Type Here to Get Search Results !

वेंगसरकर चषकावर मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबची मोहोर! कळवेकर कनिष दळवी ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज

 


वेंगसरकर चषकावर मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबची मोहोर!

कळवेकर कनिष दळवी ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज

 

मुंबई : ड्रीम इलेव्हन दिलीप वेंगसरकर ट्रॉफी स्पर्धेचा चषक मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने काॅम्रेड्स क्रिकेट अकादमीवर दोन धावांनी निसटता विजय मिळवत चषकावर आपली मोहोर उमटवली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

 

शेवटच्या षटकात नाट्यमय विजय!

माहुल येथे आयोजित झालेल्या या अकरावर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले होते. मुंबईतील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत प्रशिक्षक दर्शन भोईर, अजय यादव आणि विरेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने दमदार खेळ केला.

 

प्रथम फलंदाजी करताना मांडवी संघाने 35 षटकांत 141 धावांचा डोंगर उभा केला. युवान जैनच्या 41 धावांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे संघाला भक्कम आधार मिळाला. प्रत्युत्तरादाखल काॅम्रेड्स क्रिकेट अकादमीने देखील जोशपूर्ण सुरुवात केली. मात्र, मांडवीच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये अप्रतिम कामगिरी करत काॅम्रेड्स संघाला 139 धावांवर रोखले. अखेरच्या षटकात दहावा गडी बाद करत मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबने थरारक विजय मिळवला.

 

कनिष दळवी ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज

या स्पर्धेत कळव्यातील अनिरुद्ध क्रिकेट अकादमीचा कनिष दळवी सर्वाधिक चमकदार ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत ४ सामन्यांमध्ये २७० धावांची धडाकेबाज खेळी करत उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला.

 

पुरस्कार विजेते :

सामनावीर : युवान जैन (41 धावा, 1 बळी), सर्वोत्कृष्ट फलंदाज : कनिष दळवी (270 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज : युग सोलंकी, मालिकावीर : शौर्य दुसी

 

मांडवी मुस्लीम स्पोर्ट्स क्लबच्या या शानदार विजयाने युवा क्रिकेटपटूंमध्ये नवी ऊर्जा संचारली असून, कनिष दळवीसारख्या युवा प्रतिभांना मिळालेल्या संधीमुळे क्रीडा क्षेत्रासाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे.


Post a Comment

0 Comments