श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विभागीय खो-खो स्पर्धा
विहंग आणि शिर्सेकर्सची उपांत्य फेरीत धडक!
ठाणे : श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विभागीय खो-खो स्पर्धेत
ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने आणि मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी
स्पोर्ट्स अकॅडमी संघाने उपांत्य फेरीत स्थान पक्के केले.
दमदार खेळ करत विहंगने श्री सह्याद्री संघाचा पराभव केला,
तर शिर्सेकर्सने ठाण्याच्या राज क्रीडा मंडळाचे आव्हान
संपुष्टात आणले.
विहंगचा आक्रमक विजय : लक्ष्मण गवसची चमकदार कामगिरी!
विहंग क्रीडा मंडळाने सामन्याची आक्रमक सुरुवात करत
श्री सह्याद्री संघावर पहिल्या
डावात भक्कम आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या डावात सह्याद्री संघाने ९-५ अशी जोरदार मुसंडी मारत सामना रंगतदार
केला. तरीही, पहिल्या
डावातील आघाडी निर्णायक ठरली.
विहंगच्या विजयाचा शिल्पकार लक्ष्मण गवस ठरला. त्याने दुसऱ्या डावात १.४० मिनिटे नाबाद पळत अप्रतिम खेळ दाखवला.
गजानन शेंगाळ (१.२० मिनिटे पळतीचा खेळ आणि ३ गुण) आणि आकाश
तोगरे (१.४० मिनिटे पळतीचा खेळ) यांनीही उत्तम साथ दिली.
पराभूत संघाकडून अक्षय भांगरेने २.४० मिनिटे पळतीचा खेळ करत ३ आक्रमक गुण मिळवले,
पण संघाचा पराभव टाळू शकला नाही.
शिर्सेकर्सचा विश्वासार्ह विजय : हर्षद हातणकरचा झंझावाती
खेळ!
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने पहिल्या
डावातील आघाडीच्या जोरावर राज क्रीडा मंडळाला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ गुण नोंदवले,
पण पहिल्या डावातील सरस कामगिरी शिर्सेकर्सच्या विजयाचे
कारण ठरली.
या सामन्यात हर्षद हातणकरने चमकदार खेळ करत २.१० मिनिटे आणि ३.२० मिनिटे
पळतीचा खेळ केला तसेच आक्रमणात ३ गुण मिळवले. प्रतीक देवेरेनेही संघाला चांगली साथ दिली.
पराभूत संघाच्या हितेन भोईर आणि अक्षय भोईरनेही दमदार खेळ केला,
पण संघाला विजय मिळवता आला नाही.

Post a Comment
0 Comments