Type Here to Get Search Results !

भारतीय कबड्डीचा ‘तारक’ अनंतात विलीन! माजी भारतीय संघनायक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ यांचे निधन चैत्यभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


भारतीय कबड्डीचा ‘तारक’ अनंतात विलीन!

माजी भारतीय संघनायक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ यांचे निधन

चैत्यभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

 

मुंबई : भारतीय कबड्डीच्या मैदानावर आपल्या हुकमी चढायांनी प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीची दाणादाण उडविणारे, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारे आणि शिवछत्रपती पुरस्काराने गौरविलेले माजी राष्ट्रीय कबड्डीपटू तारक राऊळ यांचे आज, दि. ३ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१५च्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस आजाराशी झुंज देत असलेल्या तारक राऊळ यांनी वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि कबड्डीच्या मैदानातील हा ‘तारक’ आज अनंतात विलीन झाला. त्यांच्या निधनाने मुंबईसह महाराष्ट्राच्या कबड्डी विश्वावर शोककळा पसरली आहे.

 

मैदान गाजविणाऱ्या तारकचा अखेरचा प्रवास

२ जून रोजी त्यांनी ७५व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तृप्ती, मुले श्रेयस व शृंगार तसेच सुना असा परिवार आहे. ना. म. जोशी मार्ग येथील आल्हाद सेवा मंडळाचे ते खेळाडू होते. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी रिझर्व्ह बँक व्यावसायिक संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा संघाकडून खेळताना त्यांनी कबड्डीची मैदाने गाजवली.

 

मुंबईपासून भारतीय संघापर्यंत नेतृत्वाची भरारी

१९७४ साली मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेल्या तारक राऊळ यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर पुढे मुंबई, महाराष्ट्र आणि भारतीय संघाचे नेतृत्व केले. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची धुरा सांभाळण्याचा मान त्यांना मिळाला. खेळाडू म्हणून मैदान गाजविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचे प्रशिक्षकपदही भूषविले. तसेच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे ५ वर्षे कार्यकारी सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

 

चढाईचा हुकमी एक्का!

तारक राऊळ म्हणजे कबड्डीतील हुकमी चढाईपटू. त्यांचे पदलालित्य नेत्रसुखद होते. दोन्ही बाजूंनी चढाई करण्याची त्यांची हातोटी अफलातून होती. पायाचा आणि हाताचा योग्य वापर करून ते गुण वसूल करीत. बचावातही ते तितकेच उपयोगी ठरत. सहाय्यक बचावपटू म्हणून कोणत्याही जागेवर ते चपखलपणे बसत आणि संघाला बळ देत.

 

तारकला घेऊन कशीही पकड केली तरी...’

तारक राऊळ यांच्या खेळाची ताकद सांगताना पुण्याचे ज्येष्ठ कबड्डीपटू फिदा कुरेशी नेहमी म्हणत, तारकला घेऊन कशीही व लाइनवरदेखील पकड केली तरी ती यशस्वी होणार!” या एका वाक्यात त्यांच्या खेळातील चपळाई, ताकद आणि पकडीतून निसटण्याची विलक्षण क्षमता स्पष्ट होते. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना सतत धाकात ठेवणारा हा खेळाडू आज मात्र कायमचा शांत झाला.

 

चैत्यभूमीत अखेरचा निरोप

दादर येथील चैत्यभूमीत आज दुपारी २.३० वाजता तारक राऊळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, नगरसेवक निशिकांत शिंदे, अर्जुन पुरस्कार विजेत्या माया मेहेर, अशोक शिंदे, श्रीराम (राजू) भावसार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शैला रायकर, ग्रेटा डिसोझा, सुनील जाधव, रवि करमरकर, जेम्स परेरा, संघटक जया शेट्टी, मिनानाथ धानजी यांच्यासह कबड्डी क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू, चाहते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कबड्डीच्या इतिहासातील एक पर्व संपले

तारक राऊळ यांचे निधन म्हणजे केवळ एका माजी खेळाडूचा मृत्यू नाही; तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या कबड्डी इतिहासातील एका प्रभावी पर्वाचा अस्त आहे. खेळाडू, संघनायक, प्रशिक्षक आणि संघटक म्हणून त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे. मैदानावर ज्यांच्या चढायांनी प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडला, त्या तारक राऊळ यांच्या आठवणी मात्र कबड्डीच्या मैदानावर कायम जिवंत राहतील.


Post a Comment

0 Comments