श्री उद्यानगणेश मंदिर चषक कॅरम स्पर्धा
विश्वेत, निखील, सोहम, केतकी यांची
विजयी मुसंडी!
मुंबई, दि. ३ (क्री.प्र.) – श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल
स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक
शालेय कॅरम स्पर्धेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, सीईएस मायकल हायस्कूल-कुर्ल्याचा निखील
भोसले, शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा सोहम जाधव आणि पाटकर
विद्यालय-डोंबिवलीची केतकी मुंडल्ये यांनी प्रभावी विजय मिळवत पुढील फेरीत धडक
मारली.
स्पर्धेचे उद्घाटन समितीचे कार्यवाह डॉ. अरुण भुरे, विश्वस्त मधुकर प्रभू, व्यवस्थापक संजय आईर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण
यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
विश्वेत बिजोतकरची दमदार कामगिरी!
सरळ जाणाऱ्या सोंगट्यांचे सातत्य राखत विश्वेत बिजोतकरने
जबरदस्त फॉर्म दाखवत पोद्दार अकॅडमी-मालाडच्या पुष्कर गोळेचे आव्हान १५-० असे सहज
परतवले आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
निखील भोसलेचा कमालीचा पुनरागमन विजय!
पोद्दार अकॅडमी स्कूलच्या प्रसन्न गोळेने निखील
भोसलेविरुद्ध पहिला बोर्ड ५-० असा घेत दमदार सुरुवात केली. मात्र, निखील भोसलेने अचूक खेळ करत सामना १०-५ असा
जिंकला आणि आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
अन्य सामन्यातील महत्त्वाचे निकाल:
सोहम जाधवने आक्रमक खेळ करीत अद्वैत पालांडेला ११-० असे सहज हरवले, केतकी
मुंडल्येने श्रिया पवारचा २३-२ असा धुव्वा उडवला, उमैर पठाणने अनय
चीनीवारचा ११-१ असा सहज पराभव केला, ध्रुव भालेरावने सोहम सोनावणेवर
१४-१ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला, तनया दळवीने धर्मी शुक्लाचा १४-०
असा धक्कादायक पराभव केला, केवल कुळकर्णीने शिवांश मोरेवर ९-८ असा
अटीतटीचा विजय मिळवला, ग्रीष्मा धामणकरने महेक सय्यदला २१-० असे
पराभूत करत आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली.
अंतिम १६ खेळाडूंना विशेष गौरव!
स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक
चषकासह स्ट्रायकर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
मोफत क्रीडा उपक्रम आणि खेळाडूंसाठी खास सुविधा!
माघी श्री उद्यानगणेश जन्मोत्सवानिमित्त समितीतर्फे मोफत
क्रीडा उपक्रम राबविण्यात आला. सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट आणि अल्पोपहार देऊन
त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.
शालेय कॅरमपटूंनी दाखवलेल्या जोरदार खेळाने स्पर्धेत
रोमांचक वातावरण निर्माण झाले असून, येत्या फेऱ्यांमध्ये कोणता खेळाडू अंतिम विजयासाठी बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!

Post a Comment
0 Comments