Type Here to Get Search Results !

१० वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग अंतिम फेरीत मुंबई पोलीस सिटी रायडर्स व शिवाजी पार्क वॉरियर्स आमनेसामने!

 


१० वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग

अंतिम फेरीत मुंबई पोलीस सिटी रायडर्स व शिवाजी पार्क वॉरियर्स आमनेसामने!

 

मुंबई : मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाने आपल्या तडाखेबाज कामगिरीचा कस पुन्हा एकदा सिद्ध करत ठाणे मराठाज संघाचा ६ विकेट्सनी पराभव केला आणि ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन व एम.सी.सी. आयोजित १० व्या मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीगच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. आता ३० एप्रिल रोजी पोलीस रायडर्स आणि शिवाजी पार्क वॉरियर्स यांच्यात थरारक अंतिम लढत रंगणार आहे.

 

पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या या सामन्यात ठाणे मराठाज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला शाश्वत जगताप (४०) आणि दिव्यांश सक्सेना (९) यांनी ३५ धावांची चांगली सलामी देत मजबूत सुरूवात केली. त्यानंतर शाश्वतने रिदय खांडके (१३) बरोबर दुसऱ्या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. मात्र नंतरचा मधल्या फळीतला डाव कोलमडला आणि संघाचा डाव १६.१ षटकांत केवळ १२० धावांत आटोपला.

 

मुंबई पोलिसांचा डावखुरा फिरकीपटू आर्यराज निकमने आपल्या शानदार गोलंदाजीने सामन्याचा प्रवाहच बदलून टाकला. त्याने अवघ्या १८ धावांत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि ठाणेचा डाव आटोक्यात आणला.

 

विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई पोलीस सिटी रायडर्सच्या फलंदाजांनी आक्रमक शैलीने खेळ केला. सलामीवीर सुनील पाटील (३४) आणि आर्यराज निकम (५३) यांनी अर्धशतकी भागीदारी करत जोरदार सुरुवात केली. निकमने आपल्या फटकेबाज फलंदाजीने ४६ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण करत संघाचा विजय जवळ आणला. ऋतुराज सानेने नाबाद २४ धावा करत निकमला उत्तम साथ दिली आणि संघाने १०.४ षटकांतच ४ बाद १२१ धावा करत सहज विजय मिळवला.

 

आर्यराज निकमच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.

 

अंतिम फेरीची रंगत वाढली!

या शानदार विजयामुळे मुंबई पोलीस सिटी रायडर्सने सुपर लीगमध्ये अव्वल स्थान पटकावले असून, अंतिम फेरीत त्यांचा सामना तेजस्वी कामगिरी करणाऱ्या शिवाजी पार्क वॉरियर्स संघाशी होणार आहे. ३० एप्रिल रोजी पोलीस जिमखाना येथे, प्रेक्षकांच्या साक्षीने, प्रकाशझोतात हा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

 

या स्पर्धेला विविध प्रतिष्ठित प्रायोजकांचा पाठिंबा लाभलेला असून, चेंडूंसाठी ए.एन.एम., आउटडोअर होर्डिंग पार्टनर म्हणून ग्लोबल, तसेच पारितोषिक प्रायोजक म्हणून प्रोबस इन्शुरन्स ब्रोकर यांचा सहभाग आहे. स्पर्धेत एकूण अडीच लाख रुपयांची रोख बक्षिसे आणि आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाणार आहेत.

 

संक्षिप्त धावफलक:

ठाणे मराठाज १६.१ षटकांत सर्वबाद १२० (शाश्वत जगताप ४०, सिद्धांत अधटराव १६; आर्यराज निकम १८ धावांत ४ बळी)

 

मुंबई पोलीस सिटी रायडर्स१०.४ षटकांत ४ बाद १२१ (आर्यराज निकम ५३, सुनील पाटील ३४, ऋतुराज साने नाबाद २४; विराज जाधव ३ धावांत २ बळी)


सामनावीरआर्यराज निकम

 


Post a Comment

0 Comments