खेळाडूंचा दमदार सहभाग असणार असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंगच्या केंद्रस्थानी राहणार आहे.

 

८०० खेळाडू, १०० पंच आणि प्रशिक्षकांची उपस्थिती

क्लासिक आणि इक्विप्ड अशा दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत ४०, ५०, ६० आणि ७० वर्षांवरील पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. देशभरातून सुमारे ८०० खेळाडू तसेच १०० पंच व प्रशिक्षक उपस्थित राहणार असून, अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते या स्पर्धेत आपले सामर्थ्य पणाला लावणार आहेत.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

स्पर्धेचे उद्घाटन नामदार संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असून, संदीपानराव भुमरे, खासदार, विलास (बापू) भुमरे, आमदार (पैठण), त्र्यंबकभाऊ तुपे, माजी महापौर तसेच सिद्धांत शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

संघटनेची जय्यत तयारी

राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवन भास्करन, अर्जुन पुरस्कार विजेते, राज्य संघटनेचे सचिव, आंतरराष्ट्रीय पंच व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित संजय प्रतापराव सरदेसाई, सुरेश बाहुले तसेच जस्वीरसिंग भाटिया यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेला राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सतीश कुमार, अर्जुन पुरस्कार विजेते राष्ट्रीय सचिव पी. जे. जोसेफ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय पंच संजय माधव, अनंत चाळके, सूर्यकांत गद्रे, सतीश पाताडे, पुण्याचे गिरीश गिंडी, राजहंस मेहंदळे, किरण त्यागी, आंतरराष्ट्रीय पंच विजय पाटील तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय पंच रक्षा महाराव यांचीही उपस्थिती स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे.

 

दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद

विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर शहराला राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या आयोजनाची संधी दुसऱ्यांदा मिळत असून, राष्ट्रीय स्तरावरील या भव्य स्पर्धेमुळे महाराष्ट्राच्या पॉवरलिफ्टिंग परंपरेला नवी उंची मिळणार आहे.


Post a Comment

0 Comments