Type Here to Get Search Results !

महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय, बाद फेरीत दमदार प्रवेश!

 


महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा दणदणीत विजय, बाद फेरीत दमदार प्रवेश!

 

मुंबई : महाराष्ट्राच्या महिला संघाने ७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळाने धडाकेबाज कामगिरी करत सलग दोन विजय मिळवले आणि सहज बाद फेरीत प्रवेश केला. हरियाणातील मोरमाजरा, कर्नाल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने शेवटच्या साखळी सामन्यात छत्तीसगडवर ४९-३१ अशी दणदणीत मात करत गटात अव्वल स्थान मिळवले.

 

छत्तीसगडला पराभूत करत महाराष्ट्राची विजयी लय कायम!

महाराष्ट्राने छत्तीसगडविरुद्ध पहिल्या मिनिटापासून आक्रमक सुरुवात करत पहिल्या सत्रातच २९-१४ अशी भक्कम आघाडी मिळवली. नंतरही हा आक्रमक पवित्रा कायम ठेवत १८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर आणि पूजा यादव यांच्या आक्रमक चढायांनी छत्तीसगडचा बचाव उध्वस्त केला. मात्र, महाराष्ट्राच्या बचाव फळीत काहीशी कमतरता दिसून आली.

 

ओडिशावर एकतर्फी विजय, बाद फेरीतील स्थान पक्के!

रात्री उशिरा झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने यजमान ओडिशाचा ६२-१८ असा धुव्वा उडवत बाद फेरीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. ओडिशाने पहिल्याच चढाईत दोन गडी टिपत महाराष्ट्राला धक्का दिला, पण त्यावर वेगाने सावरत महाराष्ट्राने सलग लोण देत सामना पूर्णपणे एकतर्फी केला.

 

या सामन्यात पहिल्या ५ ते ७ मिनिटांपर्यंत ओडिशाने महाराष्ट्राला कडवी झुंज दिली, पण नंतर महाराष्ट्राने खेळाचा वेग वाढवत हळूहळू पकड मिळवली. पहिल्या सत्रातच दोन लोण देत महाराष्ट्राने २७-१४ अशी आघाडी मिळवली. शेवटच्या ५ मिनिटांत महाराष्ट्राने आणखी दोन लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले.

 

या लढतीत महाराष्ट्राने एकूण ६ लोण देत सामना सहज जिंकला. आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर, ज्युली मिस्किटा आणि समरीन बुरोंडकर यांच्या अचूक चढायांनी आणि पकडींनी महाराष्ट्राने ४४ गुणांच्या प्रचंड फरकाने विजय साजरा केला.

 

महाराष्ट्राची दमदार आगेकूच – गतवर्षीच्या कामगिरीत सुधारणा करणार?

गतवर्षी महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत तृतीय क्रमांक पटकावला होता. यावेळी मात्र, गटात अव्वल स्थान मिळवून संघाने अंतिम विजेतेपदाचे ध्येय ठरवले आहे. आता बाद फेरीतील त्यांची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 


Post a Comment

0 Comments