Type Here to Get Search Results !

बी.ए.आर.सी; पार्ले स्पोर्ट्स - अ कुमार उपांत्य फेरीत

 


मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

बी.ए.आर.सी;  पार्ले स्पोर्ट्स - अ कुमार उपांत्य फेरीत


मुंबई, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत बी.ए.आर.सी.ने व्यावसायिक गटात उपांत्य फेरी गाठली, तर पार्ले स्पोर्ट्स - अ संघाने पश्चिम विभागीय कुमार गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे आयोजन संयोजन संस्था चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर करण्यात आले आहे.

 

बी.ए.आर.सी.ने व्यावसायिक गटात चमक दाखवली

बी.ए.आर.सी. संघाने शुभश्री इंटरप्रायझेसचा १९-०९ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सुकेश जगताप आणि चिराग राणे यांच्या अष्टपैलू खेळामुळे संघाने सहज विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत त्यांची गाठ साईश्रद्धा सप्लिमेशन संघाशी होणार आहे.

 

पार्ले स्पोर्ट्स - अ चा कुमार गटात दमदार विजय

पार्ले स्पोर्ट्स - अ ने सह्याद्री क्रीडा मंडळावर ३८-१७ असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दोन लोण देणाऱ्या पार्ले संघाने पूर्वार्धात २५-०५ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी १३ गुणांची भर घालून त्यांनी सामना सहज खिशात घातला. ईशांत शिंदे, प्रशांत पवार, आणि अभिषेक यादव यांच्या प्रभावी खेळामुळे हा मोठा विजय शक्य झाला. सह्याद्रीच्या उत्तम नार्वेकरने उत्तरार्धात चांगली कामगिरी केली.

 

सिद्धिविनायक - अ संघाची विजय मोहीम

सिद्धिविनायक - अ संघाने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संघर्ष - अ संघाचा ३२-१६ असा पराभव केला. मध्यांतराला २०-१० अशी आघाडी घेतल्यावर सिद्धिविनायकने सावध खेळ करत विजय निश्चित केला. ओम कुदळे आणि साई जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीने संघाला उपांत्यपूर्व फेरी गाठता आली. संघर्ष संघाचा निमिष यादव बरा खेळला.

 

जाखमाता मंडळाचा थरारक विजय

दुसऱ्या सामन्यात जाखमाता मंडळाने रत्नदीप मंडळावर १९-१६ असा निसटता विजय मिळवला. विश्रांतीला १३-०५ अशी आघाडी घेतलेल्या जाखमाता संघाला उत्तरार्धात रत्नदीपने चांगलेच झुंजवले. जाखमाताच्या दर्शन नाक्ती आणि अर्पित धनावडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. रत्नदीप संघाच्या रितेश मोरे आणि सुशांत मेने यांनी उत्तरार्धात जोरदार लढत दिली, मात्र वेळेअभावी त्यांना पराभव पत्करावा लागला.


Post a Comment

0 Comments