Type Here to Get Search Results !

कबड्डीचा श्वास… मैदानाचा ध्यास! ५ दशकांची निस्पृह सेवा खेळाडू, पंच, प्रशिक्षक, संघटक ते मैदानाचा रखवालदार… ६७ वर्षीय दिपक कांदळगावकर यांचा ‘श्रमजीवी’ सन्मान म्हणजे कबड्डीच्या सच्च्या सेवकाला सलाम पुरस्कार नव्हे, पाच दशकांच्या तपश्चर्येची पोचपावती! – सुहास जोशी

 


कबड्डीचा श्वास… मैदानाचा ध्यास! ५ दशकांची निस्पृह सेवा

खेळाडू, पंच, प्रशिक्षक, संघटक ते मैदानाचा रखवालदार… ६७ वर्षीय दिपक कांदळगावकर यांचा ‘श्रमजीवी’ सन्मान म्हणजे कबड्डीच्या सच्च्या सेवकाला सलाम

पुरस्कार नव्हे, पाच दशकांच्या तपश्चर्येची पोचपावती! सुहास जोशी

 

मुंबई : कबड्डीच्या मैदानावर खेळाडू दम मारतात, पंच शिट्टी वाजवतात, प्रशिक्षक डावपेच आखतात आणि सामने संपल्यानंतर मैदानावर शांतता पसरते… पण या सगळ्याच्या पलीकडे एखादा माणूस आयुष्यभर कबड्डीचा श्वास घेत राहतो, मैदानासाठी झिजतो, खेळाडूंना घडवतो, पंच तयार करतो आणि कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता खेळाची सेवा करत राहतो, तेव्हा त्याला केवळ ‘कार्यकर्ता’ म्हणणे अन्यायकारक ठरते. दिपक कांदळगावकर हे अशाच दुर्मीळ कबड्डीप्रेमींचे नाव! जवळपास ५ दशके कबड्डीची निस्पृह सेवा करणाऱ्या ६७ वर्षीय दिपक कांदळगावकर यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने सन २०२५-२६ चा मानाचा श्रमजीवी स्व. रमेश देवाडिकर कबड्डी कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार कांदळगावकर यांच्या गळ्यात पडलेला केवळ सन्मानाचा हार नाही, तर त्यांनी आयुष्यभर खांद्यावर वाहिलेल्या कबड्डीच्या जबाबदारीची अधिकृत पावती आहे.

 

खेळाडू ते मैदानाचा शिल्पकार!

खेळाडू, पंच, प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्ता, स्पर्धा आयोजक, निवड समिती सदस्य, पंच समिती सदस्य आणि अगदी मैदान तयार करण्यापासून ते ते टिकवण्यापर्यंत कबड्डीतील जवळपास प्रत्येक भूमिका कांदळगावकर यांनी समर्थपणे पार पाडली. प्रत्येक जबाबदारी स्वीकारताना त्यांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला, नव्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्या प्रत्यक्ष कामात आणल्या. त्यामुळेच कबड्डीच्या जाणकारांच्या नजरेत त्यांचे स्थान एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे बनले. पद, प्रसिद्धी किंवा पैशापेक्षा खेळ जगला पाहिजे’ हा एकच ध्यास त्यांनी कायम जपला.

 


पंतनगरच्या मातीतून कबड्डीची बीजे

घाटकोपर पूर्वेतील स्टेशनजवळच्या पंतनगरात दिपक कांदळगावकर यांचे बालपण गेले. परिसरात कबड्डीला पोषक वातावरण होतेच; पण घरातही खेळाची मोठी परंपरा होती. त्यांचे काका स्व. राम कांदळगावकर हे चांगले कबड्डीपटू, तर मोठे बंधू स्व. अरविंद (भाई) कांदळगावकर हे उत्तम खेळाडू होते. याच वातावरणातून कबड्डीचे संस्कार दिपक यांच्या मनावर झाले.

 

२६ जानेवारी १९६८ सन्मित्रची मुहूर्तमेढ

२६ जानेवारी १९६८ रोजी स्व. अरविंद (भाई) कांदळगावकर यांच्या पुढाकाराने घाटकोपर पूर्व येथे सन्मित्र कबड्डी संघाची स्थापना झाली. सुरुवातीला कांदळगावकर बंधूंपैकी चौघे या संघातून खेळत होते. काही वर्षांतच सन्मित्रने आपला दबदबा निर्माण केला. पुढे याच संघातून काशिनाथ घाडी, शरद कांदळगावकर, तुकाराम सुर्वे, नागेश भावे, प्रकाश चव्हाण, शिवराम उत्तेकर, दिपेश चिकणे, महादेव दळवी, अक्षय वर्णेकर, अंकुश आमटे, सोहम पुंदे, ग्रेटा डिसुझा, वैशाली महाडीक, सुजाता चव्हाण, भारती मोहिते, अस्मिता विरमुळे, पुनम झारुंजे, मयुरी मोहिते, निकिता उत्तेकर आणि सुविद्या विश्वासराव यांसारखे खेळाडू प्रकाशात आले.

 


वडाळ्याने दिली नवी दिशा

कांदळगावकर यांच्या कबड्डी कारकिर्दीला खरी कलाटणी मिळाली ती वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळात दाखल झाल्यानंतर. तेथे महिला कबड्डी संघ उभारण्याची आणि मंडळातर्फे आयोजित होणाऱ्या आंतरशालेय हिंद करंडक सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी हे शिवधनुष्य केवळ पेलले नाही, तर ते यशस्वीपणे सांभाळत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

 

१६ वर्षे महिला कबड्डीची धुरा

तब्बल १६ वर्षे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचा महिला कबड्डी संघ कांदळगावकर यांनी सांभाळला. या काळात संघ घडवणे, खेळाडू शोधणे, त्यांना प्रशिक्षण देणे, स्पर्धांसाठी तयार करणे आणि मैदानावरील शिस्त रुजवणे या सगळ्या आघाड्यांवर त्यांनी सातत्याने काम केले. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आणि सन्मित्र कबड्डी संघ या दोन्ही संघांतून त्यांनी स्वतःही अनेक वर्षे खेळ केला.

 


सन्मित्र पुन्हा उभा केला; ‘अ’ गटात दबदबा कायम

मधल्या काळात सन्मित्र कबड्डी संघ बंद पडला होता. मात्र १९९३ पासून कांदळगावकर यांनी पुन्हा संघाला उभारी दिली. आज सन्मित्रचा पुरुष संघ अनेक वर्षांपासून मुंबई उपनगरातील ‘अ’ गटातील स्थान टिकवून आहे. महिला संघानेही बलाढ्य संघ म्हणून आपला लौकिक कायम ठेवला आहे. शिवक्रांती क्रीडा मंडळ, संतोष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, नगरसेवक चषक आणि आमदार चषक यांसह विविध स्पर्धांमध्ये सन्मित्रने जेतेपद पटकावले आहे.

 

मैदान वाचविण्यासाठी बिल्डर लॉबीशीही दोन हात

मुंबईत कबड्डीसाठी मैदाने कमी होत असताना अनेक मैदाने काळाच्या पडद्याआड गेली. पण कांदळगावकर यांनी सन्मित्रचे मैदान जीवापाड मेहनत घेऊन टिकवून ठेवले. मैदानाच्या आजूबाजूला टॉवर उभे राहिले, विकासाची चक्रे फिरली; मात्र मैदानाचा श्वास बंद पडू दिला नाही. पावसाळा वगळता येथे आजही कबड्डीचा दम घुमतो. सन्मित्रसोबत इतर संघांचे सरावही या मैदानावर सुरू असतात. नवरात्रात याच मैदानावर देवीचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होतो. खेळासाठी मैदान आणि मैदानासाठी झटणारा कार्यकर्ता—हे नाते कांदळगावकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून जपले.

 


शिस्त आणि वेळ’—दिपक सरांचा मूलमंत्र

कांदळगावकर यांच्या कामाची दोन ठळक वैशिष्ट्ये म्हणजे शिस्त आणि वेळेचे भान. मैदानावर सर्वांत आधी पोहोचणारे तेच आणि शेवटी मैदान सोडणारेही तेच! वादविवादापासून ते कायम चार हात लांब राहिले. पंचांचा निर्णय स्वीकारायचा आणि सर्वोत्तम खेळ करून सामना जिंकायचा,” हा मोलाचा मंत्र त्यांनी खेळाडूंच्या मनात रुजवला. पंचांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःच्या खेळात सुधारणा करणे, ही त्यांची शिकवण आजही त्यांच्या संघाच्या संस्कारात दिसते.

 

खेळाडूवर दबाव नाही; विश्वास मात्र पूर्ण

कांदळगावकर यांचे प्रशिक्षक म्हणून आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते खेळाडूवर स्वतःची शैली लादत नाहीत. खेळाडूचा नैसर्गिक खेळ कायम ठेवून त्यात सफाईदारपणा आणि अचूकता आणणे, यावर त्यांचा भर असतो. खेळाडूला पूर्ण मोकळीक देत त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकला जात नाही. त्यामुळेच त्यांच्या खेळाडूंशी असलेले नाते प्रशिक्षक-खेळाडू इतकेच मर्यादित न राहता कौटुंबिक नात्यात रूपांतरित झाले आहे.

 

शाळा-महाविद्यालयांतून शेकडो खेळाडू घडवले

भवन्स कॉलेज, विद्या निकेतन कॉलेज, एस.एन.डी.टी. कॉलेज, विद्या भवन मराठी विद्यालय, विद्या भवन हायस्कूल, घाटकोपर पूर्व आणि ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा या संस्थांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कांदळगावकर यांनी काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी कबड्डीच्या मैदानावर आपली ओळख निर्माण केली.

 

अंध खेळाडूंच्या संघालाही राष्ट्रीय पातळीवर दिशा

सन २०१२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय मुलांच्या अंधांच्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून कांदळगावकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. विविध ठिकाणी कबड्डी शिबिरांचे यशस्वी आयोजन करून त्यांनी खेळाच्या विस्ताराला हातभार लावला.

 

पंच घडविण्याचीही मोठी शाळा

खेळाडू घडवतानाच कांदळगावकर यांनी पंच घडविण्याचेही काम केले. आजपर्यंत ६० पेक्षा जास्त जणांना पंच होण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून स्मिता शिगवण आणि डॉ. माया गोकर्ण या पुढे राष्ट्रीय पंच बनल्या. मैदानावरचा खेळ समजून घेणारा आणि पंचगिरीची शिस्त शिकवणारा कार्यकर्ता म्हणूनही कांदळगावकर यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

 

एमकेएलमध्येही जबाबदारी यशस्वीपणे

कबड्डीच्या आधुनिक व्यावसायिक पर्वातही कांदळगावकर मागे राहिले नाहीत. एमकेएल लीगमध्ये मैदान आणि खेळाडू शिबिराची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. पारंपरिक कबड्डीची जाण आणि आधुनिक व्यवस्थापनाची गरज यांचा मेळ घालत त्यांनी नव्या पिढीशीही स्वतःला जोडून ठेवले.

 


शासकीय जबाबदारीही समर्थपणे

सन १९९० पासून आजपर्यंत कांदळगावकर मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. १९९५ ते २००५ या कालावधीत ते मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. महाराष्ट्र शासनाने २००१ ते २००६ या कालावधीत त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली होती. कबड्डीच्या मैदानाबरोबरच सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली.

 

श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या मुलींनी गाजवला दबदबा

श्री साई स्पोर्ट्स क्लब, घाटकोपर हा कांदळगावकर यांचा संघ किशोरी गटातील मुंबई उपनगर जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सलग ३ वर्षे विजेता ठरला. या संघातील ५ मुलींची कुमारिका राज्य स्पर्धेसाठी, तर किशोरी संघातील ८ आणि महिला संघातील ३ खेळाडूंची निवड झाली. खेळाडू घडवण्याच्या त्यांच्या कार्याची ही आकडेवारीच पुरेशी साक्ष देते.

 

कबड्डीच्या बदलत्या चेहऱ्याची खंत

पाच दशकांहून अधिक काळ कबड्डी जवळून पाहिलेल्या कांदळगावकरांना या खेळातील बदल स्पष्टपणे जाणवतात. पूर्वीच्या कबड्डीत नजाकत आणि जादू होती; आता खेळ केवळ ताकदीवर अधिक अवलंबून राहिला आहे,” अशी खंत ते व्यक्त करतात. मॅटमुळे कबड्डीचे तंत्रच बदलले, असे त्यांचे मत आहे. तरीही काळ बदलला म्हणून खेळापासून दूर जाण्याऐवजी बदलत्या कबड्डीचा स्वीकार करून खेळाला पुढे नेण्याचे काम ते आजही करीत आहेत.

 

नवरात्राचा उत्सव आणि सन्मित्रची सामाजिक बांधिलकी

सन्मित्र क्रीडा मंडळाचा देवी नवरात्र उत्सव हा घाटकोपरमधील एक जुना आणि लोकप्रिय उपक्रम. ५ दशकांपेक्षा जास्त काळ हा उत्सव जोमाने सुरू आहे. सुरुवातीच्या काळात अवघी सव्वा-सव्वा रुपया वर्गणी गोळा करून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. खेळाबरोबरच समाज आणि संस्कृतीशी जोडलेली ही परंपराही कांदळगावकर यांनी जपली.

 

१९९५ च्या बॉम्बस्फोटानंतर माणुसकीचा दम

कबड्डीच्या मैदानाबाहेरही कांदळगावकर यांची संवेदनशील बाजू दिसते. १९९५ मध्ये घाटकोपर येथे झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटानंतर जखमींना रक्त देण्यासाठी ते सर्वप्रथम राजावाडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी १६ वेळा रक्तदान केले आहे. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे राहिले. त्यांच्या घराच्या दाराला पूर्वी कुलूप नसायचे, एवढा माणुसकीवर त्यांचा विश्वास होता.

 

या प्रवासामागे अनेक हातांचे ऋण

दिपक कांदळगावकर यांच्या आजवरच्या प्रवासात अनेक ज्येष्ठ आणि सहकाऱ्यांचे योगदान आहे. स्व. बाबुराव शेट्ये, स्व. आबा नाईक, स्व. रामभाऊ कांदळगावकर, स्व. भगवान घाग, स्व. सो. श. प्रभु, स्व. किसनराव सकपाळ, स्व. चंद्रकांत दळवी, स्व. प्रभाकर अमृते, स्व. डॉ. शंकर चव्हाण, स्व. सुरेश सावंत, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेट्ये, अनिल धुरी, कृष्णा शिगवण, बंडु कांबळे, जया शेट्टी, मिनानाथ धानजी, गणपत लाड, भरत संधाने, राजन प्रधान आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.

 


पुरस्कारांची मालिकाही त्यांच्या कार्याची साक्ष

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुरस्कारापूर्वीही ह्युमन वेल्फेअर सोशल ऑर्गनायझेशन, जोगेश्वरी, मासिक ‘अनोखा विश्वास’चा श्री शिवाजी महाराज पुरस्कार, स्वरमयी क्रीडा पुरस्कार आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचा पुरस्कार अशा विविध सन्मानांनी कांदळगावकर यांचा गौरव झाला आहे. मात्र पुरस्कारांच्या संख्येपेक्षा मैदानावर घडलेल्या खेळाडूंच्या कामगिरीतच त्यांना खरी समाधानाची भावना मिळते.

 

कबड्डी म्हणजेच दिपक कांदळगावकर!

आजवर कबड्डीने त्यांना जे काही दिले, त्याबद्दल ते पूर्ण समाधानी आहेत. कबड्डी हा त्यांचा केवळ खेळ नाही; तो त्यांचा श्वास आहे. घराकडे ते प्रामुख्याने झोपण्यासाठी जातात आणि उर्वरित वेळ कुठल्या ना कुठल्या मैदानावर, खेळाडूंच्या गराड्यात, कबड्डीच्या कामात व्यतीत करतात. जवळपास ५ दशकांच्या या प्रवासात प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा त्यांनी मैदानाची माती निवडली; पदापेक्षा जबाबदारी स्वीकारली आणि अपेक्षेपेक्षा खेळाला प्राधान्य दिले.

 

श्रमजीवी पुरस्कारातून सच्च्या सेवकाला सलाम

स्व. रमेश देवाडिकर श्रमजीवी कबड्डी कार्यकर्ता पुरस्कार हा कांदळगावकर यांच्या कार्याचा शेवट नाही; उलट त्यांच्या प्रदीर्घ सेवेला मिळालेली नवी ऊर्जा आहे. खेळाडू घडवणे, पंच तयार करणे, संघ उभे करणे, मैदान टिकवणे आणि कबड्डीची चळवळ जिवंत ठेवणे या प्रत्येक आघाडीवर त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढीसाठी आदर्श ठरणारे आहे. जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत कबड्डीची सेवा सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. म्हणूनच दिपक कांदळगावकर हे नाव केवळ सन्मानित कबड्डी कार्यकर्त्याचे नाही; ते मुंबईच्या कबड्डी संस्कृतीतील एका जिद्दी, निस्पृह आणि जिवंत परंपरेचे नाव आहे. त्यांच्या या अखंड कबड्डीसेवेला मनापासून सलाम!

 


Post a Comment

0 Comments