शंभराव्या आयडियल बुध्दिबळ स्पर्धेचे सर्वत्र कौतुक
मुंबई, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनाचे
औचित्य साधून परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित केलेल्या शंभराव्या
यशस्वी बुध्दिबळ स्पर्धेचे महाराष्ट्रातून सर्वत्र कौतुक होत आहे. लाईफ इन्शुरन्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यातील अरेना फिडे मास्टर व आंतरराष्ट्रीय
फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह १२१ खेळाडूंच्या सहभागामुळे एलआयसी-आयडियल
कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धा दर्जेदार झाली.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू
गजेंगी यांनी याप्रसंगी सांगितले कि शंभरावी बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करणारी
आयडियल ही एकमेव संस्था असून प्रारंभापासून त्यांच्या नियोजनबद्ध स्पर्धा तसेच
मोफत प्रशिक्षण शिबिरांचा खेळाडू व प्रशिक्षक या दोन्ही माध्यमातून सहभागी
होण्याचा योग आला. आयडियल व शिवनेरमार्फत दादर येथील छबिलदास सभागृहात
ग्रँडमास्टरांच्या सहभागाने झालेली बुध्दिबळ स्पर्धा सध्या जगज्जेता बनण्यासाठी
फॉर्ममध्ये असलेल्या नाशिकच्या विदित गुजरातीने जिंकल्याची आठवण फिडे
इंस्ट्रक्टर-बुध्दिबळपटू राजाबाबू यांनी सांगत हजारो बुध्दिबळपटूंना प्रोत्साहन
देण्याची परंपरा संयोजक लीलाधर चव्हाण हे भविष्यातही कायम ठेवतील,
असा विश्वास व्यक्त केला. शतक महोत्सवी बुध्दिबळ
स्पर्धेनिमित्त महाराष्ट्रातील विविध संस्थांचे मान्यवर
क्रीडापटू-संघटक-कार्यकर्ते, ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांनी अकादमीच्या या उपक्रमाला भरभरुन
शुभेच्छा दिल्या.
संस्थापकीय अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या पुढाकाराने आयडियल
स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपमार्फत गेल्या चार दशकांपासून राबविलेल्या विविध
उपक्रमांमधील १०० बुध्दिबळ स्पर्धा, ४१ कबड्डी स्पर्धा, ८६ क्रिकेट स्पर्धा, ६५ कॅरम स्पर्धा, २२ शरीरसौष्ठव स्पर्धा, २१ व्यायाम स्पर्धा, ७ खोखो स्पर्धा, ४१ मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर,
४ टेबल टेनिस स्पर्धा, ३ बॅडमिन्टन स्पर्धा, ४ एकांकिका स्पर्धा, चित्रकला-पोस्टर-रांगोळी-क्रीडा आदी स्पर्धांसह २३
व्यसनमुक्ती सप्ताह, नामवंत २४ कार्यकर्त्यांचा पुरस्कारासह गौरव, २४ श्री गणेश दर्शन स्पर्धा आदी कार्यक्रम यशस्वीपणे
साकारले आहेत. संस्थेचे पदाधिकारी लीलाधर
चव्हाण,
गोविंदराव मोहिते, अर्जुन कालेकर, चंद्रकांत करंगुटकर, राजन राणे, ओमकार चव्हाण आदी
विविध क्रीडा उपक्रमामध्ये हिरीरीने भाग घेत असतात.

Post a Comment
0 Comments