डिंग डाँग विजेता, रॉय मालिकावीर!
सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेत डिंग डाँग रेड
डेव्हिल्सचा धमाकेदार विजय; दुर्गापूरचा सुर्वोनिल रॉय ठरला स्पर्धेचा हिरो
मुंबई – टेनिस क्रिकेटमधील वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो कपचा अकरावा पर्व डिंग डाँग रेड डेव्हिल्स संघाने खणखणीत विजयासह आपल्या नावे केला. अंतिम सामन्यात
त्यांनी दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबचा अक्षरशः धुव्वा उडवत १२ लाख रुपयांचे इनाम व संघातील प्रत्येक खेळाडूसाठी एक
बाईक मिळवली.
दुर्गापूर संघासाठी सुर्वोनिल रॉय याने दिलेली एकाकी झुंज सर्वांचे लक्ष वेधून गेली. भेदक
गोलंदाजी करत त्याने संपूर्ण स्पर्धेत केवळ ८ षटकांत १३ बळी घेत ५० धावा दिल्या आणि त्याच्या या अचूक कामगिरीसाठी त्याला
"मालिकावीर" म्हणून गौरवण्यात आले, त्यासोबतच त्याला मिळाली एक आलिशान कार!
निर्णायक सामना, निर्णायक खेळाडू!
फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दुर्गापूर संघ
डिंग डाँगच्या जलद व भेदक
गोलंदाजीसमोर फक्त ४१ धावा करू शकला. डिंग डाँगचे संदीप यादव याने अवघ्या २ षटकांत ५ बळी घेत सामना स्वतःच्या हातात घेतला. या स्फोटक कामगिरीबद्दल
त्याला "सामनावीर" (Man of the Match) पुरस्कार देण्यात आला.
त्याचबरोबर संदीपने संपूर्ण स्पर्धेत ४ सामन्यांत ८ षटकांत
फक्त ४७ धावा देत ७ बळी घेत "सर्वोत्कृष्ट गोलंदाज" म्हणूनही बाजी मारली.
डिंग डाँगच्या विजयाचा मुहूर्त फलंदाज कृष्णा सातपुते याने २७ धावांची नाबाद खेळी करून लावला. संघाने
फक्त ४.५ षटकांत लक्ष्य गाठले
आणि विजेतेपदावर नाव कोरले.
अयुब शेख ठरला स्पर्धेतील ‘बॅटिंग स्टार’
दुर्गापूरकडून अयुब शेख याने चार सामन्यांत तीन डावात ८० धावा (७ षटकारांसह) ठोकत
जबरदस्त फलंदाजी केली. त्याच्या या खेळीबद्दल त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
भव्य पारितोषिक वितरण सोहळा
विजेत्या संघाला शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुप्रिमो चषक प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या
हॉकीचे माजी कर्णधार धनराज पिल्ले
यांच्यासह, खासदार अरविंद सावंत, आमदार संजय पोतनिस (आयोजक), माजी महापौर श्रद्धा जाधव, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ, प्रशिक्षक प्रदीप सुंदरम, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, आमदार हरून खान, खासदार विनायक राऊत, व युवा क्रिकेटपटू तनिष कोटियन आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले,
“गेल्या ११ वर्षांपासून ही स्पर्धा
उपनगरातील नवोदित खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळवून देत आहे. आजच्या भव्य आयोजनामुळे
या स्पर्धेचं महत्त्व आणखी वाढलं आहे.”

Post a Comment
0 Comments