कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचा उद्यापासून थरार
पुण्याच्या अभिजित त्रिपनकर व ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरला
अग्रमानांकन
महाराष्ट्रातील अव्वल कॅरमपटूंची उपस्थिती, सामन्यांचे थेट प्रक्षेपण
कॅरमविश्वाचे लक्ष पुण्याकडे; राज्यातील दिग्गजांमध्ये रंगणार विजेतेपदाची चुरस
पुणे : महाराष्ट्रातील कॅरमप्रेमींसाठी
येत्या तीन दिवसांत रोमांच, कौशल्य आणि अचूकतेची
पर्वणी रंगणार आहे. सोमेश्वर फाउंडेशन आयोजित, सनी
निम्हण यांच्या पुढाकाराने व झेनेटीक स्पोर्ट्सच्या
सहकार्याने होणाऱ्या तिसऱ्या कै. विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला
शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी
सकाळी १० वाजता पुण्यातील सनी स्पोर्ट्स किंगडम, सनिज वर्ल्ड, पाषाण सुस रोड येथे शानदार प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि कॅरम
असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील अव्वल
खेळाडू विजेतेपदासाठी आमनेसामने भिडणार असून, दर्जेदार
लढतींची क्रीडारसिकांना मेजवानी मिळणार आहे.
पुरुष व महिला गटात दिग्गजांचा सहभाग
स्पर्धेच्या
पुरुष एकेरी गटात १६०, तर महिला एकेरी
गटात ३२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. पुरुष गटात पुण्याचा आंतरराष्ट्रीय
कॅरमपटू अभिजित त्रिपनकर याला प्रथम मानांकन मिळाले असून, महिला गटात ठाण्याची समृद्धी घाडीगावकर हिला अव्वल मानांकन बहाल
करण्यात आले आहे. दोन्ही गटांमध्ये अनुभवी तसेच उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश
असल्याने प्रत्येक सामना चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.
पुरुष गटातील मानांकनांवर सर्वांचे लक्ष
पुरुष
एकेरीत १) अभिजित त्रिपनकर (पुणे), २) झैद अहमद (ठाणे), ३) प्रशांत मोरे (मुंबई),
४) संदीप दिवे (जळगाव), ५) रहिम खान (पुणे),
६) सौरभ मते (मुंबई), ७) योगेश परदेशी (पुणे),
८) संजय मांडे (ठाणे) यांना
मानांकन देण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी नोंदविल्यामुळे
विजेतेपदासाठी जोरदार संघर्ष अपेक्षित आहे.
महिला गटात ठाण्याच्या खेळाडूंचे वर्चस्व
महिला
एकेरी गटात १) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २) मधुरा देवळे (ठाणे), ३) ऐशा साजिद खान (मुंबई),
४) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ५) प्राजक्ता
नारायणकर (मुंबई), ६) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ७) मैत्रेयी गोगटे (मुंबई), ८) मिताली पाठक (मुंबई) यांना मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे ठाण्याच्या समृद्धी
घाडीगावकर आणि मधुरा देवळे या दोघीही उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने
महिला गटातील स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे.
थेट प्रक्षेपणामुळे क्रीडारसिकांना पर्वणी
स्पर्धेतील
महत्त्वाच्या सामन्यांचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत युट्युब चॅनलवरून
थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील कॅरमप्रेमींना
घरबसल्या दर्जेदार लढतींचा आनंद घेता येणार आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी
स्पर्धेच्या सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती देत, खेळाडू, पंच आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने
उपस्थित राहून स्पर्धेला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment
0 Comments