Type Here to Get Search Results !

आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाड्याची चमक! मुंबई विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत २ रौप्य, ५ कांस्य अशी ७ पदकांची कमाई १९ पैलवानांचा दमदार सहभाग खोपोलीत श्री गणेश आखाड्याच्या युवा मल्लांचा दणका!


आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाड्याची चमक!

मुंबई विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत २ रौप्य, ५ कांस्य अशी ७ पदकांची कमाई

१९ पैलवानांचा दमदार सहभाग

खोपोलीत श्री गणेश आखाड्याच्या युवा मल्लांचा दणका!

 

ठाणे : मीरा-भाईंदरच्या कुस्तीविश्वाची ताकद पुन्हा एकदा विभागीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. खोपोली येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत श्री गणेश आखाडा, भाईंदरच्या कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत २ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण ७ पदके पटकावली. जिल्हास्तरावर चमक दाखवल्यानंतर विभागीय स्तरावरही आपल्या कुस्तीचे कौशल्य सिद्ध करत या युवा मल्लांनी श्री गणेश आखाड्याच्या यशाची परंपरा कायम राखली.

 

१९ मल्लांचा सहभाग; मुलांसह मुलींचीही दमदार झुंज

या विभागीय स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांमध्ये विविध वजनगटांत कुस्त्यांचे सामने झाले. श्री गणेश आखाड्यातील तब्बल १९ कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये ६ मुली आणि १३ मुलांचा समावेश होता. राज्याच्या पुढील पिढीतील मल्ल घडविण्याच्या दृष्टीने ही संख्या आणि त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.

 

तनुजा मांढरेची कांस्यपदकाची कमाई

मुलींच्या गटात पैलवान तनुजा मांढरे हिने ४३ किलो वजनी गटात उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. प्रतिस्पर्ध्यांसमोर आत्मविश्वासाने लढत देत तनुजाने विभागीय स्तरावर आपल्या खेळाची छाप उमटवली.

 

ध्रुव सूर्यवंशीची अंतिम फेरीपर्यंत झेप

१४ वर्षांखालील मुलांच्या ४८ किलो वजनी गटात ध्रुव सूर्यवंशी याने आपल्या कुस्तीतील आक्रमकता आणि सातत्याच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम लढतीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र अंतिम फेरीपर्यंतची त्याची झेप ही श्री गणेश आखाड्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली.

 

लकी अडबल्लेनेही अंतिम फेरी गाठली

१९ वर्षांखालील ६० किलो वजनी गटात लकी अडबल्ले याने दमदार कुस्ती करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. निर्णायक लढतीत त्याला रौप्यपदक मिळाले. विभागीय स्तरावर अंतिम फेरी गाठत लकीने भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी आपली दावेदारी मजबूत केली.

 

स्पंदन, कृष्णा आणि महेशची कांस्य झुंज

७५ किलो वजनी गटात स्पंदन पाटील, ३५ किलो वजनी गटात कृष्णा माने आणि ७१ किलो वजनी गटात महेश ढगे यांनी उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. तिन्ही मल्लांनी आपापल्या वजनगटात चुरशीच्या लढती देत पदकाला गवसणी घातली.

 

शगुन गुप्ताचीही पदकाला गवसणी

मुलींच्या ६५ किलो वजनी गटात शगुन गुप्ता हिने दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले. श्री गणेश आखाड्यातील मुलींच्या कुस्तीला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून पुढे येणाऱ्या खेळाडूंची कामगिरी यामुळे आखाड्याच्या महिला कुस्ती विभागालाही नवी ऊर्जा मिळत आहे.

 


वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली पदकांची लयलूट

या पदकविजेत्या कुस्तीपटूंना श्री गणेश आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील तसेच एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक पै. वैभव माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे श्री गणेश आखाड्यातील युवा मल्लांची कामगिरी सातत्याने उंचावत असल्याचे या विभागीय स्पर्धेतील निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे.

 

जिल्ह्यापासून विभागापर्यंत विजयी वाटचाल

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर आता मुंबई विभागीय स्तरावर ७ पदकांची कमाई करत श्री गणेश आखाड्याने आपली ताकद दाखवली आहे. रौप्याची चमक आणि कांस्याची झळाळी घेऊन परतलेले हे ७ युवा मल्ल आता पुढील मोठ्या स्पर्धांसाठी सज्ज झाले आहेत. मीरा-भाईंदरच्या कुस्तीला भविष्यातील मोठे मल्ल देण्याची श्री गणेश आखाड्याची वाटचाल अशाच प्रकारे सुरू राहण्याची अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments