Type Here to Get Search Results !

प्रभादेवीत ‘तारक राऊळ क्रीडा संकुल’ उभारा! माजी महापौर विशाखा राऊत यांची मागणी मैदान वाचवा, राष्ट्रीय सन्मानासाठी प्रयत्न करा—मान्यवरांचा सूर

 


प्रभादेवीत ‘तारक राऊळ क्रीडा संकुल’ उभारा!

माजी महापौर विशाखा राऊत यांची मागणी

मैदान वाचवा, राष्ट्रीय सन्मानासाठी प्रयत्न करा—मान्यवरांचा सूर

 

मुंबई : प्रभादेवीत कबड्डीचे क्रीडा संकुल तयार करून त्याला तारक राऊळ यांचे नाव द्या!” या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या भावूक मागणीने राष्ट्रीय कबड्डीपटू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ यांच्या शोकसभेला वेगळीच दिशा मिळाली. मैदानावर कबड्डीची पताका उंचावणाऱ्या या महान खेळाडूच्या स्मृती केवळ चौक, रस्ते किंवा नामफलकापुरत्या मर्यादित न राहता त्यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कबड्डीचे क्रीडा संकुल उभारावे, अशी भावना सभेतून एकमुखाने व्यक्त झाली.

 

तारक राऊळ’ नावाने क्रीडा संकुल उभारा

ओम् कबड्डी प्रबोधिनी व प्रभादेवी मित्र मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कबड्डीमहर्षी स्व. बुवा साळवी सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे तारक राऊळ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विशाखा राऊत यांनी प्रभादेवीत कबड्डीचे स्वतंत्र क्रीडा संकुल उभारून त्याला तारक राऊळ यांचे नाव देण्याची मागणी केली.

 

रस्त्यालाही तारकांचे नाव द्या

माजी महापौर श्रद्धा जाधव यांनीही विशाखा राऊत यांच्या मागणीला पाठिंबा देत रस्त्याला तारक राऊळ यांचे नाव देता येईल, अशी भूमिका मांडली. विभागीय आमदारांनी आपल्या शोकसंदेशात प्रभादेवीतील चवनी गल्ली क्रीडांगणासाठी याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

 

तारकांना चौकात अडकवू नका!’

आमदार भाई जगताप यांनी मात्र स्मारकाच्या पलीकडे जाऊन तारक राऊळ यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, अशी भूमिका मांडली. प्रथम खेळाची मैदाने वाचविली, तर क्रीडा संकुल उभारून त्यांना खेळाडूंची नावे देता येतील. तारकला असे चौक, रस्त्यात अडकवून ठेवू नका. त्याला भारताचा महत्त्वाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

 


लोअर परळच्या मैदानाला तारकांचे नाव देण्याची तयारी

आमदार सुनील शिंदे यांनी तारक राऊळ यांच्याप्रती आदर व्यक्त करताना लोअर परळ येथील मैदानाला तारक सरांचे नाव देण्याची तयारी दर्शविली. तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी आपणही सर्वांच्या बरोबरीने हिरीरीने प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

ज्ञान पुढच्या पिढीला देणारा खेळाडू

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सचिव यांनी तारक राऊळ यांच्या स्वभावाचा उल्लेख करताना त्यांच्या ज्ञानदानाची आठवण सांगितली. तारक यांनी आपल्याकडे असलेले कबड्डीचे ज्ञान नवोदित खेळाडूंना देत त्यांना घडविण्याचे काम सातत्याने केले, असे त्यांनी नमूद केले.

 

बुवा साळवींसोबत कबड्डी सातासमुद्रापार नेली

राज्य संघटनेचे माजी सचिव बाबूराव चांदेरे यांनी तारक राऊळ यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, तारक राऊळ यांनी बुवा साळवी यांच्या सहकार्याने कबड्डीला सातासमुद्रापार नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले.” त्यांच्या स्मरणार्थ आयोजित होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी ५१,००० देणगी देण्याची घोषणाही त्यांनी केली.

 

तारकसारखा खेळाडू पुन्हा होणे नाही!’

अर्जुन पुरस्कार प्राप्त शांतराम जाधव यांनी तारक राऊळ यांच्या खेळातील वैशिष्ट्ये अधोरेखित केली. तारकसारखा खेळाडू कबड्डीत होणे नाही. तो खेळाशी एकनिष्ठ व प्रामाणिक होता. पकडी करणाऱ्या खेळाडूपेक्षा तो धोकादायक पकडीचा खेळाडू होता. सहाय्यक असूनदेखील पकड यशस्वी करण्यात त्याचा वाटा महत्त्वाचा असे,” अशी आदरांजली त्यांनी वाहिली.

 


राजू भावसार भावनाविवश

अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम (राजू) भावसार यांनी तारक राऊळ यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सरांबरोबर खेळलो त्यापेक्षा त्यांच्या विरुद्ध अधिक खेळलो. पण वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळतच राहिले. त्यांच्या अंतिम समयी मनात असूनदेखील त्यांना भेटता आले नाही,” असे सांगताना भावसार भावनाविवश झाले. ही खंत मनाला कायम टोचत राहील, असे त्यांनी नमूद केले.

 

खेळातील पदलालित्याचा आदर्श

अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे यांनीही तारक राऊळ यांच्या खेळातील बारकावे आठवले. एक उमदा व चांगला प्रशिक्षक आपण गमावला. त्यांचे पदलालित्य आणि हात-पायांची हालचाल यांचा अभ्यास करून मी तो माझ्या खेळात आणण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी सांगितले.

 

खेळातून सुदृढ समाज घडविणारा माणूस हरपला

खासदार अनिल देसाई यांनी तारक राऊळ यांच्या सामाजिक योगदानाला सलाम करताना खेळाच्या माध्यमातून सुदृढ समाज बनविणारा माणूस आपण गमावला,” अशी भावना व्यक्त केली. मंगल पांडे यांनी तारक यांच्या व्यक्तिमत्त्वातील चांगुलपणाचा गुण आपल्याला भावल्याचे सांगितले.

 

महाराष्ट्राचा कबड्डीचा दम पुन्हा भारतात घुमला पाहिजे!’

बाळ वाडावलीकर यांनी तारक राऊळ यांच्यासारखे खेळाडू घडविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तारकसारखे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवेत. महाराष्ट्राचा कबड्डीचा दम भारतात पुन्हा घुमला पाहिजे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

कबड्डी विश्वाची मोठी उपस्थिती

यावेळी बाळ तोरसकर (खो-खो), रविंद्र गजने आणि पत्रकार धुरी यांनीही तारक राऊळ यांना आदरांजली वाहिली. शोकसभेला प्रबोधिनीच्या अध्यक्षा व अर्जुन पुरस्कार प्राप्त माया मेहर, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सिताराम साळुंखे, चित्रा नाबर-केरकर, शैला रायकर-पेडणेकर, सुनील जाधव (सर्व शिवछत्रपती पुरस्कार), डॉ. अरविंद जाधव, हॉकीचे अर्जुन पुरस्कार प्राप्त ऍलन मेरी, तसेच कबड्डीतील आजी-माजी खेळाडू, संघटक, पंच आणि कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्मृती जपण्यापेक्षा वारसा पुढे नेण्याची गरज

तारक राऊळ यांना श्रद्धांजली वाहताना उपस्थितांच्या भावना स्पष्ट होत्या—तारकांचे नाव केवळ एखाद्या रस्त्यावर किंवा चौकात देऊन विषय संपवायचा नाही; त्यांनी उभा केलेला कबड्डीचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली ठरेल. त्यासाठी मैदानांचे संरक्षण, क्रीडा सुविधा आणि नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या व्यवस्था उभारण्याची गरज आहे. तारक राऊळ यांच्या नावाने क्रीडा संकुल उभे राहिले, तर ते त्यांच्या स्मृतीचे नव्हे तर महाराष्ट्राच्या कबड्डी परंपरेचे जिवंत स्मारक ठरेल.

 

भावपूर्ण वातावरणात शोकसभा

शोकसभेचे सूत्रसंचालन अजय पेंडुरकर व जीवन पैलकर यांनी केले. तारक राऊळ यांच्या आठवणींनी भारावलेल्या वातावरणात उपस्थितांनी या महान कबड्डीपटूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


Post a Comment

0 Comments