Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. किशोरी गटाच्या अंतिम फेरीत, अभिनव मंडळ आणि बालवीर स्पोर्ट्स किशोर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत

 


मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. किशोरी गटाच्या अंतिम फेरीत,

अभिनव मंडळ आणि बालवीर स्पोर्ट्स किशोर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत

 

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत चेंबूर क्रीडा केंद्र आणि एस.आय.ई.एस. संघांनी पूर्व विभाग किशोरी गटात अंतिम फेरी गाठली. किशोर गटात अभिनव मंडळ आणि बालवीर स्पोर्ट्स यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे आयोजन संयोजन संस्था चारकोप आणि संचालिका नम्रता भोसले यांच्या सहकार्याने कांदिवली, सेक्टर-२ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर करण्यात आले आहे.

 

किशोरी गटात चेंबूर क्रीडा केंद्राचा सहज विजय

चेंबूर क्रीडा केंद्राने उपांत्य सामन्यात नवशक्ती स्पोर्ट्सचा ३२-१३ असा पराभव केला. चेंबूरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत दोन लोण देत पूर्वार्धात २१-०६ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. तृप्ती माहरवा आणि रिया चांदोरकर यांच्या शानदार चढाई आणि पकडीच्या खेळामुळे हा विजय साधला. नवशक्तीच्या जान्हवी शेलारने संघर्ष केला, पण तो अपुरा ठरला.

 

एस.आय.ई.एस.चा वर्चस्वपूर्ण खेळ

दुसऱ्या उपांत्य सामन्यात एस.आय.ई.एस. संघाने हिड इंडियाचा ४१-०४ असा धुव्वा उडविला. पहिल्या डावात २१-०१ अशी आघाडी घेणाऱ्या एस.आय.ई.एस.ने उत्तरार्धातही जोर कायम ठेवत सामना ३७ गुणांच्या फरकाने जिंकला. आस्था सिंग, जयश्री पार्टे, आणि तनुश्री शिंदे यांच्या दमदार कामगिरीमुळे संघ अंतिम फेरीत पोहोचला.

 


किशोर गटात अभिनव मंडळाची विजय यात्रा

अभिनव मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्रावर ३४-२४ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात लोण देत अभिनवने २९-०७ अशी आघाडी घेतली. चेंबूरने दुसऱ्या डावात लोण देत सामना रंगतदार केला, मात्र अभिनवने अखेरीस आणखी एक लोण देत विजय निश्चित केला. अभिनवकडून नितेश यादव आणि कार्तिक पाल, तर चेंबूरकडून श्रावण तावडे आणि श्रीकांत दावरू यांनी उत्कृष्ट खेळ केला.

 

बालवीर स्पोर्ट्सचा दमदार खेळ

बालवीर स्पोर्ट्सने महाशक्तीचा ३३-११ असा पराभव करीत किशोर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आर्यन वाघमारे, सिद्धार्थ सावंत, आणि रीतीक मेस्त्री यांच्या अष्टपैलू खेळामुळे बालवीरने मध्यांतराला १६-०५ अशी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली.

 

कुमारी गटात स्वराज्य स्पोर्ट्सची विजयात आगेकूच

कुमारी गटाच्या सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्सने आराध्य स्पोर्ट्सचा २४-०४ असा सहज पराभव केला. सानिया इंगळे आणि सेरेना म्हसकर यांच्या तडाखेबाज खेळामुळे स्वराज्यने चौथी फेरी गाठली.

 

प्रथम श्रेणी गटात स्वस्तिक मंडळाचे वर्चस्व

प्रथम श्रेणी गटात स्वस्तिक मंडळाने सन्मित्र मंडळावर ३८-२१ असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. द्वितीय श्रेणीतून प्रथम श्रेणीत बढती मिळवलेल्या सन्मित्रने स्वस्तिकला चांगली लढत दिली. स्वस्तिककडून आकाश रुडले आणि अलंकार पाटील, तर सन्मित्रकडून सोहम पूंदे आणि प्रथमेश शेळके यांनी चमकदार खेळ केला.


Post a Comment

0 Comments