Type Here to Get Search Results !

महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेटची धमाकेदार सुरवात! यजमान जळगावची १५ वर्षांखालील मुलांच्या गटात दमदार विजयी सलामी; १३, १५ व १७ वर्षांखालील खेळाडूंच्या नजरा राष्ट्रीय आणि ‘ज्युनिअर वर्ल्ड’कडे

 


महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेटची धमाकेदार सुरवात!

यजमान जळगावची १५ वर्षांखालील मुलांच्या गटात दमदार विजयी सलामी;

१३, १५ व १७ वर्षांखालील खेळाडूंच्या नजरा राष्ट्रीय आणि ‘ज्युनिअर वर्ल्ड’कडे

 

जळगाव : एका बाजूला घरच्या मैदानाचा जल्लोष, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवा खेळाडूंच्या कामगिरीची धग... अशा भन्नाट वातावरणात महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जुनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धेला जळगावात दिमाखात सुरुवात झाली. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान जळगावने संभाजीनगरचा ७१-१९ असा तब्बल ५२ धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. विशेष म्हणजे, ही स्पर्धा केवळ राज्य अजिंक्यपदाची लढाई नसून युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेतील ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या स्पर्धेत यजमान जळगावसह, ठाणे, संभाजी नगर, बीड, सातारा, नागपूर, अमरावती अश्या विविध जिल्ह्यांमधून जवळजवळ पावणे दोनशे मुले मुली, ५० प्रशिक्षक, व्यवस्थापक व पदाधिकारी यांनी हजेरी लावली आहे.   

 

जळगावचा पहिल्याच सामन्यात ‘दमदार पंच’!

१५ वर्षांखालील मुलांच्या सलामीच्या सामन्यात यजमान जळगावने संभाजीनगरवर ७१-१९ असा शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपले इरादे स्पष्ट केले. घरच्या मैदानावर खेळताना जळगावच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आणि संभाजीनगरला सामन्यात पुनरागमनाची फारशी संधीच दिली नाही.

 

मनीष-योगेंद्र-कार्तिकची चमकदार कामगिरी

जळगावच्या विजयात मनीष परदेशी याने १४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. योगेंद्र भोळे याने १४ धावांसह एक बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. कार्तिक याने ९ धावा आणि एक बळी घेत विजयात मोलाची भर घातली. या तिघांच्या प्रभावी कामगिरीमुळे जळगावने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

 

आर्यन पांडेची झुंज; संभाजीनगरचा प्रतिकार अपुरा

पराभूत संभाजीनगरकडून आर्यन पांडे याने ६ धावा करण्याबरोबरच एक बळी घेत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. ओम राऊत आणि इम्रान शेख यांनीही प्रत्येकी ६ धावा करत प्रतिकार केला. मात्र, त्यानंतर संभाजीनगरच्या फलंदाजांना जळगावच्या अचूक गोलंदाजीचा सामना करता आला नाही. परिणामी त्यांचा डाव १९ धावांवर आटोपला आणि जळगावने तब्बल ५२ धावांनी सामना खिशात घातला.

 

राज्याच्या मैदानातून थेट दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न!

या स्पर्धेचे महत्त्व केवळ पदक आणि अजिंक्यपदापुरते मर्यादित नाही. १३, १५ आणि १७ वर्षांखालील खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची ही मोठी संधी आहे. स्पर्धेतून निवड होणाऱ्या गुणवंत खेळाडूंना इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशन (IISF) च्या राष्ट्रीय स्तरावरील प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यातून पुढे निवड झालेल्या खेळाडूंना २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे दार खुले होणार आहे.

 

जळगावात युवा क्रिकेटचा उत्साह ओसंडला

जळगावमध्ये प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. दीपक आर्डे, किशोर चौधरी, देवदत्त पाटील, निलेश तावडे (नगरसेवक), सागर पाटील आणि निखील पाटील तसेच विविध आयोजन समित्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडू आणि प्रतिनिधींचे जळगावकरांनी केलेले उत्स्फूर्त स्वागतही लक्षवेधी ठरले.

 

क्षितीज वेदक, बाळ तोरसकरांचे मार्गदर्शन

स्पर्धेच्या आयोजनाला महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितीज वेदक आणि संस्थापक सरचिटणीस बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्यासोबत राजेंद्र इखनकर यांनीही आयोजन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. युवा खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातून भविष्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, या उद्देशाने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

 

निवड समितीची बारकाईने नजर

स्पर्धेतून गुणवंत खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी वैशाली भिडे-बर्वे, ओमकार पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निवड समितीवर आहे. प्रत्येक सामन्यातील खेळाडूंची कामगिरी, कौशल्य, सातत्य आणि सामन्याच्या परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता यावर निवड समितीची बारकाईने नजर आहे.

 

पंचांच्या अचूक निर्णयांनी सामन्यांना शिस्त

स्पर्धेतील सामने सुरळीत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नामदेव हटकर, राकेश भालेराव, सुशांत जाधव, सचिन सोनावणे, क्षितीज सोनावणे आणि सुजर वराडे पंच म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या अचूक निर्णयांमुळे सामन्यांना शिस्तबद्ध स्वरूप मिळत आहे.

 

जळगावची सलामी म्हणजे पुढील लढतींसाठी इशारा!

पहिल्याच सामन्यात ५२ धावांचा दणदणीत विजय मिळवत जळगावने स्पर्धेतील इतर संघांना आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, स्पर्धा अजून लांब आहे. पुढील सामन्यांतही हीच विजयी लय कायम ठेवत जळगावचा संघ किती दूर मजल मारतो, याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मैदानावर घाम गाळणाऱ्या या युवा खेळाडूंसाठी प्रत्येक सामना हा राज्याच्या पलीकडे—राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ठरत आहे.


Post a Comment

0 Comments