Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा चेंबूर क्रीडा केंद्राची चौथ्या, उत्कर्ष मंडळाची तिसऱ्या फेरीत आगेकूच

 


मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

चेंबूर क्रीडा केंद्राची चौथ्या, उत्कर्ष मंडळाची तिसऱ्या फेरीत आगेकूच

 

मुंबई, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने कांदिवली येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर सुरू असलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत चेंबूर क्रीडा केंद्राने प्रथम श्रेणी गटात चौथी, तर उत्कर्ष मंडळाने तिसरी फेरी गाठली. या स्पर्धेचे आयोजन संयोजन संस्था चारकोप आणि संचालिका नम्रता भोसले यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

 

चेंबूर क्रीडा केंद्राचा रोमांचक विजय

प्रथम श्रेणी गटाच्या तिसऱ्या फेरीत चेंबूर क्रीडा केंद्राने स्वस्तिक मंडळ - ब चा २७-२१ असा पराभव केला. पहिल्या डावात चुरशीच्या लढतीत दोन्ही संघ १२-१२ अशा बरोबरीत होते. मात्र, उत्तरार्धात चेंबूरच्या कुणाल पवार आणि खान रिझवान यांनी आक्रमक खेळ करीत संघाचा विजय सुनिश्चित केला. स्वस्तिक मंडळाकडून ओमकार पाटील आणि रुपेश चौधरी यांनी पहिल्या डावात चांगली लढत दिली, पण उत्तरार्धात त्यांचा खेळ ढासळला.

 

उत्कर्ष मंडळाचा दमदार खेळ

उत्कर्ष मंडळाने दुसऱ्या फेरीत नवरत्न मंडळावर ३१-१६ असा विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. मनीष सावंत आणि सोहम भोसले यांच्या उत्कृष्ट खेळाने संघाने पहिल्या डावातच २२-०७ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात संयम राखत त्यांनी सामना सहज खिशात टाकला. नवरत्न मंडळाकडून रोहन शेडगेने चांगले प्रयत्न केले, पण संघाचा पराभव टाळू शकला नाही.

 

सिद्धार्थ क्रीडा मंडळाचा सहज विजय

सिद्धार्थ क्रीडा मंडळाने अंश देवांश मंडळाला ४२-२३ असा पराभूत करून तिसरी फेरी गाठली. मध्यांतराला १९-१० अशी आघाडी घेतलेल्या सिद्धार्थने उत्तरार्धातही तोच जोश कायम ठेवत विजय साकारला. प्रयाग कदम आणि आदित्य आर्य यांच्या अष्टपैलू खेळाने संघाला यश मिळवून दिले. अंश देवांशकडून सनी मालुसरेने उत्तम खेळ केला, पण संघाचा पराभव टाळता आला नाही.

 

गोवंडी स्पोर्ट्सचा निसटता विजय

गोवंडी स्पोर्ट्सने पहिल्या फेरीच्या रोमांचक सामन्यात पंढरीनाथ मंडळाचा २४-२३ असा निसटता पराभव केला. पहिल्या डावात ०८-१४ अशा पिछाडीवर असलेल्या गोवंडीने दुसऱ्या डावात संयमी खेळ दाखवत सामना आपल्या बाजूने झुकवला. श्रेयस आणि पतन यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. पंढरीनाथ मंडळाकडून श्र्लोक गोडांबे आणि यश लोखंडे यांनी संघर्ष केला, पण त्यांचा प्रभाव दुसऱ्या डावात कमी पडला.

 

दुर्गा परमेश्वरीचा सहज विजय

दुर्गा परमेश्वरी मंडळाने छत्रपती मंडळावर ३८-१५ अशी सहज मात करत दुसरी फेरी गाठली. प्रतीक प्रजापती आणि अनुज राजभवन यांच्या अष्टपैलू खेळाने संघाचा विजय सोपा झाला. छत्रपती मंडळाकडून रुद्र मोरेने चांगले प्रदर्शन केले.

 

कुमार गटात जाखमाता मंडळाचा दणदणीत विजय

पश्र्चिम विभागाच्या कुमार गटात जाखमाता मंडळाने नव महाराष्ट्र संघाचा ३७-०९ असा एकतर्फी पराभव केला. अजय भायडे आणि दर्शन नाक्ति यांच्या उत्कृष्ट खेळामुळे संघाने मोठा विजय मिळवला. नव महाराष्ट्र संघाकडून मंदार लांजेकर एकाकी झुंज दिली, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

 


 


Post a Comment

0 Comments