मुंबईचा शरीरसौष्ठव बालेकिल्ला पुन्हा एकवटला!
कीर्तीकरांच्या पुढाकाराने ५ संघटना एका छताखाली
खेळाडूंच्या न्यायासाठी एकजुटीचा निर्धार, ‘महाराष्ट्र श्री’साठी ४० लाखांचे पाठबळ
फुटीला पूर्णविराम
मुंबईच्या पीळदार ताकदीला नवे बळ
मुंबई : मुंबईच्या
शरीरसौष्ठव क्षेत्राला गेली अनेक वर्षे पोखरणाऱ्या संघटनात्मक फुटीला अखेर
निर्णायक वळण मिळाले आहे. माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पुढाकाराने
मुंबईतील ५ प्रमुख शरीरसौष्ठव संघटना एका व्यासपीठावर एकत्र आल्या असून,
आता व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून खेळ आणि खेळाडूंच्या
न्यायासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचा दबदबा पुन्हा निर्माण करण्याच्या
दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
‘बॉडीबिल्डिंगची पंढरी’ पुन्हा ताकदवान होणार
मुंबईला
भारतीय शरीरसौष्ठवाची ‘पंढरी’ किंवा
बालेकिल्ला मानले जाते. या मातीतून देशाला
असंख्य राष्ट्रीय, आशियाई, जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू मिळाले. मात्र संघटनात्मक
मतभेद, निवड प्रक्रियेतील गोंधळ आणि परस्पर संघर्ष यामुळे या
ताकदीचे नुकसान होत होते. अनेक गुणवंत खेळाडूंना योग्य संधी, सन्मान आणि मोठ्या व्यासपीठावर प्रतिनिधित्व मिळण्यात अडथळे निर्माण होत
होते. या पार्श्वभूमीवर झालेली संघटनांची एकजूट म्हणजे केवळ प्रशासकीय बदल नसून मुंबईच्या
शरीरसौष्ठवासाठी नवा अध्याय मानला जात आहे.
अजय खानविलकर, विक्रम रोठे यांचा
निर्णायक पुढाकार
ही
एकजूट घडवून आणण्यासाठी बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर
आणि जागतिक संघटनेचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टू द प्रेसिडेंट तसेच आयबीबीएफचे
कायदेशीर सल्लागार विक्रम रोठे यांनी पुढाकार घेतला. विक्रम रोठे यांच्या
सहकार्याने विविध संघटनांशी सलग चर्चा करण्यात आली. मतभेदांचे मुद्दे बाजूला ठेवून
खेळाडूंच्या हिताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आणि अखेर सर्व संबंधित संघटनांना
एका व्यासपीठावर आणण्यात यश आले.
५ संघटना आता एकत्रित मार्गदर्शनाखाली
ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन, मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन मुंबई, बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ मुंबई आणि बॉडी
बिल्डिंग अँड फिजिक असोसिएशन, मुंबई या ५ संघटना यापुढे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई
सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पाहणार
आहेत. त्यामुळे मुंबईतील शरीरसौष्ठवाच्या कारभाराला एकसंध दिशा मिळण्याची अपेक्षा
आहे.
खेळाडूंना पारदर्शक निवडीची आशा
संघटनात्मक
एकजुटीचा सर्वात मोठा फायदा खेळाडूंना होणे अपेक्षित आहे. पारदर्शक निवड
प्रक्रिया, दर्जेदार प्रशिक्षण,
प्रायोजकांचे पाठबळ आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भक्कम
प्रतिनिधित्व यासाठी आता एकत्रितपणे प्रयत्न केले
जाणार आहेत. मुंबईतील गुणवंत खेळाडूंची गुणवत्ता केवळ स्थानिक स्पर्धांपुरती
मर्यादित न राहता त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक
स्तरावर संधी मिळावी, यावर भर दिला जाणार आहे.
कीर्तीकरांचे ४० लाखांचे मोठे पाठबळ
या
ऐतिहासिक एकीला आर्थिक ताकद देताना गजानन कीर्तीकर यांनी आगामी ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी
सीएसआरच्या माध्यमातून तब्बल ४० लाख रुपयांचा निधी उभारून देण्याचे आश्वासन
दिले आहे. त्यामुळे पुढील ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धा मुंबईत भव्य स्वरूपात आयोजित
होण्याचे संकेत मिळाले आहेत. आर्थिक अडचणींमुळे स्पर्धेचा दर्जा किंवा खेळाडूंच्या
संधींवर परिणाम होऊ नये, यासाठी हे पाठबळ
महत्त्वाचे ठरणार आहे.
मधुकर तळवळकरांकडून ५ लाखांची मदत
कीर्तीकरांच्या
घोषणेनंतर व्यायाममहर्षी मधुकर तळवळकर यांनीही ५ लाख रुपयांची रोख मदत
जाहीर केली. त्यामुळे ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक बळ
मिळण्याची शक्यता आहे. दर्जेदार आयोजनासोबत देशभरातील बलाढ्य शरीरसौष्ठवपटूंना
मुंबईत आणण्यासाठीही या आर्थिक पाठबळाचा उपयोग होऊ शकतो.
८५ पदाधिकारी एकाच व्यासपीठावर
संघटनांच्या
एकत्रीकरणाच्या बैठकीला मुंबईतील विविध संघटनांचे तब्बल ८५ पदाधिकारी आणि
कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस
असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तसेच
डब्ल्यूबीपीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण,
शरद मारणे आणि व्यायाममहर्षी मधुकर
तळवळकर यांची उपस्थिती होती.
अनुभवी कार्यकर्त्यांचीही साथ
या
एकीच्या बैठकीला मनोहर पांचाळ, किट्टी फणसेका, मनीष आडविलकर आणि मोतीराम केणी यांच्यासह शरीरसौष्ठव क्षेत्रातील विविध
पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेली ही
संघटनात्मक ताकद आता खेळाडूंच्या विकासासाठी वापरण्याचा निर्धार करण्यात आला.
‘फुटी’पेक्षा खेळाडू मोठा!
मुंबईच्या
शरीरसौष्ठवाला पुन्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवून
द्यायचे असेल, तर संघटनांमधील संघर्षापेक्षा खेळाडूंचे
हित मोठे मानावे लागेल. याच भूमिकेतून झालेली ही एकजूट शरीरसौष्ठव विश्वासाठी
आश्वासक ठरली आहे. मुंबईचा बालेकिल्ला पुन्हा अभेद्य करण्यासाठी आता संघटनांची
ताकद, अनुभवी नेतृत्व आणि खेळाडूंची मेहनत एकत्र
येणार आहे.
एकजुटीचे शिल्पकार ठरलेल्या दोघांचे आभार
सर्व
संघटनांचे एकत्रीकरण घडवून आणल्याबद्दल उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजय
खानविलकर आणि विक्रम रोठे यांचे आभार मानले. अनेक वर्षांनंतर एकाच
दिशेने पुढे जाण्याचा निर्णय झाल्याने मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात नव्या
पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
मुंबईच्या शरीरसौष्ठवाला आता केवळ पीळदार शरीरयष्टीची नव्हे, तर पीळदार संघटनात्मक ताकदीचीही साथ मिळाली आहे. ही एकजूट टिकली, तर मुंबईचा झेंडा पुन्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगमंचावर दिमाखात
फडकण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही!

Post a Comment
0 Comments