Type Here to Get Search Results !

एल अँड टी मुंबई ओपन 2025: माया राजेश्वरनचे आव्हान समाप्त, प्रार्थना ठोंबरे अंतिम फेरीत


 एल अँड टी मुंबई ओपन 2025: माया राजेश्वरनचे आव्हान समाप्त, प्रार्थना ठोंबरे अंतिम फेरीत

 

मुंबई : एल अँड टी मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या माया राजेश्वरनचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. तिला अनुभवी जील ताइचमनने 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसरीकडे, भारताच्या प्रार्थना ठोंबरेने डच सहकारी एरियन हार्टोनोच्या साथीने दुहेरीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

मायाचे स्वप्नभंग

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत 15 वर्षीय मायासाठी हा पहिलाच वरिष्ठ गटातील मुख्य ड्रॉ अनुभव होता. कोइंबतूरच्या मायाने या स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, स्वित्झर्लंडच्या अनुभवी जील ताइचमनने तिच्या अनुभवाचा फायदा घेत हा सामना सहज जिंकला.

 


पहिल्या सेटमध्ये ताइचमनने दमदार सुरुवात करत सलग चार गेम्स जिंकले. मायाने संघर्ष करत दोन गेम्स जिंकत काही प्रमाणात आघाडी कमी केली, पण ताइचमनने पहिला सेट 6-3 असा जिंकत आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या सेटमध्ये मायाने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण ताइचमनच्या अचूक खेळासमोर ती अपयशी ठरली. सेट 6-1 जिंकत ताइचमनने अंतिम फेरी गाठली.

 

मनाचायाची अंतिम फेरीत आगेकूच

दुसऱ्या उपांत्य फेरीत थायलंडच्या आठव्या मानांकित मनाचाया सावांगकावेने दुसऱ्या मानांकित कॅनडाच्या रिबेका मारीनोवर सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मनाचायाने पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही तिने वर्चस्व राखत 6-2 अशा फरकाने सामना जिंकला.

 


प्रार्थना ठोंबरेचा दुहेरीत शानदार प्रवेश

भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे प्रार्थना ठोंबरे हिने दुहेरीत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिने डच सहकारी एरियन हार्टोनोसोबत इटलीच्या कॅमिला रोसेटेलो आणि निकोल फॉस्सा यांचा 4-6, 6-3, 10-3 असा पराभव केला.

 

पहिल्या सेटमध्ये रोसेटेलो-फॉस्सा जोडीने 6-4 असा विजय मिळवला. मात्र, प्रार्थना-हार्टोनो जोडीने शानदार पुनरागमन करत दुसरा सेट 6-3 ने जिंकत बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये त्यांनी शानदार खेळ करत 10-3 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत त्यांचा सामना अमिना अंशबा आणि एलिना प्रिदांकिना जोडीशी होणार आहे.

 


निकाल:
एकेरी उपांत्य फेरी:

जील ताइचमन वि. माया राजेश्वरन 6-3, 6-1

मनाचाया सावांगकावे वि. रिबेका मारीनो 6-2, 6-2

 

दुहेरी उपांत्य फेरी:

प्रार्थना ठोंबरे/एरियन हार्टोनो वि. कॅमिला रोसेटेलो/निकोल फॉस्सा 4-6, 6-3, 10-3

अमिना अंशबा/एलिना प्रिदांकिना वि. कॅमिला रोसेटेलो/निकोल फॉस्सा 4-6, 6-3, 10-3

 

मुंबई ओपन WTA 125 स्पर्धेबद्दल:

एल अँड टी मुंबई ओपन WTA 125 सिरीज ही महिला टेनिसमधील प्रतिष्ठित स्पर्धा आहे. 2024 मध्ये सहा वर्षांनंतर ही स्पर्धा मुंबईत परतली. याआधी 2017 मध्ये आर्यना सबालेन्काने तर 2018 मध्ये थायलंडच्या लुक्सिका कुमखुमने ही स्पर्धा जिंकली होती. 2024 मध्ये लात्वियाच्या दरजा सेमेनिस्ताजाने विजेतेपद पटकावले.

 

Post a Comment

0 Comments