Type Here to Get Search Results !

श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित शताब्दी चषक विभागीय खो-खो स्पर्धा रोमहर्षक लढतीत जादा डावात 'विहंग' ठरला अजिंक्य!



 

श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित शताब्दी चषक विभागीय खो-खो स्पर्धा  

रोमहर्षक लढतीत जादा डावात 'विहंग' ठरला अजिंक्य!

 

ठाणे : अंतिम सामन्यात उत्कंठेचा कळस गाठत विहंग क्रीडा मंडळाने जादा डावात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीवर २६-२३ अशी मात करत श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित शताब्दी चषक त्री जिल्हास्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटातील थरारक सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीला पराभव स्विकारावा लागला, मात्र महिला गटात त्यांनी शिवभक्त क्रीडा मंडळाचा ७-६ असा पराभव करत अंतिम विजेतेपदावर मोहोर उमटवली.

 

पुरुष गट : अंतिम सामन्यात जादा डावाचा थरार!

अंतिम लढतीत विहंग संघाने पहिल्या डावात आक्रमक खेळ करत १०-८ अशी आघाडी मिळवली. मात्र, शिर्सेकर्स संघाने जोरदार प्रत्युत्तर देत दुसऱ्या डावात सामना १८-१८ अशा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याचा निर्णय जादा डावावर गेला. तिथे विहंग संघाने चुका सुधारत ८ गुणांची कमाई केली, तर त्यांच्या संरक्षण फळीने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

 

विजयात मोलाचा वाटा...

विहंग क्रीडा मंडळाच्या  गजानन शेंगाळ - तीनही डावात उत्कृष्ट संरक्षणासह ३ गुण, लक्ष्मण गवस - २१.१० मिनिटे पळतीचा खेळ करत ४ गुणांची नोंद, आकाश तोगरे - उत्कृष्ट संरक्षणासह ३ गुणांची कमाई, पराभूत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी कडून ऋषिकेश मुर्चावडे, प्रतीक देवरे, दीपक माधव यांनी जबरदस्त प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळू शकले नाही.

 

महिला गट : एका गुणाच्या फरकाने थरारक विजय!

महिला गटातील अंतिम सामना देखील चुरशीचा ठरला. पहिल्या डावात ४-३ अशी नाममात्र आघाडी घेतलेल्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने दुसऱ्या डावातही तितकेच गुण मिळवत ७-६ अशा एका गुणाने निसटता विजय मिळवला.

 

विजयात चमकदार कामगिरी:

शिर्सेकर्स संघाच्या - देविका अहिरे, साक्षी वाफेलकर, सिद्धी देवळेकर, साक्षी पार्सेकर यांचा अष्टपैलू खेळ


शिवभक्त संघाकडून - रेश्मा राठोड, ऋतिका सोनावणे, कविता घाणेकर यांची उल्लेखनीय झुंज

 

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू :

सर्वोत्तम संरक्षक: मुली - ऋतिका सोनावणे (शिवभक्त क्रीडा मंडळ), मुले - दीपक माधव (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी)

 

सर्वोत्तम आक्रमक: मुली - साक्षी पार्सेकर, मुले - विजय देठे (विहंग क्रीडा मंडळ)

 

सर्वोत्तम अष्टपैलू: मुली - साक्षी वाफेलकर (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी), मुले - आकाश तोगरे (विहंग क्रीडा मंडळ) 

 

Post a Comment

0 Comments