Type Here to Get Search Results !

महापौर चषकाच्या सरावात सार्थक वाघमारेचा ‘विजयी स्ट्रोक’! चेंबूरच्या ६५ शालेय कॅरमपटूंमध्ये सार्थक सर्वोत्तम नरसिंगराव सकारींच्या तांत्रिक मार्गदर्शनाने खेळाडूंच्या बोटांना धार

 


महापौर चषकाच्या सरावात सार्थक वाघमारेचा ‘विजयी स्ट्रोक’!

चेंबूरच्या ६५ शालेय कॅरमपटूंमध्ये सार्थक सर्वोत्तम

नरसिंगराव सकारींच्या तांत्रिक मार्गदर्शनाने खेळाडूंच्या बोटांना धार

 

मुंबई : महापौर चषक जिंकण्याच्या तयारीत चेंबूरच्या शालेय कॅरमपटूंनी बोर्डवर जोरदार फटकेबाजी सुरू केली असतानाच सार्थक वाघमारेने आपल्या अचूक खेळाची छाप उमटवत ६५ शालेय खेळाडूंमध्ये सर्वोत्तम शिबिरार्थीचा मान पटकाविला! आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात सार्थकने चमकदार कामगिरी करत बाजी मारली.

 

सार्थकचा गौरव; चुरशीच्या आव्हानावर मात

सार्थक वाघमारे याला नगरसेवक महादेव शिवगण, चेंबूरनाका मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रजीत कौर, मुख्याध्यापक यशवंत पवार, डॉ. जितेंद्र लिंबकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्तम शिबिरार्थीच्या शर्यतीत आयुष जगताप, रुद्र कडलक, अहमद रझा आणि विष्णू स्वर्णकार यांनी सार्थकला चुरशीचे आव्हान दिले; मात्र सातत्यपूर्ण सराव आणि अचूक फटक्यांच्या जोरावर सार्थकने सर्वांना मागे टाकले.

 

सकारींच्या धड्यांनी खेळाला नवी धार

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू व राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा शालेय खेळाडूंना मोठा फायदा झाला. सरावाच्या दुसऱ्या दिवशी नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंनी आपल्या खेळातील चुका सुधारत बोर्डवर अधिक आत्मविश्वासाने फटके साधले. या सकारात्मक प्रतिसादानंतर चेंबूरनाका मनपा शाळेने उदयोन्मुख कॅरमपटूंना दररोज चॅम्पियन कॅरम बोर्डवर १ तास सराव देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

२६ सप्टेंबरला महापौर चषकाचा थरार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात रंगणार आहे. चेंबूरमधील पूर्वतयारी सरावातून तयार झालेल्या खेळाडूंच्या बोटांना आता स्पर्धेची धार आली असून महापौर चषकावर नाव कोरण्यासाठी शालेय कॅरमपटू सज्ज झाले आहेत!

 


Post a Comment

0 Comments