Type Here to Get Search Results !

७१ वी पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची विजयी घोडदौड!


७१ वी पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची विजयी घोडदौड!

 

कटक (ओडिसा) : ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी करत सलग दोन विजय मिळवत बाद फेरीच्या दिशेने ठाम पाऊल टाकले आहे. हिमाचल प्रदेश आणि केरळ या संघांवर दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चमक दाखवली.

 

हिमाचल प्रदेशवर ३७-२४ अशी मात

आज सकाळी झालेल्या क गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा ३७-२४ असा सहज पराभव केला. सामन्याच्या पहिल्या डावात चुरस निर्माण झाली होती, जेथे स्कोअर १२-१२ असा बरोबरीत होता. मात्र, दुसऱ्या डावात हिमाचलने सुरुवातीला महाराष्ट्राचे दोन गडी बाद करत पहिला लोण दिला आणि आघाडी घेतली. पण महाराष्ट्राने अप्रतिम पुनरागमन करत लोणची परतफेड केली आणि आघाडी मिळवली. पुढे आणखी एक लोण देत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. शिवम पठारे आणि अजित चौहान यांच्या प्रभावी चढायांना शंकर गदईच्या भक्कम बचावाने साथ दिली, त्यामुळे महाराष्ट्राने हा विजय सोपा केला.

 

पहिल्या सामन्यात केरळचा संघर्षपूर्ण पराभव

महाराष्ट्राने आपल्या पहिल्या सामन्यात केरळवर ३९-३५ असा थरारक विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राने दमदार सुरुवात केली होती, पण केरळने चांगली लढत देत त्यांना अडचणीत टाकले. पहिल्या सत्रात केरळने १९-१६ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राच्या चढायांना केरळच्या बचावपटूंनी रोखले, परिणामी शिलकी दोन-तीन गड्यात खेळताना महाराष्ट्राला गुण घेणे कठीण झाले.

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने जोरदार पुनरागमन करत लोण फेडला आणि सामना पुन्हा रंगतदार बनवला. शेवटची ५ मिनिटे बाकी असताना केरळने आघाडी राखली होती, पण अखेरच्या दोन मिनिटांत महाराष्ट्राने ३६-३४ अशी निर्णायक आघाडी घेतली आणि चार गुणांनी विजय साकारला.

 

प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांचे मार्गदर्शन ठरले फलदायी

महाराष्ट्राच्या विजयात प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांनी शेवटच्या क्षणी दिलेल्या मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका ठरली. संपूर्ण सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या ७ ते ८ अव्वल पकडी झाल्या, मात्र हमखास गुण घेणारा एकमेव चढाईपटू नसल्यामुळे काही अडचणी आल्या.

 

त्रिपुरा विरुद्ध निर्णायक लढत

महाराष्ट्राचा पुढील सामना त्रिपुरा संघाविरुद्ध होणार असून तो सामना जिंकून महाराष्ट्राला बाद फेरीतील स्थान निश्चित करायचे आहे.

 

महाराष्ट्राचा आत्मविश्वास उंचावलेला, बाद फेरी गाठण्याचा निर्धार!

सलग दोन विजयांमुळे महाराष्ट्राच्या संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, पुढील सामन्यातही आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिवम पठारे, अजित चौहान आणि शंकर गदई यांचा भेदक खेळ पुन्हा एकदा महाराष्ट्राला यश मिळवून देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

Post a Comment

0 Comments