Type Here to Get Search Results !

मिटीओरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडल लीग: वर्नोस्ट जग्वार्सने सोहेल खान एंटरटेनमेंट पँथर्सचा 23-22 असा थरारक पराभव करत शानदार सुरुवात

 


मिटीओरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडल लीग: वर्नोस्ट जग्वार्सने सोहेल खान एंटरटेनमेंट पँथर्सचा 23-22 असा थरारक पराभव करत शानदार सुरुवात

 

मुंबई, 5 फेब्रुवारी 2025: भारतात प्रथमच आयोजित केलेल्या वर्ल्ड पॅडल लीगच्या स्पर्धेला जबरदस्त उत्साहात सुरुवात झाली. मुंबईतील नेस्को सेंटर येथे खेळल्या गेलेल्या उद्घाटन सामन्यात वर्नोस्ट जग्वार्स संघाने सोहेल खान एंटरटेनमेंट पँथर्स संघावर 23-22 असा निसटता विजय मिळवला.



--------------------------------------------------------------------------------

बॉलिवूड अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता तसेच पँथर्स संघाचे मालक सोहेल खान स्वतः आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.

--------------------------------------------------------------------------------

 

मिश्र दुहेरीच्या सामन्यात दोन्ही संघांनी जबरदस्त झुंज दिली. वर्नोस्ट जग्वार्सच्या अ‍ॅलेक्स अरोयो आणि मारिया व्हर्जिनिया रिएराने सुरुवातीला 1-4 अशा पिछाडीवर असतानाही जोरदार पुनरागमन करत सेट टायब्रेकपर्यंत नेला आणि अखेर 7-6 असा विजय मिळवला. पँथर्सच्या रामा व्हॅलेन्झुएला आणि मरीना गुइनार्ट जोडीचा त्यांनी पराभव केला.

 


पहिल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात पँथर्सच्या जेव्हियर बराहोना आणि जेव्हियर गार्सिया यांनी जग्वार्सच्या डेव्हिड गाला आणि अ‍ॅरिस पॅटिनिओटिस यांच्याविरुद्ध तुल्यबळ लढत दिली. दोन्ही संघांनी आपापली सर्व्हिस राखली, त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. अखेर निर्णायक क्षणी पँथर्सने 7-6 असा विजय मिळवत सामना 13-13 अशा बरोबरीत आणला.

 

महिला दुहेरीत पँथर्सच्या सोफिया अरौजो आणि मार्टा ओर्टेगा यांनी जोरदार सुरुवात करत 3-0 अशी आघाडी घेतली. मात्र, वर्नोस्ट जग्वार्सच्या अलेजांद्रा सालाझार आणि तामारा इकार्डो यांनी प्रतिकार करत अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही पँथर्सने 6-4 असा सेट जिंकत एकूण गुणसंख्येत 19-17 अशी आघाडी घेतली.

 

शेवटच्या सामन्यात वर्नोस्ट जग्वार्सच्या लुकास कॅम्पॅग्नोलो आणि डेव्हिड गाला सांचेझ जोडीने पँथर्सच्या जेव्हियर लेल आणि सॅन्यो गुटिरेझ जोडीवर सहज 6-3 असा विजय मिळवत संघाला 23-22 अशा निसटत्या फरकाने विजय मिळवून दिला.


 

सामना जिंकल्यानंतर वर्नोस्ट जग्वार्सच्या अलेजांद्रा सालाझार म्हणाली, "आज आम्ही कोर्ट आणि वातावरणाशी जुळवून घेण्याचा पहिला प्रयत्न केला आणि तो अत्यंत जबरदस्त होता! एका बलाढ्य संघाविरुद्ध कडवी झुंज देत आम्ही विजय मिळवला. पहिल्याच दिवशी चांगले गुण मिळणे हा आनंदाचा क्षण आहे."

 


Post a Comment

0 Comments