Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय थाईबॉक्सिंगमध्ये रायगडचा ‘पदकांचा पंच’! ३१ सुवर्ण, १४ रौप्य, ६ कांस्यसह तब्बल ५१ पदकांची घसघशीत कमाई सुवर्णवीरांची गोवा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड नांदेडच्या रिंगमध्ये रायगडचा जबरदस्त ठसा!

 

राष्ट्रीय थाईबॉक्सिंगमध्ये रायगडचा ‘पदकांचा पंच’!

३१ सुवर्ण, १४ रौप्य, ६ कांस्यसह तब्बल ५१ पदकांची घसघशीत कमाई सुवर्णवीरांची गोवा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड

नांदेडच्या रिंगमध्ये रायगडचा जबरदस्त ठसा!

 

मुंबई : नांदेडच्या रिंगमध्ये रायगडच्या थाईबॉक्सिंगपटूंनी अक्षरशः पदकांचा वर्षाव करीत महाराष्ट्राच्या सांघिक विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला! १७व्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी ३१ सुवर्ण, १४ रौप्य आणि ६ कांस्य अशी तब्बल ५१ पदकांची घसघशीत कमाई करीत आपल्या ताकदीचा जबरदस्त परिचय करून दिला. महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद पटकावत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली असताना रायगडच्या युवा खेळाडूंनी आपल्या झुंजार कामगिरीने या यशात मोलाची भर घातली.

 

३१ सुवर्णपदकांचा दमदार मारा

रायगडच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत आक्रमक आणि प्रभावी खेळ करत ३१ सुवर्णपदकांवर नाव कोरले. अविशा शिंदे, जिजा भोसले, त्रिशा भोसले, चैत्राक्षी काकडे, वर्धन कदम, फिरोज अन्सारी, अनिकेत दुशिंग, मयूर जाधव, करण शिरोडकर, ऋषिकेश कुमार, एलीजा आदाकुल्ला, मन्मय जट, अथर्व मदाने, वंश कोकरे, जिया मांजरेकर, सानवी सावंत, तन्वी शर्मा, रिया सेल, काव्या शेजाळे, श्रेया कुंडलकर, यशस्वी सावडेकर, विक्रांत खुटले, श्रेयश पवार, शुभम पवार, प्रिशा पाटील, स्नेहा राऊत, प्रभास रहाटे, आर्या लेंडवे, आस्था भगत, दर्शित माळी आणि श्रेया रहाटे यांनी सुवर्णमय कामगिरी करून रायगडचा झेंडा उंचावला.

 

रौप्यवीरांनीही दिली तोडीस तोड साथ

सुवर्णपदक विजेत्यांच्या चमकदार कामगिरीला वैष्णवी सावंत, स्वामिनी शिर्के, अनन्या पाटील, सोहम सावंत, प्रात्विक मुंडले, आराध्या नंबियार, अवनीश कंक, प्रियल पानसे, आगस्त्या वैदू, शिवांक राणा, आरव नायर, अद्विका गरगडे, निष्ठा चंदाणे आणि रायांश जाधव यांनी रौप्यपदके जिंकून भक्कम साथ दिली. या खेळाडूंनी कठीण आव्हानांना सामोरे जात १४ रौप्यपदकांची कमाई केली.

 

कांस्यपदकांचीही दमदार भर

राष्ट्रीय स्तरावरील कडव्या स्पर्धेत मृगाक्षी पॉल, नक्ष मोरे, अस्मिता शिंदे, गुरु जाधव, केशव पाटील यांनी कांस्यपदके जिंकून रायगडच्या पदकसंख्येत भर घातली. प्रत्येक लढतीत जिद्द, वेग आणि तांत्रिक कौशल्याचे दर्शन घडवत या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.

 

आता लक्ष्य गोवा वर्ल्ड चॅम्पियनशिपचे

या राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची गोवा येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर सुवर्णमुद्रा उमटविल्यानंतर आता हे युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदके जिंकण्याच्या निर्धाराने सज्ज झाले आहेत.

 

प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन

रायगडच्या या नेत्रदीपक यशामागे खेळाडूंची मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व रायगड थाई बॉक्सिंगचे अध्यक्ष निलेश भोसले, थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ पनवेल शहरचे अध्यक्ष प्रतिक कारंडे, उरण तालुका अध्यक्ष सुरज टकले तसेच प्रशिक्षक सुरेश राठोड, रोहित तळी, योगेश बैकर आणि प्रथम बहिरा यांचे पदक विजेत्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

या घवघवीत यशाबद्दल थायबॉक्सिंग इंडियन फेडरेशनचे अध्यक्ष कुलदीप सुमनाक्षर, सचिव रविंद्र सिंह तसेच थाईबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे चेअरमन डॉ. मंदार पनवेलकर आणि अध्यक्ष फरहान नबिजी यांनी रायगडच्या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

 

राष्ट्रीय थाईबॉक्सिंगच्या रिंगमध्ये ५१ पदकांची घसघशीत कमाई करून रायगडच्या युवा खेळाडूंनी केवळ महाराष्ट्राच्या विजेतेपदात योगदान दिले नाही, तर आता गोवा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीही मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. रायगडचा हा ‘पदकांचा पंच’ आता जागतिक रिंगमध्येही घणाघाती ठसा उमटवेल, अशीच क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments