Type Here to Get Search Results !

ठाणे जिल्हा कबड्डी संघाची निवड चाचणी ३ नोव्हेंबरपासून! ३४व्या किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड कोपरखैरणे येथे ६ नोव्हेंबरपर्यंत रंगणार सामने

 


ठाणे जिल्हा कबड्डी संघाची निवड चाचणी ३ नोव्हेंबरपासून!

३४व्या किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड

कोपरखैरणे येथे ६ नोव्हेंबरपर्यंत रंगणार सामने

 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उदयोन्मुख कबड्डीपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने, रा. फ. नाईक विद्यालय आणि ग्रीफिन्स जिमखाना, कोपरखैरणे यांच्या सहकार्याने ३४वी किशोर-किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ३ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे.

 

किशोर गटात २० संघांची निवड

स्पर्धेतील सामने प्रथम साखळी पद्धतीने आणि त्यानंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. किशोर गटात सहभागी होणाऱ्या संघांची संख्या अधिक असल्याने, सुरुवातीला पाच विभागांत बाद पद्धतीची स्पर्धा घेण्यात आली. त्यातून पात्र ठरलेल्या २० संघांची सहा गटांत विभागणी करण्यात आली आहे. किशोरी गटात सहभागी झालेल्या २९ संघांची नऊ गटांत विभागणी करण्यात आली आहे.

 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्याचा संघ निवडणार

या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याचा किशोर आणि किशोरी गटाचा संघ निवडण्यात येणार आहे. निवडलेला संघ परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा राज्यस्तरावर पोहोचण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे.

 

किशोर गटासाठी जागेनिहाय निवड समिती

किशोर गटाच्या मुलांच्या संघ निवडीसाठी सात सदस्यांची जागेनिहाय निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये शशिकांत चव्हाण (उजवा मध्य रक्षक), निलेश शिंगरे (डावा मध्य रक्षक), प्रदीप ठाकूर (उजवा कोपरा रक्षक), राकेश मोरे (डावा कोपरा रक्षक), आदेश पाटील (उजवी चढाई), शुभम दळवी (डावी चढाई) आणि स्वप्निल पाटील (अष्टपैलू) यांचा समावेश आहे.

किशोरी गटासाठी महिला निवड समिती

 

किशोरी गटाच्या मुलींच्या संघ निवडीसाठीही सात सदस्यांची जागेनिहाय निवड समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये दीपाली सुर्वे (सावंत) (उजवा मध्य रक्षक), प्रिया गुप्ता (डावा मध्य रक्षक), स्वप्नाली जाधव (उजवा कोपरा रक्षक), दिव्या मोरे (डावा कोपरा रक्षक), अश्विनी पाटील (उजवी चढाई), चैताली जाधव (बोराडे) (डावी चढाई) आणि दर्शना सणस (अष्टपैलू) यांचा समावेश आहे. असे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मालोजी भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.


Post a Comment

0 Comments