Type Here to Get Search Results !

गेमिंगकॉन भारत २०२६ : मुंबईत रंगणार गेमिंगचा महाकुंभ! महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने १७-१८ ऑक्टोबरला आयोजन २०,००० हून अधिक गेमर्स, निर्माते आणि गेमिंगप्रेमींची उपस्थिती अपेक्षित

 


गेमिंगकॉन भारत २०२६ : मुंबईत रंगणार गेमिंगचा महाकुंभ!

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने १७-१८ ऑक्टोबरला आयोजन २०,००० हून अधिक गेमर्स, निर्माते आणि गेमिंगप्रेमींची उपस्थिती अपेक्षित

 

मुंबई : गेमिंगच्या दुनियेत भारताची वाढती ताकद आता मुंबईत प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. गेमिंगकॉन भारत २०२६ चे तिसरे पर्व १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील बॉम्बे प्रदर्शन केंद्र (नेस्को) येथे रंगणार असून यंदा २०,००० हून अधिक गेमिंगप्रेमी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या पर्वाला १५,००० हून अधिक जणांनी हजेरी लावली होती. यंदाचा महोत्सव भारतातील गेमिंग, ई-स्पोर्ट्स, निर्माते, लोकप्रिय संस्कृती आणि परस्परसंवादी मनोरंजनाला एकाच व्यासपीठावर आणणार आहे.

 

महाराष्ट्र सरकारचा भक्कम पाठिंबा

गेमिंगकॉन भारताने भारतीय गेम प्रकाशक व विकासक संघटनेशी (आयजीपीडीए) असलेली धोरणात्मक भागीदारी कायम ठेवली असून यंदाही महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. गेम विकासक, प्रकाशक, निर्माते, गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि गेमिंग समुदायांसाठी नव्या संधी निर्माण करण्याबरोबरच देशातील वेगाने विस्तारत असलेल्या गेमिंग क्षेत्राला अधिक बळ देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

मीपलकॉनची मोठी पर्वणी

यंदाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतामधील सर्वात मोठ्या बोर्ड गेम संमेलनांपैकी एक ‘मीपलकॉन’ याची गेमिंगकॉनसोबत भागीदारी. बोर्ड गेम प्रकाशक, डिझायनर, हौशी खेळाडू आणि टेबलटॉप गेमिंगप्रेमी यामुळे एकाच छताखाली येणार आहेत. संगणक आणि मोबाइल गेम्सपासून बोर्ड गेम्सपर्यंत गेमिंगच्या प्रत्येक प्रकाराचा उत्सव साजरा करण्याची संकल्पना यामुळे अधिक व्यापक होणार आहे.

 

गेमिंग, ई-स्पोर्ट्सचा जल्लोष

यंदाच्या महोत्सवात नवीन संगणक, कन्सोल आणि मोबाइल गेम्ससाठी मोठी विनामूल्य खेळ क्षेत्रे, दमदार ई-स्पोर्ट्स स्पर्धा आणि इंडीव्हर्स’ हे विशेष आकर्षण असेल. या विभागात भारतातील आशादायी स्वतंत्र गेम स्टुडिओ आपल्या नव्या निर्मिती सादर करणार आहेत. त्याचबरोबर लेव्हल अप’ परिषद, उद्योगातील दिग्गज, विकासक, निर्माते, प्रकाशक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांच्या सहभागाने रंगणार आहे.

 

कॉस्प्लेपासून थेट मनोरंजनापर्यंत

महोत्सवात देशातील मोठ्या कॉस्प्ले उत्सवाबरोबरच विशेष उत्पादने, संग्रहणीय वस्तू, निर्मात्यांशी संवाद आणि थेट मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दोन दिवस मुंबईतील नेस्को परिसर गेमर्स, ई-स्पोर्ट्स खेळाडू, कॉस्प्ले कलाकार, विद्यार्थी आणि मनोरंजनप्रेमींसाठी एका मोठ्या अनुभवविश्वात रूपांतरित होणार आहे.


 

गेमिंगचे भविष्य भारतात घडतेय

गेमिंगकॉन भारताचे संस्थापक आणि आयडेक्स इव्हेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास विज यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून संपूर्ण गेमिंग परिसंस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचा मंच आहे. गेमर्स, ब्रँड्स, स्टुडिओ, निर्माते, ई-स्पोर्ट्स संघ, गुंतवणूकदार आणि सरकारी यंत्रणा यांना एकत्र आणणे हे त्यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

 

महाराष्ट्राच्या गेमिंग क्षेत्राला नवी दिशा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी गेमिंगकॉन भारताला देशाच्या गेमिंग क्षेत्रातील ऊर्जा आणि सर्जनशीलतेचे प्रतिबिंब म्हटले. देशात वेगाने विकसित होणारे गेम स्टुडिओ, जागतिक दर्जाची प्रतिभा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा भारताला जागतिक गेमिंग बाजारपेठेत मोठी झेप घेण्यासाठी सक्षम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

उद्योगाला एकत्र आणणारे व्यासपीठ

एन्कोर गेम्सचे संस्थापक आणि आयजीपीडीएच्या संस्थापक सदस्यांपैकी एक विशाल गोंडल यांनी गेमिंगकॉन भारताला भारताच्या गेमिंग भविष्याला दिशा देणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. वाढता प्रतिसाद, उद्योगाचा मजबूत सहभाग आणि नव्या भागीदाऱ्यांमुळे गेमिंगकॉन भारत २०२६ भारतातील गेमिंग कार्यक्रमांसाठी नवा मापदंड निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. १७-१८ ऑक्टोबरला मुंबईत गेमिंगची ही नवी क्रांती अनुभवण्यासाठी गेमर्सपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी मोठी पर्वणी सज्ज झाली आहे.


Post a Comment

0 Comments