कबड्डी दिनानिमित्त आयडियलकडून शालेय खेळाडूंना मोफत नियम
मार्गदर्शन
१५ जुलैला साकीनाक्यात विशेष शिबिर
उत्कृष्ट शिबिरार्थींचा गौरव,
‘आयडियल कबड्डीरत्न’
पुरस्कारही प्रदान होणार
मुंबई : कबड्डीच्या नवोदित खेळाडूंना खेळाचे अचूक नियम समजावेत,
त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि शालेय स्तरावर कबड्डीचा
दर्जा उंचावावा, या
उद्देशाने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे
कबड्डी दिन (१५ जुलै)
निमित्त शालेय खेळाडूंसाठी मोफत कबड्डी नियम मार्गदर्शन शिबिर
आयोजित करण्यात आले आहे. समता विद्या मंदिर, साकीनाका यांच्या सहकार्याने होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी
मोठी पर्वणी ठरणार आहे.
कबड्डीच्या नियमांचे सखोल मार्गदर्शन
या शिबिरात दम, मध्यरेषा, निदानरेषा, बोनस रेषा, राखीव क्षेत्र तसेच कबड्डीतील विविध तांत्रिक नियमांची सविस्तर माहिती
देण्यात येणार आहे. खेळाचे मूलभूत नियम समजल्यामुळे नवोदित खेळाडूंचा आत्मविश्वास
वाढून ते अधिक प्रभावी खेळ करू शकतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.
मान्यवरांची उपस्थिती
उत्कृष्ट शिबिरार्थींचा गौरव आणि ‘आयडियल कबड्डीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, समता विद्या मंदिरचे सचिव राजेश सुभेदार, मुख्याध्यापिका भारती पोवळे आणि संयोजक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
शिबिरात प्रशिक्षक सुनील खोपकर, राष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपटू किरण जिकमडे, कबड्डीपटू अनंत विचारे तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अनुभवी मार्गदर्शकांच्या
उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना कबड्डीतील बारकावे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार
आहे.
११ जुलैपर्यंत विनाशुल्क नोंदणी
हे शिबिर १५ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता समता विद्या मंदिर, साकीनाका, अंधेरी येथे होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी
११ जुलैपर्यंत प्रशिक्षक सुनील खोपकर यांच्याकडे विनाशुल्क नोंदणी करावी,
असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments